❤️ प्रेम आणि फक्त प्रेम... ✍️

 

❤️ प्रेम आणि फक्त प्रेम... ✍️

(​श्रद्धा धनेश डायरीच्या या सुंदर पानावरून आज एक असा विषय घेऊन येतोय, ज्याच्या स्पर्शाशिवाय कोणाचेही आयुष्य पूर्णच होऊ शकत नाही. ज्याच्याबद्दल जितकं बोलावं, जितकं लिहावं तितकं थोडंच वाटतं. असा अगदी जिव्हाळ्याचा विषय!

​आजच्या या खास भागात आपण उलगडणार आहोत प्रेमाची नेमकी परिभाषा...)

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 16/10/2026 : ​"प्रेम" हा शब्द दिसायला अगदी लहान, दोन अक्षरांचा; पण त्याची व्याप्ती आणि शक्ती अफाट आहे, प्रेमाची प्रचिती आपल्याला जन्मापासून येते आणि काळानुरूप ती वेगवेगळ्या रूपांत वाढत जाते. प्रेम ही अशी गोष्ट आहे, जी निस्वार्थपणे द्यायची आणि घ्यायची असते. निसर्गावर प्रेम करा, प्राणिमात्रांवर प्रेम करा, माणसांवर प्रेम करा, निरागस बालकांवर प्रेम करा, वृद्धांवर प्रेम करा, स्वतःवर प्रेम करा आणि आपल्या छंदांवर प्रेम करा, पण प्रेम नक्की करा, कारण Life without Love is nothing.

​विश्वाच्या निर्मितीपासूनच प्रेमाचा जन्म झाला आहे. पण प्रश्न पडतो, नेमके प्रेम म्हणजे काय?

​साधारणपणे प्रेमाला स्त्री-पुरुषांच्या नात्याशी किंवा रोमान्सशी जोडून पाहिले जाते. परंतु, प्रेम हे जगातील कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूशी आणि व्यक्तीशी होऊ शकते. प्रेम ही एक निखळ भावना आहे. कोणत्याही व्यक्ती किंवा घटकाबद्दल मनात आपुलकी, स्नेह, जिव्हाळा आणि आदर निर्माण होणे आणि ती व्यक्ती किंवा गोष्ट आयुष्यात हवीहवीशी वाटणे म्हणजे प्रेम, अगदी तसेच, आपण देवावरही प्रेम करतो, त्याला पुजतो आणि त्याचा आदर करतो. प्रेमाचे अनेक पैलू आहेत; प्रेमाला कोणत्याही विशिष्ट मर्यादेत बांधता येत नाही.

​खऱ्या प्रेमाच्या आड कधीही स्वार्थ दडलेला नसतो. जसे कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांवरील प्रेम हे पूर्णपणे निस्वार्थ असते.

​प्रेमाला कोणत्याही भाषेची किंवा व्याख्येची गरज नसते. प्रेम ही एक सुंदर, निर्मळ भावना आहे, जी शब्दांत मांडता येत नाही, फक्त अनुभवता येते. प्रेम ही एक अशी जादू आहे, जी एका हृदयातून थेट दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श करते.

​प्रेमाला जरी कोणतीही जात-भाषा नसली, तरी ती माणसांना एकमेकांशी घट्ट जोडण्याचे काम करते. प्रेम कधीही बळजबरीने होत नाही; ते आपोआप होते आणि झाल्यावरच त्याची खरी जाणीव होते.

​खऱ्या प्रेमात कुठल्याही अटी नसतात, बंधने नसतात. तिथे कोणी लहान-मोठा, श्रीमंत-गरीब किंवा जातीपातीचा भेदभाव नसतो. खरे प्रेम हे धर्म, जात, रंग, रूप आणि संपत्तीच्या पलीकडे जाऊन असते म्हणूनच म्हणतात, "प्रेम आंधळं असतं.

​पण त्याचबरोबर, प्रेम प्रत्येकाला आयुष्याच्या शेवटापर्यंत मिळेलच असे नाही. बऱ्याचदा प्रचंड संघर्ष करूनही प्रेमात एकत्र राहता येत नाही. अशा वेळी, ती व्यक्ती जरी आपल्या आयुष्यात सोबत नसली, तरी ती जिथे कुठे असेल तिथे सुखात असावी, असे वाटणे आणि तिच्या सुखात आनंद मानणे हे सुद्धा एक प्रकारचं खरं आणि पवित्र प्रेमच असतं.

आता तुम्ही खर तेच सांगा, तुमच्या आयुष्यात प्रेमाचे कोणते रूप आले आहे? तुमचे अनुभव नक्की काय सांगतो? अभिप्राय देऊन नक्की व्यक्त व्हा. हीच एक प्रेमळ अपेक्षा.

©️श्रद्धा धनेश डायरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या