🔹 सांस्क्रूतिक कार्यक्रम 🔹
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 7/9/2026 : अष्टमीला दहीहंडी कार्यक्रमात अश्लील नृत्य (?) करणाऱ्या बायका पोरी नाचवल्या म्हणून नापसंती व्यक्त करणाऱ्या अनेक पोस्ट पाहण्यात आल्या. गंमत वाटली. कथित धर्ममार्तंड, धर्माचे म्होरके, साधू संन्यासी, वारकरी संप्रदायातले हभप पुढारी, कथित संत, शंकराचार्य, धर्माचा पदर पसरून मते मागणारे धर्माचे कार्ड खेळणारे राजकीय पक्ष, त्यांचे समर्थक, धर्मप्रेमी नागरिक यापैकी कुणी काही बोलत नाहीये. सुधारणावादी विवेकी लोकांना फार खाज असते, नको तिथे तोंड घालण्याची. ज्यांना दुखले पाहिजे, रुतले पाहिजे ते मिटक्या मारत शांत बसून आहेत! तुम्ही का गळे फाडून घेताय! सो चिल डाऊन! असो. ही पोस्ट त्याविषयी नाही.
नाचणाऱ्या बायका मुलींना इथे कोण आणतो आणि त्यांना का आणले जाते, कसे नि कोठून आणले जाते याची एक सुनियोजित यंत्रणा आहे, याचे एक अर्थकारण आहे. ह्यात एक शोषण व्यवस्था आहे. ती अशा स्तराला गेली आहे की तिथून माघारी फिरणे जवळपास अशक्य आहे. डान्सर्स, कॉलगर्ल्स, प्रॉस्टीट्यूट्स यांची झाडाझडती घ्या असं कुणी म्हटलं की लगेच बांगलादेशींचा मुद्दा पुढे केला जातो. हे विषयाला वळण देण्यासाठी केले जाते.
माया मगर नावाची एक डान्सर आहे. तिची महिन्याची कमाई काही लाखांच्यापुढे आहे! ती राहते नेपाळच्या पालपामध्ये. काय आहे हे पालपा? इथे डान्सर मुली अरेंज करून देणारे ऑर्गनायझर्स आहेत. बुटवाल, गंडकी, सिद्धार्थनगर, लुम्बिनी इथे यांच्या चेन्स आहेत. लाखे, सोरटी, कौदा हे इथले स्थानिक नृत्याविष्कार. ह्या डान्सच्या नावाखाली मुलींची जमवाजमव होते आणि त्यांना एस्कॉर्ट केले जाते बिहारमध्ये. तिथून त्या आणल्या जातात उत्तरप्रदेश, बंगाल, झारखंड, हिमाचल, आसाममध्ये. तिथून त्या देशभरात फिरवल्या जातात. त्यात स्थानिक भारतीय मुलींचा भरणा केला जातो. ग्रुप तयार केले जातात. सारा खेळ काराओकेवर असतो. कधीकाळी डान्सबारमध्ये नाचणाऱ्या बायकांना हाताशी धरून यांचे प्रशिक्षण केले जाते. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बंगालमध्ये रीतसर मुली शिकवल्या जातात. त्याच बरोबर त्यांना अन्य काही कलांमध्ये पारंगत केले जाते.
डीजे, लेसर, प्लास्मा, स्टेज, कराओके, ऑर्केस्ट्रा, बॉडीगार्ड्स, बाउन्सर्स, ट्रान्सपोर्टेशन व्हेईकल्स, पँट्री, मेकअप आर्टिस्ट्स, मॅनेजर्स, दलाल, भडवे, कार्पोरेट डिलर्स, सरकारी कनेक्टर्स, पॉलिटिकल क्रिमिनल नेक्सससाठी हाताशी धरलेले गुंड आणि सरते शेवटी आयोजक अशी एक मोठी साखळी काम करत असते. यांचे प्रत्येकाचे पैसे असतात. कमिशन ठरलेले असते. नाचणाऱ्या पोरींचे शोषण केले जाते तो आणखी वेगळा विषय. कोरी पोरगी आणली जाते तिची चीर काढण्याचे विधिवत काम या गदारोळात केले जाते. हे अगदी पॉईंट टू पॉईंट मॅनेज केलेले असते.
आयोजक पैसा गोळा करतात, कसा गोळा करतात. स्पॉन्सर्स शोधले जातात किंवा त्यांना दम देऊन उभे केले जाते! वर्गण्या गोळा केल्या जातात. ईललीगल धंदे करणाऱ्या एलिमेंट्सकडून खंडणी गोळा केली जाते. बड्या धेंडांकडून प्रोटेक्शन मनी वसूल केला जातो. अवाढव्य स्टेज. भव्य लाईट्स. कानठळ्या बसवणारे डीजे लावले जातात. मुलींना स्पेसिफिक ठिकाणी उतरवले जाते. खाट आणि ताट यांचा मेळ घातला जातो.
