🍀 रानभाजी - तांदुळजा 🍀
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/9/2026 :
तांदुळजा (चवळाई,चवराई) ही शेतात तणासारखी व पसरट वाढणारी एक लहान, वर्षभर जगणारी औषधी वनस्पती आहे. ती पोकळा, माठ, राजगिरा यांच्या वंशातील असल्यामुळे त्यांची अनेक लक्षणे सारखी आहेत. याच्या कोवळ्या फांद्या व पानांची भाजी करतात. रक्तपित्त, वात, ज्वर, कफ व प्रदर इत्यादींचे निवारण करणारे गुण या वनस्पतीत आहेत. तिची भाजी शीतक (थंडावा देणारी), भूक वाढविणारी, वेदनाहारक व पथ्यकर असते.
*पाककृती*
# साहित्य- पालेभाजी १ जुडी, तेल, मोहरी, हिंग, हळद, लसणीच्या ४-५ पाकळ्या, लसूण पेस्ट, १-२ सुक्या लाल मिरच्या, भिजवलेली मूगडाळ पाव ते अर्धी वाटी, मीठ चवीनुसार.
# कृती- तांदुळजाच्या पाल्यातील पाने व कोवळी देठे निवडून घ्या. कढईत फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घालून ती तडतडली की क्रमाने हिंग, हळद, लाल सुक्या मिरच्या, लसूण पाकळ्या किंवा लसूण पेस्ट घालून थोडे परता. भिजवलेली मूगडाळ घालून एखादे मिनिट परता. निवडलेली व स्वच्छ धुतलेली भाजी घालून आता ती खमंग परतून घ्या. तीन-चार मिनिटांतच भाजी शिजते. तरी आपापल्या आवडीनुसार भाजी कमी जास्त शिजवू शकता. चवीनुसार मीठ घाला व थोडे परतून गॅस बंद करा. रुचकर, पथ्यकर, पचायला हलकी अशी तांदुळजा पालेभाजी तयार आहे. ज्वारीची भाकरी किंवा पोळी बरोबर खायला ही भाजी छान आहे.
स्त्रोत: मराठी विश्वकोश/द.सी. चौगुले
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या