⛳ शूरवीर रामजी पांगेरा ⛳

 

⛳  शूरवीर रामजी पांगेरा  ⛳

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 21/10/2026 :

दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुरहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतले होते. त्यातीलच कण्हेरागड हा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. 

दिलेर हा अत्यंत कडवा आणि हट्टी सरदार होता. कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता. म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती. या तुकडीचा नेता होता रामजी पांगेरा. हा रामजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्या विरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी होता.

एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की, औरंगजेबाचा खास सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्या पुढे रामजीची फौज चिमूटभरच होती. खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामजीने आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामजीला वाघोबा चवताळून उठला. तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. 

दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. रामजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला, "मर्दांनो, खानाशी झुंजायचंय, जे जातीचे असतील म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते येतील. मर्दांनो, लढाल त्याला सोन्याची कडी, पळाल त्याला चोळी बांगडी" असे बोलून रामजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. 

मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन दिलेरखान आलाच. वणव्या सारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन मुरारबाजी देशपांडे आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामजीचा आवेश दारूच्या कोठारा सारखा भडकला होता.

अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामजीने दाखवून दिले की, मराठीयांची पोरे आम्ही भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला. कण्हेरागडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामजी पांगेरा. 

इतिहासाला त्याचं घर माहीत नाही, त्याचं गाव माहीत नाही, त्याचा ठाव माहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र माहिती आहे. आणि आज आम्हाला रामजीही माहिती नाही अन कण्हेरागडही माहीत नाही. कदाचित पुढे मागे संशोधकांना या रामजी पांगेऱ्याची अधिक माहिती कागदपत्रातून मिळेल. अन काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : महाराष्ट्राचा इतिहास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या