इन्स्टा फिन्स्टावर अर्धनागव्या बायका पाहून पिसाळलेले हजारो पोरं कुठेही कधीही जमा होऊ शकतात इतकी आपली लोकसंख्या! हजारो पोरं अधाशागत बाया पाहताच चेकाळु लागतात. बीभत्स हावभाव करू लागतात. कावडयात्रेत लिंगोत्तेजक इशारे करणारी बारकाली पोरं आपण सगळ्यांनी पाहिलीत. कुणी शिकवलं त्यांना हे? कुठे पाहिलं त्यांनी हे? एक काळ होता की लघवीच्या इंद्रियातून वीर्य येतं हे कळायला मिसरूड फुटावे लागायचे! आता पाच सहा वर्षाचं शेम्बडं पोरगं देखील त्याच्या डाव्या हाताच्या अंगठा तर्जनीच्या भोकात उजव्या हाताची तर्जनी घालून आपला विकास झाल्याचे सिद्ध करताना दिसते! हे असलं पब्लिक खंडीभर उपलब्ध आहे! त्यांना हवा असतो डीजे, त्यांना हव्या असतात बायका! त्यांना पाहायचे असतात त्यांचे अश्लील चाळे आणि उन्मादक इशारे!
मधल्या तीन दशकात खऱ्या लावणी कलावंतांना पद्धतशीर देशोधडीला लावण्यात आले आणि त्यांची जागा घेतली, बाजारबसव्या कंबरहलव्या बायका पोरींनी! यांनी लावणीच्या अमृतात माती कालवली! एक अख्खी लोककला पांचट केली. दरम्यानच्या काळात लोकनाट्य कला केंद्रे कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशा गतीने सगळ्या राज्यात फोफावली. काहींनी खुले आम धंदा मांडला. कला, नृत्य, नैतिकता, कदर, इमान आदी गोष्टींचे कडबोळे बायकांनी आणि त्यांच्या दलालांनी लिंगपिसाटांच्या शिंगात खोवली, त्यांच्या शेपट्या अशा काही पिरगाळल्या की, आसपास काय घडतेय हे लोकांना कळलेच नाही! लोक खुश राहिले डान्सबार बंद झाले म्हणून पण प्रत्यक्षात डान्स बार तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दाराशी आणून उभे केले गेले! काहींना वाटेल की ही फुकटची मजा का टाळायची? लोकहो ह्यात तात्काळ आर्थिक झळ बसत नाही, पण ती पोरं वाहवत जातात! ही काय कमी किंमत आहे का?
आता पुन्हा एकदा माया मगरकडे वळूया! आपल्या देशाला डॉक्युमेंटेशनचे वावडे आहे. ब्रिटिश हे काम चोख करायचे. पूर्वी देशभरात रेड लाईट एरियात नेपाळी मुली असायच्या. चार दशकापूर्वी त्यात बंगाली मुलींचा भरणा लक्षणीय वाढला. नव्वदच्या दशकात आलेल्या डान्सबारमध्येही बंगाली आणि नेपाळी मुली मोठ्या प्रमाणात होत्या. मात्र दोन दशकापासून यातील नेपाळी बायका गायब होत गेल्या! त्या कुठे गेल्या? 2017 मध्ये नेपाळने एक कायदा केला की, त्यांच्या देशातील कोणत्याही व्यक्तीला खास करून महिलांना घरगुती कामासाठी आखाती देशात जाता येणार नाही! हा कायदा करण्याचे कारण म्हणजे नेपाळी बायका कुठे गेल्या याचे उत्तर होते! ह्यावरही उत्तर शोधण्यात आले. ज्या बायकांना आखाती देशात पाठवायचे असेल त्यांना आधी बिहारमध्ये पाठवले जाऊ लागले. शंभरातील दहा मुली आखातात आणि नव्वद मुली ऑर्केस्ट्राच्या दलदलीत रुतवल्या जाऊ लागल्या. ह्या मुली स्थानिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढू लागल्या आणि पाहता पाहता ह्या बिझिनेस मॉडेलचा आता भस्मासुर झालाय!
वाढत्या संख्येतल्या मुलींना काम द्यायचे म्हणजे नवे फंडे अंमलात आणले पाहिजेत! मग मागणी वाढवण्यासाठी गावोगांवच्या यात्रा जत्रेत, धर्मिक सोहळ्यात पोरी नाचवणे सुरू झाले! लग्नकार्यात नाचणाऱ्या पोरींचे हजारो ग्रुप्स बनवले गेले. बारात, हळदी मध्ये नाचणाऱ्या पोरी हे दृश्य नॉर्मल झाले! तिथेही संख्या वाढली तेव्हा पुन्हा मागणीचा परीघ विस्तारला गेला. कावड पासून दहीहंडीपर्यन्त हे पीक आता मुबलक घेतले जाते. बिहारमधील काही ओपन टू ऑल अशा कार्यक्रमात संपूर्ण विवस्त्र बायका नाचवल्या गेल्यात. आपल्याकडेही ती प्रगती होईल. हे आता आऊट ऑफ कंट्रोल गेले आहे.
