‼️मंथन‼️
🔰 आठवणीतला विनाशकारी भूकंप
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 1/10/2026 :
किल्लारीच्या भूकंपाच्या घटनेला ३० सप्टेंबर २०२६ ला बरोबर ३३ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यांनी हा भूकंप अनुभवला तो कोणताही माणूस या भूकंपाची आठवण कदापि विसरू शकणार नाही._
३० सप्टेंबर १९९३ चा दिवस आठवतो. गणपती विसर्जनाचा तो दिवस होता. सकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक हादरे जाणवत होते, काय अघटित घडले ते कळत नव्हते, लोक भयभीत झाले होते. मी त्या वेळेस भगवती कॉलनी, औरंगाबाद (त्या वेळेचे. आताचे छत्रपती संभाजीनगर) येथे राहात होतो. रस्त्यावर एवढ्या सकाळी लोकांची गर्दी होती. नंतर कळले की हा भूकंप आहे. महाराष्ट्राने असा मोठा भूकंप पहिल्यांदाच अनुभवला असावा. हा मराठवाड्यासाठी काळाकुट्ट दिवस होता. हळूहळू भूकंपाचे सविस्तर कळायला लागले. हा भूकंप ६.३ रिश्टरचा होता. भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे ७० किमी सोलापूरच्या ईशान्येला होता. जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली होती. सुमारे ९७०० लोक या भूकंपात मृत्युमुखी पडले व ३० हजारांहून अधिक लोक जखमी झाले होते. संपत्तीची मोठी हानी झाली होती, अनेक घरांची पडझड झाली होती. काही घरे भुईसपाट झाली होती. भूकंप हा विनाशकारीच असतोच.
*भूकंपाचे प्रकार :*
भूकंपाबद्दल सांगायचे झाले तर भारताचा प्रभाग हा चार भूकंप प्रवण विभागात विभागला गेला आहे. झोन २, झोन ३, झोन ४ आणि झोन ५ अशा भूकंप प्रवण क्षेत्रात आपला देश विभागला आहे. झोन २ हा कमी तीव्रतेचा, तर झोन ५ हा सर्वांत जास्त तीव्रतेचा प्रभाग असतो. भूकंप प्रवण क्षेत्र ५ मध्ये भूकंप आल्यास तिथे जास्त हानी पोहोचते.
साधारणतः भूकंपाचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे डीप फोकस अर्थक्वेक आणि दुसरा म्हणजे शालो फोकस अर्थक्वेक. डीप फोकस अर्थक्वेक म्हणजे जमिनीतून बाहेर पडणारी ऊर्जा ही ३० किमीपेक्षा जास्त खोलवरून येते व जमिनीला जबरदस्त हादरे बसतात, तर शालो फोकस अर्थक्वेक यामध्ये जमिनीतून येणारी ऊर्जा ३० किमीपेक्षा कमी खोलवरून येते. जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अतिप्रचंड ऊर्जेमुळे अतिवेगवान लहरी निर्माण होतात व जमिनीची जोरदार हालचाल होते. यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंपाचे भाकीत करता येत नाही. Earthquake is unpredictable. जर्मन शास्त्रज्ञ वेगेनर यांनी भूकंपाबद्दल निश्चित सांगता यावे म्हणून सुमारे ३० वर्षे सतत भूकंपाचा अभ्यास केला व त्यानीही सांगितले, की भूकंप हा अनिश्चित असतो. वेगेनर यांची Continetel Drift Theory प्रसिद्ध आहे.
म्हणूनच भूकंप प्रवण क्षेत्रात इमारतीची संरचना, संकल्प चित्र तयार करताना भूकंप शास्त्राचा अभ्यास अत्यावश्यक आहे. भूकंपरोधक इमारती बांधता येतात, पण भूकंप प्रतिबंधक इमारती बांधणे शक्य होत नाही. कारण भूकंपाबद्दल किती मॅग्निट्यूडचा भूकंप येईल, हे भाकीत करता येत नाही. परंतु सध्या प्रगत देशात अर्ली वॉर्निंग सिस्टिम असल्यामुळे लोकांना वेळीच सूचित्त केल्या जाते. त्यामुळे बरेच लोक रस्त्यावर अथवा सुरक्षित स्थळी येऊन पोहोचू शकतात व आपला जीव वाचवू शकतात. ३-५ रिश्टरचा भूकंप असेल, तर त्यामुळे फारशी हानी होत नाही व घरेही पडत नाहीत. ५-६ रिश्टरचा भूकंप असेल, तर लोड बेअरिंग घरे पडायला लागतात व ६-८ रिश्टरचा भूकंप असेल, तर आरसीसी काँक्रीटची घरे पडायला लागतात. त्याला आपण मोठा भूकंप म्हणतो आणि ८-९ रिश्टरचा भूकंप असेल, तर त्याला आपण महान भूकंप म्हणतो व तो जास्त विनाशकारी असतो. यात जीवितहानी व संपत्तीची हानी मोठ्या प्रमाणात होते.
