■ १८ ऑक्टोबर !अभिनेत्री शीला वाज जन्मदिन !

 

■ १८ ऑक्टोबर !अभिनेत्री शीला वाज जन्मदिन !

जन्म - १८ ऑक्टोबर १९३४ (दादर,मुंबई)

स्मृती - २९ जून २०२२ (मुंबई) 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/10/2026 :

'रमैया वस्तावैया’ पासून ‘लेके पहला पहला प्यार’ पर्यंत आपल्या नृत्याची छाप सोडणाऱ्या अभिनेत्री शीला वाज. जुन्या हिंदी चित्रपटांची गाणी म्हणजे केवळ गाणी नाहीत, तर त्या काळाची जिवंत आठवण आहेत. एखाद्या गाण्यातील नायक नायिका लक्षात राहतात, गायक गायिकांची नावं कायम स्मरणात राहतात; पण त्या गाण्याला आपल्या नृत्याने, हावभावांनी आणि अवघ्या काही क्षणांच्या उपस्थितीने वेगळं रूप देणारे अनेक कलाकार मात्र काळाच्या पडद्याआड जातात. शीला वाज हे त्यापैकीच एक नाव. राज कपूर आणि नर्गिस यांच्यावर चित्रित झालेलं 'श्री ४२०' मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणं आठवलं की डोळ्या समोर येते ती पावसातली छत्री, राज कपूर नर्गिसची जोडी आणि मुंबईच्या रस्त्यांवरचा तो काळ. त्याच चित्रपटातील ‘रमैया वस्तावैया’ हे गाणं आठवलं की गर्दीत नृत्य करणाऱ्या कलाकारात एक चेहरा विशेषत्वाने लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे शीला वाज.

शीला वाज यांची पडद्यावरील उपस्थिती काही क्षणांची होती; पण त्या काही क्षणात त्यांनी जे काही केलं, ते त्यांच्या नावाला कायमचं अमर करून गेलं. १८ ऑक्टोबर १९३४ रोजी मुंबईतील दादर येथे एका गोवन कॅथोलिक कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणा पासूनच त्यांना नृत्याची आवड होती. भारतीय शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतल्या नंतर त्यांच्या मनात चित्रपटसृष्टीत जाण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र त्या काळात मुलींनी चित्रपटात काम करणं ही सहज स्वीकारली जाणारी गोष्ट नव्हती. कुटुंबीयांचा विरोध होता. तरीही आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवत अवघ्या १७व्या वर्षी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. प्रसिद्ध नृत्यांगना मोहना कॅब्राल यांच्या जागी त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. तो काळ हिंदी चित्रपटसृष्टीतील नृत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. कुकू, रूपमाला, हेलन, मीनू मुमताज आणि कुमकुम यांसारख्या नृत्यांगना आपल्या शैलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होत्या. अशा स्पर्धात्मक वातावरणात शीला वाज यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला.

शीला यांच्या समोर सुरुवातीला हिंदी भाषेची एक मोठी अडचण होती. त्यांना हिंदी बोलता येत नव्हती. त्यामुळे चित्रपटातील गाण्यांवर नृत्य करताना गीतांचे बोल त्यांच्या सोयीसाठी रोमन लिपीत लिहून दिले जात. त्या शब्दांचा उच्चार समजून घेत आणि त्यावर आपल्या हावभावांची सांगड घालत नृत्य सादर करत. भाषा वेगळी होती, वातावरण नवं होतं; पण नृत्य ही त्यांची स्वतःची भाषा होती. आणि याच भाषेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. १९५१ मध्ये ‘शोकियाँ’ चित्रपटातून त्यांनी पार्श्व-नर्तिका म्हणून सुरुवात केली. पुढच्या वर्षी ‘माँ’ या चित्रपटात त्यांना स्वतंत्र नृत्य सादर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर एकामागून एक चित्रपट करत त्यांचा प्रवास सुरू राहिला. सुमारे ७० चित्रपटात त्यांनी काम केलं. 

शीला वाज यांचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवतं ते ‘रमैया वस्तावैया’. ‘श्री ४२०’ मधील हे गाणं आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका झोहरा सहगल यांच्याकडे होती. मुंबईच्या वरळी समुद्रकिनाऱ्यावर या गाण्याचं चित्रीकरण झालं. आजचा आधुनिक मुंबईचा चेहरा, उंच इमारती आणि वांद्रे-वरळी सी-लिंक यांचा त्या काळात मागमूसही नव्हता. त्या काळातील मुंबईचं साधं, मोकळं आणि वेगळंच रूप या गाण्यात पाहायला मिळतं. या संपूर्ण गाण्यात शीला यांची उपस्थिती फार मोठी नाही. पडद्यावर त्यांना मिळालेला वेळ अवघा एक मिनिटाच्या आसपास असला, तरी त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, हालचाली आणि नृत्याची सहजता प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. काही कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संपूर्ण चित्रपट मिळतो; काहींना मात्र काही सेकंद पुरेसे ठरतात. शीला वाज यांच्यासाठी ते काही क्षणच आयुष्यभराची ओळख बनले.