हे सारे घडत असताना पोलिस परवानग्या घेतलेल्या असतात, त्यांचे शीर्षक असते 'सांस्कृतिक कार्यक्रम'! तुम्ही अन्य हेड बॅनरखाली परवानगी मागितली तर खळखळ केली जाते. ते तर काय करणार! कधीकधी बारीक चिरीमिरी त्यांनाही दिली जाते. डेसिबल कोणाच्या बापाला मोजायचे असतात ! नंगा नाच साजरा होतो. कधी स्टेजवर शिवाजी राजांचे, देवीदेवतांचे पोस्टर्स असतात! कुणालाच काहीच वाटत नाही! खुद्द शिवाजी राजांचे वंशज म्हणवून घेणारे देखील यात सामील दिसतील! माझे म्हणणे पटत नसल्यास शिवेंद्रसिंह राजे, एकनाथ शिंदे, राम कदम यांची दही हंडी पाहून घ्या! अशी किती तरी नावे घेता येतील.
ह्यात आणखी काही धंदे चालत असतात. शोमध्ये आणलेल्या पोरींपैकी एखादी आवडलेली कळी कुणी आपल्या शेतावर ठेवून घेतो आणि इथली एखादी गरजवंताची पोर घुंगरांच्या वाट्याला लावली जाते! हे अतिशय नियोजनपूर्वक होते. मीडियावाले बातम्या लावतात- दणदणाटात गोविंदा बेफाम! ह्या सगळ्या गर्दीत तो बिचारा निरागस बाळकृष्ण सारा भवताल सोडून कधीच निघून गेलेला असतो हे कुणालाच कळत नाही!
काहींना वाटेल की, ह्या दलदलीतून मुली का बाहेर पडत नाहीत? मुलींना आधी फक्त नाचवलं जातं, काही दिवसांनी मग झोपवलं जातं. 12 ते 16 वयोगटातल्या मुलींना शारिरीक अंगे मोठी दिसावीत म्हणून इंजेक्शन्स दिली जातात. मुलींना अल्पावधीत विकलं जातं. त्यांचा ठावठिकाणा लागू नये म्हणून सातत्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवलं जातं. मुलींसाठी ग्राहक शोधणारे दलाल, त्यांची खरेदी विक्री करणारे बायका पुरुष इतक्या सहज वावरतात, की जणू काही शेळ्यामेंढ्यांचा सौदा केला जातो! जे लोक हमबिस्तर होण्यासाठी येतात त्यांना ते सत्कृत्य तिथेच त्या घरात करावे लागते. मुलगी बाहेर नेता येत नाही. ह्या मुलींना व्यसनेही लावली जातात जेणेकरून त्या परावलंबी होतात. काही वर्षांनी त्या घराचा, नातलगांचा विषय विसरून जातात. ज्या मुली गर्भवती राहतात, त्यांचा गर्भपात केला जात नाही. त्यांची प्रसूती होऊ दिली जाते. ज्याने सलगी दाखवून तिला गर्भार केलेलं असतं, तो मुलं विकणाऱ्या रॅकेटचा घटक असतो. या बाळांना बॅायफ्रेंड बेबी असा कोडवर्ड दिला गेलाय. दशकभरासाठी यांचा वापर झाल्यानंतर त्या गायब होतात. त्यांचे पुढे काय होते, त्यांना कुठे नेले जाते याचा कुणीही शोध घेत नाही. चकचकीत कपडे, खायला प्यायला रग्गड गोष्टी, टेचात केलेला मेकअप आणि सुरूवातीच्या दिवसांत हाती खेळणारा पैसा या गोष्टींना गरीब भुकेल्या मुली भुलतात आणि कायमच्या हरवून बसतात.
आता उत्सव सण यांच्या दरम्यान आपण जे काही करत आहोत ते धर्माच्या पार्थिव परंपरांवरची बळजोरी आहे! खरा धर्म आणि अध्यात्म अशा सोहळ्यातून कधीच निघून गेलेय! सबब धर्मभ्रष्ट होत असल्याची ज्यांना वेदना व्हायला पाहिजे ते देखील गपगार पडून आहेत आणि खंत व्यक्त करणाऱ्यानीही हे ध्यानात ठेवावे की, इथे बायका नाचवण्याविषयी तुम्ही निषेध व्यक्त करण्याने आता काहीही होणार नाही! नाचणाऱ्या बायका पोरीत आपल्या जवळची एखादी पोर असू नये, तिथे जाऊन चेकाळणाऱ्या पोरात आपल्या घरचा मुलगा असू नये, इतकी काळजी फारतर घ्यावी!
✍️समीर गायकवाड
0 टिप्पण्या