दसरा

 दसरा 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 20/10/2026 : आजचा दिवस म्हणजे नवरात्र सुफळ संपूर्ण झाल्याची नांदी देणारा दिवस. "दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा". आज विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत फार महत्वाचा दिवस म्हणून मानला जातो. विजयादशमीला "दसरा" असेही म्हटले जाते. 

    विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी  सिमोलंघन म्हणजेच गावाच्या सीमा, वेस  ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे . लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची प़ाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण आणि  विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा आहे. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते. तसेच ह्या दिवशी यंत्रांची पूजा होते आणि वाहनांचे पण धुवून, सजवून, हार घालून पूजन केल्या जातं.

        अगदी सुरवातीला  हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे.     

      शुभकार्यासाठी मानल्या गेलेल्या चांगल्या साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्ये करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी,सोन्याची खरेदी होते.           

    ह्याच विजयादशमीच्या दिवशी प्रभू  श्रीरामचंद्रांनी  रावणाचा वध केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. राघवाने रावणरुपी दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करून सुराज्यातील सुख अनुभवायला लावले.             

     ह्याच दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशीही आख्यायिका ऐकली आहे.पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपवून ठेवली होती. त्यापैकी गांडीव धनुष्य आणि काही बाण बृहन्नडेच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटाच्या गाई सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते. त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षवण केले जाते.  विजयादशमी या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्मंतक असे म्हणतात. ही पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत.     

   आपला भारत देश हा वेगवेगळ्या प्रांतात खूप विवीधतेने नटला आहे, सजला आहे. ह्या निरनिराळ्या प्रदेशात सणवार काही बाबतीत साधर्म्याने साजरे करतात तर काही बाबतीत मात्र स्वतःची अशी काही खास विवीधता आढळते. भारताच्या विविध प्रांतात खालीलप्रमाणे दसरा साजरा केल्या जातो.       

  उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत  कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रातील  नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात. कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.          

   गुजरात मधील सोमनाथ, द्वारका येथे दसरा मोठ्या उत्साहात साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.          

    छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.          

      महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया ह्या दिवशी विशिष्ट प्रकारची नृत्यकला सादर करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात. तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.    

      ह्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे,वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.      

     पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात. 

     दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू

कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, मधले तीन दिवस  सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धनधान्य, कला,शिक्षण  आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट म्हणून देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.तसेच आंध्रप्रदेशातील

 विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी जोडीने  देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून   कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हटले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते.        

   दसऱ्याच्या दिवशी सोन्याची (म्हणजे आपट्याच्या पानांची) देवघेव करून सायंकाळी उशिरा घरी यायची प्रथा आहे. ह्या दिवशी संध्याकाळी आपल्याहून वडील,आदरणीय व्यक्तींना सोनं म्हणजेच आपट्याची पाने अर्पण करुन आणि नमस्कार करुन आशिर्वाद घेण्याची प्रथा आहे. मोठ्या व्यक्ती पण आशिर्वादासोबत लहानग्यांना खाऊ देतात.          

        खरचं भारतीयं संस्कृती चं हेच खास वैशिष्ट्य आहे की हे सणवार, समारंभ आपआपंसातील कलह, वाद, किल्मीष विसरुन परत समेट घडवून आणण्यासाठी वातावरण निर्मिती करतात. ह्या सणांच्या निमीत्त्याने कित्येक दिवसात भेटीचा योग न आलेल्या भेटीगाठी होऊन आनंद, सुख देऊन जातात. ह्या सणामध्ये सिमोलंघनाला विशेष महत्त्व असल्याने आपण आपल्या मनातील दोषांचे, विकारांचे, हेवादावा, आकस ह्यांच सिमोलंघन करून त्यांना हद्दपार करुया. माझ्या समस्त नातलग, परिचीत, मित्रमंडळी तसेच माझ्या आपल्या लोकांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.

 कल्याणी बापट (केळकर)  9604947256

बडनेरा, अमरावती                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या