स्वराज्यातील हेर गोदावरी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/9/2026 :
गोदावरी कुवारी असतांनाच हेरगिरी करायला लागली होती. तिचं जीवन संघर्षमयच होतं. कारण हेरगिरी करणं. ही एका पुरुषासाठी तेवढ्या प्रमाणात चिकाटीची गोष्ट नव्हती. परंतु महिलांच्या बाबतीत ती चिकाटीची गोष्ट होती. त्यातच तिनं आपल्याच शिकवणीतून दहा स्रिया हेर बनवल्या होत्या. ज्यात शत्रुंची माहिती त्या स्रिया खडान्खडा मिळवीत असे व त्या ती माहिती व्यवसाय करीत करीत स्वराज्यरक्षकाला पुरवीत असत. ज्यात सईसुद्धा होती.
हेरगिरी सांभाळता सांभाळता तिनं गावकऱ्यांचाही रोष पत्करला होता. अख्ख्या गावाला वाटत होतं, की गोदावरी हेरगिरी तर करीत आहे. परंतु हे हेरगिरीपण जेव्हा शत्रूला माहित झालं तर शत्रू तिलाच नाही तर अख्ख्या गावालाही सोडणार नाही. म्हणूनच अख्खं गाव तिच्या हेरगिरीपणाला विरोध करीत होता. हेच वाटत होतं तिच्या आईवडीलांनाही. त्यांनीही गावाच्या रोषावर उत्तर म्हणजे तिला हेरगिरीपासून वंचीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही त्या काळातील गोदावरी नावाचं ते इवलसं फुल आपल्या आईवडीलांचंही ऐकायला तयार नव्हतं. त्यातूनच गावाला वाटत होतं की तिच्यावर कुसंस्कार झालेले आहेत व होत आहेत.
शिवरायांची खास मर्जी असलेली गोदावरी. तिला खास नजराणाही शिवरायांनी दिला होता. परंतु शिवरायांची तिच्यावर खास मर्जी असूनही शिवरायांची विशेष देखरेख तिच्यावर नव्हती. मात्र बहिर्जी तिच्यावर खास लक्ष ठेवून होते व तेच तिला हुरूप द्यायचे. ज्यातून गोदावरीच्या मनाचा निश्चय पक्का झाला होता.
आपली मुलगी सुधारत नाही. हे लक्षात आल्यानं गोदावरीच्या आईवडीलांनी तिचा विवाह करण्याचं ठरवलं. तशी ती वयातही आली होतीच. वाटत होतं की तिच्या हेरगीरीची माहिती पंचक्रोशीत होण्यापुर्वी तिचा विवाह निपटून टाकायचा. नाहीतर तिच्या विवाहासाठी कोणीच तयार होणार नाही व तिच्याशी कोणीच विवाह करणार नाही. मग अशातच तिच्यासाठी एक पुण्यातील उपवर मुलगा चालून आला. ज्यानं तिला मागणी घातली होती.
गोदावरीला आलेलं ते स्थळ. तशी तिची विवाह करण्याची मनातून इच्छा नव्हतीच. वाटत होतं, की जर मी विवाह केला वा विवाहबद्ध झालीच तर माझ्या सासरकडील मंडळी मला हेरगिरी करु देणार नाही. खासकरुन पतीही माझा हेरगिरीला विरोध करेल. परंतु काय करणार, त्या काळात महिलांना विशेष अशी स्वतःचे निर्णय घेण्याची सूट नव्हती. त्यामुळंच ती विवाहाला तयार झाली व अशातच साखरपुडा आटोपला.
गोदावरीचा साखरपुडा जरी आटोपला असेल. परंतु तिनं हेरगिरी सोडली नाही. अशातच तिचा विवाहही तय झाला. त्यानंतर तिच्या विवाहाची तिथी उजाडली.
गोदावरी विवाहासाठी तयार झाली होती. तिच्यासाठी कपडे घेतले गेले होते विवाहाचे. सायंकाळी तिला हळदही लागली होती. फक्त तिची हळदीची चोळी तेवढी घालायची बाकी राहिली होती. ती दुसऱ्या दिवशी घालणारच होती.
गोदावरीच्या मनात विवाहाचा तीव्र आनंद होता व तोच आनंद तिच्या डोळ्यातून झळकत होता. सनई चौघडाही वाजायला लागल्या होत्या. घरी विवाहासाठी मंडप सजला होता. पाहुणे आले होते. सगळीकडे आनंदी आनंद होता आणि अशातच कधी न घडावं असं घडलं. एक दूत लग्नमंडपात वऱ्हाडी बनून आला. त्यानं तिला एक संदेश दिला. जो संदेश बहिर्जीनंच पाठवला होता. संदेशात लिहिलं होतं, 'उद्या पहाटे मुघलांची रसद पुरंदरला जाणार आहे. वाटेतील वाट दाखवायला कोणीतरी हवंय. नाहीतर आपलीच माणसं मारली जातील. आपल्याला शत्रूला भटकंवायचं आहे. ही वाट फक्त तुलाच माहित आहे. तुला शत्रुला भटकंवायचं आहे. ही जिकरीचं काम आहे व हे जिकरीचं काम तूच करु शकतेस. अन् हे स्वराज्याचं काम आहे.'
