‼️बुऱ्हाणपूरची प्रेमकहाणी ‼️


‼️बुऱ्हाणपूरची प्रेमकहाणी ‼️ 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 23/10/2026 : बुऱ्हाणपूर शहर 'टूरिस्ट ॲट्रॅक्शन' च्या यादीत येत नाही, पण एकेकाळी मोगलांचा आग्रा दरबार या शहरात हलवला गेला होता. त्याकाळी बुऱ्हाणपूरला म्हणजे दक्षिणेकडे नेणारा दरवाजा असही म्हटलं जायचं. १६०१ साली अकबराने खानदेश जिंकल्यावर या शहराचं महत्व वाढतच गेलं. व्यापार वाढत गेला. हे झालं राज्य कारभाराच्या दृष्टीने. पण मोगल बादशहांच्या अनेक प्रेमप्रकरणांचा वारसा पण या शहराला मिळाला आहे. एरवी अत्यंत क्रूर आणि अरसिक समजला जाणारा औंरंगजेब १६३६ साली इथे आल्यावर हिराबाई नावाच्या नर्तिकेच्या प्रेमात इथेच आकंठ बुडाला होता. पण हिराबाई अल्पायुषी ठरली. तिच्या मृत्यू नंतर औरंगजेब दु:खाने व्याकुळ झाला. त्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या मूळ स्वभावावर गेला.

अकबराने बुऱ्हाणपूर जिंकल्यावर त्याचा कारभार त्याचा धाकटा मुलगा दानियलच्या हातात सोपवला. पण राज्यकारभार हाकणे त्याच्या स्वभावातच नव्हते. दानियल अत्यंत मद्यपी होता. त्याने बुऱ्हाणपूर जवळ 'आहूखाना' नावाची एक हवेली बांधली. याच हवेलीत व्यसनात बुडून त्याचा अंत झाला. याच दरम्यान अकबराचा मृत्यू झाला आणि राजपुत्र सलीम 'जहांगीर' नावाने सत्तारुढ झाला.

१६१७ साली त्याचा जहांगीर सलीमचा मुलगा राजपुत्र खुर्रमकडे बऱ्हाणपूरचा ताबा देण्यात आला. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्याने त्याचा मोठा भाऊ खुस्रोला संपवले. नंतरच्या काळात खुर्रमने पित्याविरुध्द बंड केले आणि बुर्‍हाणपूरची मालकी खुर्रमचा भाऊ परवेझ कडे आली. परवेझ हा दारूच्या व्यसनात बुडालेला होता. थोड्याच दिवसात त्याचाही अंत झाला आणि खुर्रम पुन्हा बऱ्हाणपूरचा सर्वेसर्वा झाला. १६२७ साली जहांगीरच्या मृत्यू नंतर मोगल साम्राज्य खुर्रमच्या हातात आले. 'खुर्रम' शहाजहान या नावाने मोगल सम्राट झाला.

१६३२ साली शहाजहानने बऱ्हाणपूरचा निरोप घेतला. पण त्याआधी तो एका नर्तकीच्या प्रेमात पडला होता. या नर्तकीचे नाव होते गुल-आरा. बऱ्हाणपूरच्या जवळच करारा गावात शहाजहानने दोन महाल बांधून त्या गावाचे नाव 'महल गुल आरा' असे बदलले होते. या नर्तकीच्या प्रेमात पडलेला शहाजहान अनेक रात्री याच महालात मुक्कामाला असायचा. या गावाच्या बाजूने वाहणार्‍या नदीत नाव घेऊन चांदण्या रात्री फेरफटका मारणे हा त्याचा आवडता विरंगूळा होता. या प्रेमप्रकरणाने शहाजहानच्या सासऱ्याचे युसुफ खानचे धाबे दणाणले. असेच चालू राहीले तर मुमताजच्या मुलांना सत्तेवर येणे कठीणच होते. असे म्हणतात की याच विचाराने शहाजहानच्या सासऱ्याने कपटाने गुल आराला नदीत बुडवून मारून टाकले. यानंतर काही काळातच मुमताज महलचा पण मृत्यू झाला. आधी उल्लेख केलेल्या आकुखान्यात सहा महिने मुमताजचे शव जतन करून ठेवण्यात आले. आग्र्याला ताजमहालात कबर तयार झाल्यावर मुमताजचे शव बुर्‍हाणपूरातून आग्र्याला हलवण्यात आले.

बुऱ्हाणपुरात आजही आहूखाना आणि गुलआरा महल या वास्तू बघायला मिळतात. पण ताजमहाल आग्र्याला असल्यामुळे पर्यटकांच्या यादीत बुऱ्हाणपूर हे नाव नसते. असंही म्हणतात की शाहजहानला ताजमहाल बुऱ्हाणपूरलाच तापी नदीच्या किनार्‍यावर बांधायचा होता. पण संगमरवराच्या त्या वास्तूचे वजन इथल्या मातीला झेपले नसते आणि राजस्थानातून संगमरवर इथे आणणे फारच महागात पडले असते, या विचाराने ताजमहाल पुढे आग्र्याला बांधण्यात आला. मुमताजच्या बाबाने गुलआराचा खून केला नसता तर कदाचित ताजमहालात मुमताज ऐवजी गुलआराचे थडगे बांधले गेले असते. मुमताजचा औरंगजेब गादीवर न येता गुलआराचा एखादा मुलगा बादशाह बनला असता आणि आज कदाचित हिंदुस्तानचा इतिहासही काही वेगळाच असता.

©️ बोभाटा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या