🩺हेल्थ मंत्रा |🩺आरोग्य मंत्र |🩺
आदिवासींची दिंडा आता विज्ञानाच्या रडारवर; काय आहेत तिचे अफाट फायदे?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/10/2026 :
अरबटचरबट खाद्यांचा मारा होत असताना, अनेक पारंपरिक रानभाज्या हळूहळू आपल्या आहारातून दूर जात आहेत. म्हणूनच स्थानिक अन्नस्रोतांचं महत्त्व पुन्हा नव्यानं अधोरेखित होताना दिसतेय. अशा प्रसंगी दिंडासारख्या वनस्पतींचं पोषणमूल्य, पर्यावरणीय महत्त्व आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीतील स्थान यांचा अभ्यास करून त्यांची उपयुक्तता नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं नितांत गरजेचं आहे.
दिंडा का महत्त्वाची?
जंगलात, डोंगरकपारीत आणि माळरानांवर उगवणाऱ्या अनेक रानवनस्पतींचा उपयोग आदिवासी आणि ग्रामीण समाज पिढ्यान्पिढ्या अन्न व औषधांसाठी करत आला आहे. मात्र, गुंतागुंतीची आधुनिक जीवनशैली, बदलती पोषणमूल्यविरहित खाद्यसंस्कृती आणि विकासाच्या बकासुरी भुकेपायी नैसर्गिक अधिवासांचा झपाट्याने होत चाललेला ऱ्हास आदी कारणांमुळे अनेक उपयुक्त वनस्पतींकडे आपलं दुर्लक्ष होत आलं आहे. माणूस जसा शहरांकडे सरकतो आहे तसा त्याच्या निसर्गाशी असलेल्या जैविक संबंधात दुरावा निर्माण होतो आहे. अशा समयी पौष्टिक रानभाजी म्हणून ओळख असण्याबरोबरच पारंपरिक औषधोपचारांमध्येही उपयुक्त ठरणाऱ्या दिंडासारख्या (Leea macrophylla) रानवनस्पतींचा अभ्यास करणं, त्यांचं महत्त्व समजून घेणं आणि संवर्धन करणं आवश्यक आहे.
दिंड्याचा अधिवास कुठे?
वनस्पतिशास्त्रीय दृष्टिकोनातून दिंडा ही Leea macrophylla Roxb. ex Hornem या शास्त्रीय नावानं ओळखली जाते. ही वनस्पती पूर्वी स्वतंत्र लीएसी (Leeaceae) कुळात समाविष्ट केली जात असे; आधुनिक वर्गीकरणानुसार तिचा समावेश विटेसी (Vitaceae) या कुळात केला जातो. याच कुळात द्राक्षासारख्या परिचित वनस्पतींचाही समावेश होतो. दिंडा ही प्रामुख्यानं उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी झुडूप वर्गीय वनस्पती आहे. भारतीय उपखंडापासून दक्षिण-पूर्व आशियातील काही भागांपर्यंत तिचा नैसर्गिक प्रसार आहे.
अर्थातच रानभाजी म्हणून होणारा उपयोग हे दिंड्याचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य आहे.भारतात विविध प्रदेशांमध्ये तिला वेगवेगळ्या स्थानिक नावांनी ओळखलं जातं. काही भागांत तिच्या पानांचा, कोवळ्या भागांचा, फळांचा आणि मुळांचा उपयोग स्थानिक खाद्य परंपरेत केला जातो. आपल्याकडे दिंड्यासोबतच विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्या केवळ चवीतील विविधता वाढवत नाहीत, तर स्थानिक अन्नसुरक्षेतही महत्त्वाची भूमिका बजावतात. बाजारात उपलब्ध नित्याच्या भाज्यांपेक्षा वेगळ्या असलेल्या या वनस्पती स्थानिक जैवविविधतेचं आणि पारंपरिक ज्ञानाचं प्रतिनिधित्व करतात. दिंडा ही त्यापैकीच एक रानभाजी आहे.
पोषणमूल्यं किती नि कोणकोणती?
दिंड्याच्या पौष्टिक मूल्याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने २०२३ मध्ये प्रकाशित झालेला एक संशोधनलेख महत्त्वाचा आहे. या अभ्यासात वनस्पतीच्या मुळांचं आणि पानांचं पोषणमूल्य तसेच प्रतिऑक्सिडंट क्षमता तपासण्यात आली. संशोधकांना या दोन्ही भागांमध्ये कर्बोदकं, प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्त्व घटक आढळले. अभ्यासानुसार, पानांच्या नमुन्यांमध्ये सुमारे ९.३७ टक्के प्रथिनं, तर मुळांच्या नमुन्यांमध्ये सुमारे ८.७८ टक्के प्रथिनं नोंदवली गेली. त्याचप्रमाणे, पानांमध्ये आणि मुळांमध्ये कॅल्शियम, लोह, जस्त यांसारख्या खनिजांचंही अस्तित्व नोंदवण्यात आलं. हे पाहता, दिंड्यासारख्या रानभाज्यांमध्ये असलेल्या पोषण घटकांचा शास्त्रीय अभ्यास त्यांच्या आहारातील संभाव्य महत्त्वावर प्रकाश टाकतो आहे.
औषधी म्हणून मोल काय?
दिंड्याचा औषधी वनस्पती म्हणूनही पारंपरिक वापर केला जातो. भारतातील विविध आदिवासी आणि लोकवैद्यकीय परंपरांमध्ये या वनस्पतीच्या मुळांचा, पानांचा आणि इतर भागांचा वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोग केल्याच्या नोंदी आहेत.
♻️आरोग्य विषयक समस्या ♻️
0 टिप्पण्या