तो बहिर्जीचा निरोप. तो रात्री आलेला निरोप. घरात विवाहाचा आनंद. मंडप, तोरणं पताका सजलेल्या. अंगी स्वराज्याची निष्ठा. गोदावरीला विचार येत होता. एकीकडे स्वराज्य होतं तर दुसरीकडे स्वतःच्या विवाहाचा प्रश्न. काय करावं सूचत नव्हतं. नाही गेलं तर आपलीच स्वराज्यातील माणसं मारली जाणार. आपला विवाह होणार. परंतु स्वराज्यातील माणसं. अन् एकदा का स्वराज्य गेलं की बस, सारं संपलं. त्यातच ती विचार करु लागली होती दुसऱ्या अंगाने. समजा मी स्वराज्य रक्षणासाठी गेलेच तर आपली माणसं मला आपली म्हणणार नाही. माझा विवाह तुटेल. कदाचित मला घरातून हाकलूनही देतील. साऱ्या उत्साहावर पाणी फेरेल. काय करावे. कदाचित ही गोष्ट आपल्या आईवडीलांना सांगीतली तर...... तर माझे आईवडील ती गोष्ट माहित झाल्यानं मला स्वराज्यरक्षणाच्या कार्यावर जावू देणार नाहीत. ज्यातून स्वराज्याची माणसं वाचू शकणार नाहीत. मग कुठलं स्वराज्य असणार.
गोदावरी विचार करु लागली. त्यातच तिला त्या प्रकरणावर विचार करीत असतांना रात्रभर झोप लागली नाही. तशी अर्धी रात्र झाली. गाव संपुर्णतः झोपलं होतं. ती हळूच उठली. मनात विचार पक्का केला. विचार निश्चित झाला. आपला विवाह तुटला तरी चालेल. परंतु आपण स्वराज्यासाठी काम करायचं. आपल्याला घरातून हाकलून लावलं तरी चालेल. आपण सध्यातरी बहिर्जींनी सांगीतलेली कामगिरी करायची. मग ठरलं व बेतही ठरला. ती उठली. तिनं विवाहासाठी खास तयार केलेली हळदीची चोळी पेटीत ठेवली. त्यावर आपली हळदीची माळ ठेवली. अन् ती घराबाहेर पडली व आपल्या विवाहाचा विचार सोडून ती स्वराज्य रक्षणासाठी पुढे पाऊल टाकत पायवाट चालू लागली आणि असं करीत असतांना तिनं घरी एक चिठ्ठी ठेवली. ज्यात लिहिलं होतं, 'आई, मी कुठे जात आहे, हे तुलाही सांगू शकत नाही. सांगीतलं असतं तर तूच अडवलं असतं. माझी पाऊलवाट अडवली असती. मात्र एक की मी स्वराज्यासाठी जात आहे. सायंकाळपर्यंत परत येणार आहे आणि ही हळदीची चोळी स्वराज्याचं काम पुर्ण करुन आल्यावर नेसतेच.
ते ध्येय. ते ध्येय होतं, तिच्या मनातील मातीत अंकुरलेल्या स्वराज्यनिष्ठेचं. ती पेटून उठली होती, स्वराज्यनिष्ठेनं. ज्या स्वराज्यनिष्ठेनं तिचं मन तयार झालं होतं. बाहेर अंधार होता. बाहेर पाऊसही सुरु होता. सगळं गाव स्मशानागत झोपलं होतं. कुत्री भुंकत होती. परंतु तिनं त्याची तमा बाळगली नाही. स्वराज्यनिष्ठेच्या ध्येयानं तिला पछाडलं असल्यानं ती वाट चालू लागली व वाटेतील सर्व रस्ते रात्रीच्या अंधारात स्पष्टपणे दिसत होते तिला.
तो पुरंदरचा घाट. ती घाटाची वाट चालत होती. एकेक पाऊल टाकत होती. त्यातच तिनं आपल्या सैन्याला घाटाची वाट दाखवली त्या अंधाऱ्या रात्री, आपल्या होणाऱ्या विवाहावर पाणी फेरुन. ज्यातून १६५६ ला पुरंदर शिवरायांना जिंकता आला होता.