‘सी.आय.डी.’ चित्रपटातील ‘लेके पहला पहला प्यार’ हे एक गाजलेलं गाणं. देव आनंद आणि शकिला यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात शीला वाज यांचीही झलक पाहायला मिळते. मोहम्मद रफी, शमशाद बेगम आणि आशा भोसले यांच्या आवाजाने सजलेल्या या गाण्याला शीला यांच्या नृत्याने आणखी एक रंग दिला. गाण्यातील त्यांची छोटीशी उपस्थिती प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली, हेच त्यांच्या कलात्मक प्रभावाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.

आज एखाद्या कलाकाराने एखाद्या गाण्यात काम केलं की त्याची माहिती काही क्षणात इंटरनेटवर मिळू शकते. यूट्यूब, इन्स्टाग्राम, स्पॉटिफाय आणि इतर डिजिटल माध्यमांमुळे जुन्या कलाकृतींचा मागोवा घेणं तुलनेने सोपं झालं आहे. पण शीला वाज यांच्या काळात परिस्थिती अगदी वेगळी होती. त्या काळातील अनेक नृत्यांगनांना त्यांच्या कामाचं स्वतंत्र श्रेय दिलं जात नसे. गाणं प्रसिद्ध झालं की त्याची ओळख प्रामुख्याने नायक-नायिका, गायक-गायिका किंवा संगीतकारांच्या नावाशी जोडली जायची. पडद्याच्या मागे आणि गर्दीतील नृत्यदृश्यात आपली कला सादर करणारे कलाकार अनेकदा अनामिकच राहिले.

शीला यांच्या नावाच्या नोंदीतही वेगवेगळ्या स्पेलिंगचा वापर आढळतो. ‘Sheela’ आणि ‘Sheila’ अशा दोन्ही प्रकारे त्यांचं नाव लिहिलं गेलं. त्यामुळे त्यांच्या कामाचा अचूक मागोवा घेणं आणखी कठीण झालं.

आज आपण डिजिटल युगात जगतो. मात्र त्या काळातील कलाकारांच्या आठवणी शोधताना लक्षात येतं की, प्रत्येक कलावंतामागे एक अशी कथा आहे, जी कदाचित अधिक व्यवस्थित नोंदवली जाऊ शकली असती.

शीला वाज यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे ७० चित्रपटात काम केलं. ‘छोटे नवाब’ या १९६१ मधील चित्रपटातील ‘घर आजा घिर आये बदरा’ यांसारख्या गाण्यांमध्येही त्यांच्या कामाच्या आठवणी सापडतात.

त्यांच्या अभिनयाची दखल घेतली जात होती. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक गुरु दत्त यांनाही त्यांना आपल्या चित्रपटात घेण्याची इच्छा होती. मात्र १९६१ मध्ये शीला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला निरोप दिला. त्यानंतर त्यांनी ‘रमा लखनपाल’ हे नाव स्वीकारलं आणि चित्रपटसृष्टीपासून दूरच राहिल्या. चित्रपटसृष्टी मागे पडली असली, तरी त्या काळाच्या आठवणी मात्र त्यांच्या मनात जिवंत होत्या.

२००५ मध्ये मुंबईला आलेल्या महापुराने शीला यांच्या आयुष्यातील एक मोठी आठवणच हिरावून घेतली. त्यांच्या तळमजल्यावरील घरात पाणी शिरलं आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या काळाशी संबंधित अनेक वस्तू नष्ट झाल्या. जुन्या छायाचित्रा पासून ते आठवणींच्या वस्तू पर्यंत बरंच काही त्या पाण्यात वाहून गेलं. एखाद्या कलाकारासाठी त्याच्या कारकिर्दीशी जोडलेल्या वस्तू म्हणजे केवळ वस्तू नसतात. त्या त्याच्या आयुष्याचा एक काळ जपून ठेवलेल्या असतात. त्यामुळे त्या वस्तूंचं हरवणं म्हणजे भूतकाळाचा एक तुकडाच हरवण्यासारखं होतं.

पण इतिहासाची एक सुंदर गोष्ट आहे, वस्तू नष्ट होऊ शकतात, आठवणी नाही. आज अनेक दशका नंतरही ‘रमैया वस्तावैया’ सुरू झालं की शीला वाज यांची ती झलक नजरे समोर येते. ‘लेके पहला पहला प्यार’ ऐकलं की त्या काळातील त्यांच्या नृत्याची आठवण होते. त्यांचं नाव कदाचित त्या काळातील काही मोठ्या नृत्यांगना इतकं सर्वदूर पोहोचलं नसेल. त्यांच्या वाट्याला नेहमी मध्यवर्ती भूमिका किंवा स्वतंत्र प्रसिद्धी आली नाही. पण चित्रपटाच्या पडद्यावर मिळालेल्या छोट्याशा अवकाशालाही त्यांनी आपल्या कलेने अर्थ दिला. कारण कलाकाराची ओळख त्याला पडद्यावर किती वेळ मिळाला यावर ठरत नाही; त्या काही क्षणात त्याने प्रेक्षकांच्या मनावर किती ठसा उमटवला, यावर ठरते.

श्रीकांत जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)

माजी आमदार

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

==================


🌹✍️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या