🔵 पांढरी काठी : स्वाभिमानाचा प्रकाश आणि सामाजिक संवेदनशीलतेची गरज.
🟢 जागतिक पांढरी काठी दिन विशेष लेख,
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/10/2026 : आज जागतिक पांढरी काठी दिन. हा दिवस केवळ एका काठीचा उत्सव नाही, तर अंध व्यक्तींच्या स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा आणि समाजात आत्मसन्मानाने जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करणारा दिवस आहे. आज अंध व्यक्तींचे जीवन अधिक सुखकर आणि गतिशील झाले असेल, तर ते केवळ या हातातल्या 'पांढऱ्या काठी'मुळेच! स्त्री असो वा पुरुष, त्यांच्या सुरक्षित प्रवासाची आणि स्वातंत्र्याची खरी जीवनसखी ही पांढरी काठीच आहे.
परंतु, आजच्या दिवशी समाजातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि वास्तववादी विषयाकडे गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे.
बालपणापासूनच संवेदनशीलता आणि शिक्षणाची नितांत गरज,
पांढऱ्या काठीचे आणि अंध व्यक्तींच्या सहकार्याचे महत्त्व केवळ चर्चांपुरते मर्यादित राहू नये. याचे संस्कार बालपणापासूनच शाळा कॉलेजांमधून विद्यार्थ्यांवर व्हायला हवेत. शालेय अभ्यासक्रमातून आणि विविध उपक्रमांतून मुलांना हे शिकवले पाहिजे की, रस्त्यात एखादी अंध व्यक्ती दिसल्यास त्यांना सहकार्याचा हात कसा द्यावा आणि सुरक्षितपणे रस्ता कसा ओलांडून द्यावा. लहानपणापासूनच हे संस्कार मनावर कोरले गेले, तरच भविष्यात एक प्रगल्भ, सुसंस्कृत आणि संवेदनशील समाज निर्माण होऊ शकेल.
शहरांमधील सहकार्य आणि माणुसकीची भावना.
आज मोठ्या शहरांमध्ये याविषयी कौतुकास्पद आणि सकारात्मक चित्र पाहायला मिळते. शहरात हातात पांढरी, काठी धरलेली कोणतीही अंध व्यक्ती, स्त्री असो वा पुरुष, रस्त्याने प्रवास करताना आढळल्यास, नागरिक स्वतःहून पुढे येतात. केवळ रस्ता ओलांडून देणेच नाही, तर गरज पडल्यास स्वतः प्रवासखर्च करून ऑटो किंवा बसमध्ये बसवून इच्छित स्थळी पोहोचवण्याचे सौजन्य दाखवतात. शहरांमध्ये या पांढऱ्या काठीचे मूल्य आणि अंध व्यक्तींच्या हक्कांची जाणीव लोकांनी पूर्ण आत्मीयतेने स्वीकारल्याचे जाणवते.
ग्रामीण भागातील वास्तव आणि सामाजिक दृष्टिकोन,
याउलट, आपल्या ग्रामीण भागात आजही अंध व्यक्तींबद्दल हवी तशी सामाजिक जागरूकता निर्माण झालेली नाही. ग्रामीण भागात अंध व्यक्तींना संवेदनशीलतेने मदत करणारे लोक दुर्मिळच आढळतात; अनेकदा लोक केवळ पाहत राहतात किंवा दुर्लक्ष करून निघून जातात.
ग्रामीण भागात अनेकदा अंध व्यक्तीचा हात धरून मार्ग दाखवायला लोक उदासीनता दाखवतात, किंवा योग्य मार्गदर्शन न करता केवळ दूरवरून दिशा सांगून मोकळे होतात. एवढेच नव्हे, तर एखादी अंध व्यक्ती रस्त्याने चालताना नजरचुकीने कोणाच्या जवळ गेली किंवा स्पर्श झाला, तरी मदतीचा हात देण्याऐवजी लोक संशयाच्या नजरेने पाहतात.
काही ठिकाणी तर अंध व्यक्ती बाहेर पडल्यावर त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी "दृष्टी नसताना बाहेर कशाला फिरता? घरातच थांबायला हवे," अशा स्वरूपाचे बिनबुडाचे आणि दुखावणारे सल्ले दिले जातात. अशा प्रकारच्या प्रतिकूल वातावरणामुळे आणि सामाजिक उपेक्षेमुळे अनेक अंध बांधवांच्या मनाला वेदना होतात, आणि ते बाहेर न पडता घरातच राहणे पसंत करतात. माणुसकीचा हात आणि विचारबदलाची गरज.
रस्त्याने चालणारी अंध व्यक्ती कोणाची दया किंवा सहानुभूती मागत नाही, तर माणुसकीच्या नात्याने सहकार्य आणि सन्मानाची संधी मागत असते. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांचीही मानसिकता बदलण्याची आज नितांत गरज आहे. हातात पांढरी काठी धरून चालणारी व्यक्ती हीसुद्धा या समाजाचाच एक सन्माननीय घटक आहे. त्यांना एकाकी पाडण्याऐवजी किंवा शब्दांनी दुखावण्याऐवजी आदराने सहकार्याचा हात दिला पाहिजे.
अंतिम संदेश :
खरी गरज डोळ्यांना दृष्टी असण्याची नाही, तर मनाला संवेदनशील दृष्टिकोन असण्याची आहे. अंध बांधवांना मदतीची नव्हे, तर आदर आणि समान सहभागाची गरज आहे. समाजाने ही जाणीव ठेवून विश्वासाचा हात पुढे केला, तरच पांढरी काठी धरून चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा प्रवास स्वाभिमानी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक होऊ शकेल!
====================
0 टिप्पण्या