शिवरायांनी पुरंदर जिंकला. कोणामुळं जिंकला हेही शिवरायांना कळलंच नाही. ज्या रणरागीणीनं आपल्या विवाहाचा विचार न करता पुरंदर शिवरायांना जिंकून दिला. तेही शिवरायांनी तपासलं नाही. त्यातच तिनं जेव्हा परतीची वाट धरली. तेव्हा कोणीही तिला निरोप द्यायला आला नाही. ना ही तिला कोणी वाजत गाजत पुरंदर किल्ल्यावरुन पाठवलं होतं.
पुरंदर जिंकला होता शिवरायांनी गोदावरीच्या प्रयत्नातून. त्यानंतर गोदावरीचा सत्कारही केल्या गेला नव्हता. तरीही गोदावरी निराश झाली नाही. कारण स्वराज्यनिष्ठा तिच्या मनात कुटकूट भरली होती. ती परत फिरली व परत येतपर्यंत दुसरा दिवस उजळला होता.
दुसरा दिवस उजळला. गडावरील सगळे सैन्य आनंदात होते. मात्र गोदावरीच्या घरी आनंद नव्हता. कारण ती मंडपात नव्हती. कुठं गेली असेल? या प्रश्नांकित नजरेनं सगळे घायाळ झाले होते. त्यातच वर व वराकडील आलेले पाहुणे मंडळी विचलीत झाले होते. ते नाना तऱ्हेची दुषणं लावत होते गोदावरीवर आणि तिच्या कुटुंबावर. त्यातच कितीतरी वेळ वाट पाहूनही गोदावरी परत न फिरल्यानं पाहुणे आले तसे परत गेले होते.
गोदावरी जेव्हा घरी परत आली, तेव्हा ती रडत बसलेली होती. लाल हळदीची चोळी पेटीवर पडलेली होती. कोणीही तिला विचारत नव्हतं. तो दिवस व त्या दिवशी पुरंदर वाचला. परंतु गोदावरीचा आनंद, तिचं सामान्य आयुष्य त्या सिंहगडाच्या मातीत असलेल्या डोणजे गावातील विवाहाच्या मंडपात विरुन गेलं होतं. पुरंदर वाचला होता. परंतु तो वाचला असला तरी तिच्या आयुष्याची राखरांगोळी झाली होती. तिचं आयुष्य उध्वस्त झालं होतं. तिचा विवाह तुटला होता.
गोदावरी पुरंदरवरुन घरी आली. तसं रडत असलेल्या आईचं लक्ष तिच्याकडे गेलं. तसं तिनं दुर्लक्ष केलं. ते पाहून गोदावरी आईजवळ गेली व आईला म्हणाली,
"आई, मला क्षमा कर. मी स्वराज्यासाठी गेली होती. पुरंदर जिंकायचा होता. आपल्या सैन्याला वाट दाखवायची होती. माहित आहे, मी जर नसती गेली तर आपलेच सैनिक मरण पावले असते. पुरंदर जिंकताही आला नसता. विवाह काय, कधीतरी होईलच. परंतु पुरंदर जिंकण्याची अशी नामी संधी कधीच आली नसती. आई, मी विवाहाची लढाई हरले. परंतु पुरंदरची असलेली स्वराज्यनिष्ठेची लढाई मी जिंकलेली आहे."
लेकीनं बोललेले विवाहाचे शब्द. ते पाहून रडत असलेली गोदावरीची आई, ती आई रडतरडतच म्हणाली,
"बाळ, खरं आहे, तुझं म्हणणं. अगं, तू अगदी थोराचं कार्य केलेलं आहेस. तुझ्यामुळेच काल पुरंदर जिंकता आला. तू स्वराज्यनिष्ठा बाळगली. परंतु समाज हे कधीच बघत नाही. समाज बघतो, एका स्रीकडं एका कुत्सीत भावनेनं. त्यांना स्रीचं चांगलं कार्य कधीच आवडत नाही. त्यांना आवडतं, एका स्रीचं चूल आणि मुल. हा समाज एका स्रीला तिच्यामध्ये असलेल्या चूल आणि मूल, याच भुमीकेत बघतं. ते बघतांना त्यांना आनंद होतो. त्यासाठीच ते विवाह देखील करतात. परंतु जर असं काम करायला एका एका स्त्रीने नाकारलं आणि तिनं स्वराज्यनिष्ठेसारखं दुसरंच कार्य केलं, तर ते कार्य समाजाला कधीच आवडत नाही. त्या कार्यामुळेच समाज बदनामी करतो एका स्रीची. पोरी, मला अभिमान आहे तुझा. तू केलेलं कार्य मला आवडलं. आता समाज यापुढे तुला काहीही म्हणो, मी कधी काहीच म्हणणार नाही." ते गोदावरीच्या आईचे बोल. ती आई शिकली नव्हती. परंतु ती जे काही बोलली. त्यातून तिला हुरुप आला होता. ज्यातून ती पुढील स्वराज्यनिष्ठेचं कार्य करण्यास प्रेरीत झाली होती.
अंकुश शिंगाडे
====================
0 टिप्पण्या