स्टेटलाईन :
जंतरमंतर
मग आंदोलन कुठे करायचे ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 15/10/2026 :
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना हटवा या मागणीसाठी अगोदर काँग्रेस पक्षाने, नंतर इंडिया आघाडीने आणि त्यापाठोपाठ कॉक्रोच जनता पार्टीने एल्गार पुकारला. गेल्या आठवडा भरात दिल्ली, मुंबईसह देशभरात ज्ञानेशकुमार हटाव मागणीसाठी आठ मोठी आंदोलने झाली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाने व नंतर इंडिया आघाडीच्या आंदोलनाने सर्व देशाचे लक्ष वेधून घेतले. पण त्याहीपेक्षा कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन पोलिसांच्या व निमलष्करी दलाच्या बळावर दडपण्याची जो प्रकार झाला, त्याने काय साध्य झाले ? स्पर्धात्मक परीक्षांच्या वारंवार पेपर फुटीनंतर याच झुरळांच्या पक्षाने दिल्लीतील जंतरमंतरवर छत्तीस दिवस ठिय्या मांडला होता. तेव्हा त्यांनी काढलेल्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेला निर्घृण लाठीमार सर्व देशाने टीव्हीच्या पडद्यावर बघितला होता. जगभर जेन झीच्या आंदोलनाला प्रसिध्दी मिळाली, तेव्हा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हाही कॉक्रोच जनता पार्टीला जंतरमंतरवर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. दिड- दोनशे जेन झीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. पण जनतेची व सर्वोच्च न्यायालयाची सहानभुती विद्यार्थ्यांना मिळाली व त्यांच्यावर देशभरात दाखल झालेले गुन्हे काढून घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले. आता पुन्हा दोन आठवडे अगोदर जाहीर करून दहा ऑक्टोबरला कॉक्रोच जनता पार्टीचे ज्ञानेशकुमार हटावो मागणीसाठी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन होणार असे अभिजीत दीपके यांनी जाहीर केले होते. पण परवानगीसाठी अर्ज उशीरा आला असे तांत्रिक कारण सांगून पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली.
अगोदर दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करून काँग्रसचे व इंडिया आघाडीचे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याला पोलिसांनी कसे फरफटत नेले हे सर्व देशाने बघितले. आंदोलनात विरोधी पक्षाचे दोनशे- अडिचशे खासदार असताना पोलीस कशी वागणूक देत होते याचे दर्शन घडले. लोकशाहीत शांततेने आंदोलन करण्याचा हक्क घटनेने दिला आहे. जर राजकीय पक्ष किंवा कॉक्रोच जनता पा्र्टीने आंदोलन पुकारले तर त्यांना आंदोलनासाठी किंवा सभा- मेळावा घेण्यासाठी किंवा मोर्चा काढण्यासाठी पोलीसांनी जागा का निश्चित का करून दिली नाही ? दिल्ली ही देशाची राजधानी आहे. दिल्ली महानगराची लोकसंख्या दोन कोटी आहे. सर्व जाती- धर्माचे नि सर्व भाषिक लोक इथे राहतात. दिल्ली देशाची राजधानी आहे. सर्व देशांचे दुतावास आहेत. लहान मोठ्या उद्योग व्यवसायीकांची व समुहांची कार्यालये आहेत. राष्ट्र्रीय व आंतररा्ष्ट्रीय बँका, वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. सर्व प्रमुख राजकीय पक्षांची मुख्यालये आहेत. संसद भवन, राष्ट्रपती भवन सर्व केंद्रीय कार्यालये, पंतप्रधान, गृहमंत्री आदी अतिमहत्वाच्या व्यक्तिंची निवासस्थाने आहेत. मिडियाची कार्यालये व स्टुडिओ आहेत. अनेक पंचतारांकीत ऑफीसेस आहेत. अशा राजधानीच्या ठिकाणी आंदोलने, सभा, मेळावे, मोर्चे काढायला बंदी कशी घालता येईल ? दिल्लीचे जनजीवन विस्कळीत होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आंदोलनांवर काही भागात निर्बंध घालणे समजू शकते, पण आंदोलनाला परवानगी नाकारणे, आंदोलन रोखणे, चिरडणे हे सर्व कशासाठी चालले आहे. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना व भाजपाने व अन्य विरोधी पक्षांनी दिल्लीच्या रस्त्यांवर अनेक आंदोलने केली. बोट क्लब, जंतरमंतर, या जागा तर आंदोलनासाठीच होत्या. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मुले येणार हे ठाऊक होते, दोन लाख, पाच लाख की त्याही पेक्षा जास्त होणार याचा अंदाज येत नव्हता. म्हणून आंदोलक विद्यार्थ्यांनी दिल्लीकडे येऊच नये म्हणून हरियाणा, युपी, राजस्थान, पंजाबकडून दिल्लीकडे येणारे रस्तेच पोलिसांनी रोखले. देशाच्या विविध भागातून दिल्लीकडे येणाऱ्या अडिचशे ट्रेन रद्द केल्या. दिल्लीची साठ मेट्रो स्टेशन्स बंद केली. जंतरमंतरच्या चार कि. मी. परिसरात इंटरनेट खंडीत केले. देशाच्या राजधानीत प्रथमच असे घडले व तेही भाजपाचे केंद्रात सरकार असताना, याचे मोठे आश्चर्य वाटते. ज्यांनी सतत आंदोलने करून व सरकारवर सतत आरोपांच्या फैरी झाडून सत्ता मिळवली, त्या भाजपाला आज जेन झी च्या आंदोलनाची भिती का वाटावी ? आणिबाणीतही इंदिरा गांधींच्या काळात रेल्वे सेवा बंद झाली नव्हती. दिल्ली, मुंबई किंवा अन्य शहरातील वा राज्यातील बस सेवाही ठप्प नव्हती. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके, सौरभ दास किंवा आशुतोश रांका यांना तर पोलिसांनी दिल्ली विमानतळावर विमानात घुसून ताब्यात घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या कायदेशीर सल्लागार रत्नासिंग यांना दिल्लीत त्याच्या घरीच स्थानबध्द केले. विद्यार्थी नेता नेहा बोरा यांना अटक केल्यावर पोलिसानी त्यांना ज्या मोटारीत बसवले त्या भोवती पोलिसांनी तेयै मोटारी भोवती कडे केलेले दिसले. यू ट्युबर्स ध्रुव राठी यांना तर गुरूग्रामधील घरीच स्थानबध्द केले. तरीही भारत माता की जय अशा घोषणा देत हजारो झुरळे दिल्लीच्या रस्त्यावर उतरली व त्यांनीच पोलीस बळाचा कसा वापर करतात याचे व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे जगभर कुणाची बदनामी झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आंदोलक हे कुणी गुन्हेगार नाहीत, त्यांच्याकडे शस्त्रे नव्हती, मग त्यांना रोखण्यासाठी हजारो पोलीस रस्त्यावर कशासाठी तैनात केले ? ब’रिकेटसचे जाळे सर्वत्र का उभारले ? घराघरात जाऊन मुला मुलींना स्थानबध्द का केले ? दिल्लीत एक डझन डिटेंशन सेंटर्स उभारून काय साध्य केले ? एसआयआरमधे तेरा कोटी नावे वगळल्यानतर देशभर प्रक्षोभ निर्माण झालाय हे सरकारला अजून उमगले नसावे.
- डॉ. सुकृत खांडेकर
0 टिप्पण्या