नऊवारी साडीच्या पदरात लपलेली एका स्त्रीची संपूर्ण कहाणी 

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 18/10/2026 :

स्त्री म्हणजे नेमकं काय? फक्त नऊवारी साडी नेसलेली, कपाळावर कुंकू लावलेली आणि हातात हिरव्या बांगड्या घातलेली एक सुंदर मूर्ती नाही, स्त्री म्हणजे एका संपूर्ण घराचा श्वास, नात्यांचा आधार आणि संकटांच्या वादळातही न डगमगणारी एक अद्भुत शक्ती,

नऊवारी साडी नेसून मिरवणं सोपं असतं, पण त्या साडीच्या पदरात किती दुःखं लपवावी लागतात, हे फक्त ती साडी नेसणाऱ्या स्त्रीलाच माहीत असतं. तिच्या कपाळावरची टिकली सुंदर दिसते, पण त्या टिकलीमागे संसाराची काळजी असते. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र नात्याची खूण असतं, पण त्या नात्याला शेवटपर्यंत जपण्यासाठी तिने किती तडजोडी केल्या, याची साक्ष फक्त तिचं मन देऊ शकतं.

लग्नाआधीची ती मुलगी आणि लग्नानंतरची ती स्त्री यांच्यात किती मोठा प्रवास दडलेला असतो, माहेरच्या अंगणात मनसोक्त हसणारी, आईच्या कुशीत डोकं ठेवून रडणारी, वडिलांकडे हट्ट करणारी ती मुलगी एक दिवस दुसऱ्याच्या घराची लक्ष्मी बनते. नवीन माणसं, नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचं मोठं ओझं घेऊन ती संसारात पाऊल ठेवते.

कधी सासूच्या मनात जागा निर्माण करायची असते, कधी नवऱ्याच्या अडचणी समजून घ्यायच्या असतात, तर कधी मुलांच्या भविष्याची चिंता करत स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवायची असतात. घरात सगळ्यांच्या आवडी जपताना स्वतःच्या आवडीनिवडी कधी हरवून जातात, हे तिलाही कळत नाही.

घरात पैसा कमी पडला की ती स्वतःच्या इच्छा मारते. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या आवडीच्या वस्तू घेणं टाळते. नवऱ्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसली की स्वतःच्या डोळ्यांतलं दुःख लपवून त्याला धीर देते. घरात सगळे जेवून झाले की कधी कधी स्वतःच्या ताटात काय उरलंय, हे पाहून ती समाधान मानते.

पण गंमत बघा ना, तिच्या या त्यागाला अनेकदा तिचं कर्तव्य समजलं जातं, प्रेम नाही.

ती दिवसभर काम करते, तेव्हा कुणाला तिचा थकवा दिसत नाही. ती शांत राहते, तेव्हा कुणाला तिच्या मनातलं वादळ ऐकू येत नाही. ती हसते, तेव्हा सगळ्यांना वाटतं की ती आनंदी आहे; पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती अश्रू सुकले आहेत, हे विचारण्याची फुरसत कोणाला असते?

खरं तर प्रत्येक स्त्रीच्या मनात एक न बोललेली कहाणी असते. काही कहाण्यांना शब्द मिळतात, काहींना अश्रूंची वाट मिळते, तर काही कहाण्या आयुष्यभर तिच्या काळजातच गाडल्या जातात.

आणि म्हणूनच, एखादी स्त्री नऊवारी साडी नेसून उभी असते, तेव्हा तिच्याकडे केवळ सौंदर्य म्हणून पाहू नका. त्या साडीच्या प्रत्येक घडीत तिच्या संस्कारांचा सुगंध आहे, तिच्या आईने दिलेल्या शिकवणीची ऊब आहे, तिच्या संसारासाठी केलेल्या त्यागाची आठवण आहे आणि कितीही संकटं आली तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे.

कारण घराला घरपण देणारी स्त्री जेव्हा मनातून खचते, तेव्हा घराच्या भिंती उभ्या राहतात; पण त्या घरातला आनंद हरवू लागतो.

म्हणून आपल्या आयुष्यातील आई, बहीण, पत्नी, मुलगी किंवा कोणत्याही स्त्रीकडे पाहताना तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या मनाचा आदर करा. तिच्या कपड्यांपेक्षा तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करा. तिच्या चुका मोजण्याआधी तिने तुमच्यासाठी केलेल्या हजारो गोष्टी आठवा.

शेवटी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा...

नऊवारी साडी नेसलेली स्त्री सुंदर दिसते म्हणून ती खास नसते; तर त्या साडीच्या पदरात संपूर्ण कुटुंबाचं सुख जपण्याची ताकद असते म्हणून ती महान असते!

तिच्या चेहऱ्यावरचं हसू जपा, तिच्या मनातल्या भावना समजून घ्या आणि तिच्या स्वप्नांना तुमच्या प्रेमाचा आधार द्या. कारण संसार फक्त एका स्त्रीच्या त्यागावर चालू नये; तो स्त्री-पुरुषांच्या समान प्रेमाने, विश्वासाने आणि सन्मानाने फुलावा.

स्त्रीचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर संपूर्ण समाजाच्या संस्कारांचा आरसा आहे.

  क्रेडिट : सुजित गांवकर

 संकलन : प्रविण सरवदे, कराड



​

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या