Lagn Parampara : लोक काय म्हणतील? या एका प्रश्नावर अडून बसणाऱ्या समाजातले लग्न परंपरेचे भीषण वास्तव,

 

Lagn Parampara : लोक काय म्हणतील? या एका प्रश्नावर अडून बसणाऱ्या समाजातले लग्न परंपरेचे भीषण वास्तव,

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/9/2026 :

आजच्या प्रगत युगातही लग्न ( Lagn Parampara) हा दोन व्यक्तींच्या आनंदाचा विषय न राहता, तो ‘लोक काय म्हणतील’ या जुनाट मानसिकतेच्या ओझ्याखाली दबला जात आहे. नुकतीच एक मन सुन्न करणारी घटना घडली, जिथे सर्व काही योग्य असूनही केवळ समाजाच्या भीतीने एका सुंदर नात्याचा बळी दिला गेला. एक मुलगा आणि एक मुलगी, दोघेही सुशिक्षित, समजूतदार आणि स्वतःच्या पायावर उभे असलेले. त्यांच्यात संवाद झाला, एकमेकांबद्दल विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी एकत्र आयुष्य जगण्याचा सकारात्मक निर्णय घेतला.

ही गोष्ट जेव्हा पालकांपर्यंत पोहोचली, तेव्हा सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. पत्रिका जुळली, गुण जुळले, जात एकच होती आणि दोन्ही कुटुंबे सुसंस्कृत होती. मुलाचे करियर आणि स्वभाव उत्तम असल्याने मुलाच्या घरुन लगेच आनंदाने होकारही मिळाला होता. नात्याची वीण घट्ट होत असतानाच अचानक घरामध्ये ‘समाज’ आणि ‘नातेवाईक’ या शब्दांनी शिरकाव केला.

नात्यात अडथळा निर्माण झाला तो मामा आणि काकांच्या ( Lagn Parampara) स्तरावर सुरू झालेल्या चर्चेतून. त्यांचा आक्षेप मुलगा किंवा मुलीच्या कर्तृत्वावर नव्हता, तर त्यांचा एकच प्रश्न होता. “पाहुण्यांना काय सांगायचं? लोक काय बोलतील?” जिथे स्वभाव, भविष्य आणि कौटुंबिक स्थैर्य असे सर्व महत्त्वाचे निकष पूर्ण होत होते, तिथे अचानक बाहेरच्या लोकांचा आवाज घरातील हक्काच्या माणसांच्या निर्णयापेक्षा मोठा ठरला.

ज्या नात्यात कोणतीही उणीव नव्हती, ते नातं केवळ काल्पनिक सामाजिक प्रतिष्ठेसाठी आणि पाहुण्यांच्या टोमण्यांच्या भीतीपोटी तोडण्याचा निर्णय घेतला गेला. “हे लग्न पुढे नेऊ नये," या एका वाक्याने दोन स्वप्नांचा चुराडा झाला. ना मुलात काही कमी होती, ना मुलीत; ना जातीचा अडसर होता, ना गुणांचा. अडसर होता तो फक्त एका अदृश्य समाजाच्या दहशतीचा.

आज तो मुलगा आणि ती मुलगी एका शांत पोकळीत ढकलले गेले आहेत. त्यांचा गुन्हा फक्त इतकाच होता की त्यांनी समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीबाहेर जाऊन स्वतःच्या सुखाचा विचार केला होता. ज्या पाहुण्यांच्या नावाखाली हे नातं मोडलं गेलं, ते पाहुणे आज त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त असतील, पण त्या दोन जीवांच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीच भरुन निघणार नाही.

जर सगळं योग्य असूनही केवळ समाजाच्या भीतीने नाती मोडत असतील तर याला सुशिक्षितपणा म्हणायचा का? जेव्हा समाज हा जिवंत माणसांपेक्षा मोठा मानला जातो, तेव्हा तिथे माणुसकी हरलेली असते. या निर्णयामुळे त्या दोघांना जो मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, त्याची जबाबदारी ना समाज घेणार, ना ते पाहुणे. हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे की, आपण नक्की कोणासाठी जगतोय? जर आपण आपल्या माणसांच्या सुखापेक्षा लोकांच्या चर्चेला जास्त महत्त्व देत असू, तर आपण सुसंस्कृत समाजात नाही, तर एका भीतीदायक जंजाळात जगत आहोत, हेच या घटनेचे प्रखर (Lagn Parmpara) वास्तव आहे.

वर्षा कुलकर्णी

संकलन : यशवंत वाघ

**************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या