भूकंप प्रवण क्षेत्रात भूकंपाची मानके गृहीत धरूनच इमारतीचे संरचना संकल्प चित्रे केली पाहिजेत व आताच्या काळात तसे केल्या जाते म्हणूनच तशा इमारती भूकंपातही तग धरून राहतात. यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे Strong Column Week Beam concept हा असतो. इमारतीचे सर्व ओझे हे कॉलमवर येत असल्यामुळे ते त्या त्या प्रमाणात व आवश्यकते नुसार जाड असावेत. कॉलम हे इमारतीचे पाय असतात, ते मजबूत हवेत हाच भूकंपरोधक संरचना संकल्प चित्राचा मुख्य गाभा असतो.
भूकंप शास्त्राचा अभ्यास हा आयआयटी रुरकी, कानपूर, दिल्ली, मद्रास व इतर आयआयटींमधून प्रामुख्याने केला जातो व त्याचा उपयोग स्थापत्य अभियांत्रिकीच्या बांधकाम क्षेत्रात केला जातो. विशेष म्हणजे आयआयटी रुरकी येथे एक भूकंप शास्त्राचे शिक्षण देणारा स्वतंत्र विभाग आहे. वर्ष २०१०-१२ च्या सुमारास मला महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य म्हणून काम करण्याचा योग आला आणि त्या वेळेस समितीचे अध्यक्ष हे आयआयटी मुंबईचे प्रा. डॉ. रवी सिन्हा हे होते. ६-७ राज्यांची ती एकत्रित समिती होती. त्यामध्ये डॉ. रवी सिन्हाचे काम उल्लेखनीय होते. त्या वेळेस भूकंप शास्त्राचा अभ्यास हा फक्त आयआयटी, एनआयटी व काही मोजक्याच संस्थेत होता.
त्या वेळी डॉ.रवी सिन्हा यांनी आम्हाला आपत्ती व्यवस्थापन व भूकंपशास्त्र या विषयांचा अभ्यास हा अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास सांगितले, त्याला कारणही होते किल्लारीचा भूकंप. त्यानुसार आम्ही हे दोन विषय शासकीय अभियांत्रिकी छत्रपती संभाजीनगर महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले व त्याचा फायदा येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला.
जगाचा विचार केला तर कॅलिफोर्निया, जपान, अलास्का, चिली, इंडोनेशिया, तुर्कस्तान व अन्य काही देशांत लोकांना भूकंपाला नेहमीच सामोरे जावे लागते व अशा ठिकाणच्या यंत्रणा नेहमी सतर्क असतात. किल्लारीच्या भूकंपात मुख्यत्वे दगडांनी, विटांनी बांधलेली घरेच पडली, तुटली पण आरसीसीचे एकही घर या भूकंपात पडले नाही. विशेष म्हणजे किल्लारीत असलेले निळकंठेश्वराचे व इतर दोन, तीन दगडांनी बांधलेल्या मंदिरालाही काहीही झाले नाही. कारण त्यामध्ये त्या वेळच्या मिस्त्रींनी भूकंपरोधक मंदिर बांधल्याचे दिसते. किल्लारीच्या भूकंपाचे आपत्ती व्यवस्थापन त्या वेळी अगदी चोखपणे केले गेले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व सर्व संबंधित अधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेऊन परिस्थिती हाताळली. त्यामुळे लोकांना त्वरित विश्वास व दिलासा मिळाला. भूकंपबाधित क्षेत्रातील लोकांचे पुनर्वसन झपाट्याने केले गेले. किल्लारीचा काही भाग अजूनही ओसाड असल्यासारखा वाटतो. महाराष्ट्रासाठी असा भूकंप लोकांनी पहिल्यांदाच अनुभवला होता.
✍️ प्रा. डॉ. आर. एम. दमगीर,
(लेखक भूकंप शास्त्राचे अभ्यासक आहेत.)
▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▣
0 टिप्पण्या