१८ जिल्हे दुष्काळसदृश; मंगळवारी मदतीवर सरकारचा निर्णय,
वृत्त एकसत्ता न्यूज
मुंबई दिनांक 13/9/2026 :
संबंधित जिल्ह्यांकडून सोमवारपर्यंत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांसाठी मदत आणि आवश्यक उपाय योजनांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.
*दुष्काळसदृश १८ जिल्हे कोणते?*
राज्यातील अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबार या १८ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती सारखी नसून भौगोलिक परिस्थिती, पावसाचे प्रमाण, पिकांची अवस्था आणि नुकसानीचे स्वरूप वेगवेगळे आहे. त्यामुळे जिल्हानिहाय सविस्तर माहितीच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
*उपग्रह छायाचित्रांद्वारे नुकसानीचे मूल्यांकन*
नुकसानीचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी प्रशासनाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. उपग्रह छायाचित्रे आणि डिजिटल प्रतिमांच्या माध्यमातून पिकांची स्थिती तपासली जात आहे.
सध्या प्राथमिक सर्वेक्षण सुरू असून, जिल्हानिहाय अहवाल प्राप्त झाल्यानंतर नुकसानीचे अधिक अचूक चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती नुकसान झाले आहे, याचे मूल्यांकन करण्यासाठी पारंपरिक पाहणीसोबत तंत्रज्ञानाचाही आधार घेतला जात आहे.
*मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, हळदीला फटका*
मराठवाड्यातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत विविध खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
या भागात सोयाबीन, कापूस, हळद, उडीद आणि मूग या पिकांवर पावसाच्या कमतरतेचा परिणाम झाला आहे. पावसाने दिलेल्या उघडीपेमुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून, काही भागांत उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे,
0 टिप्पण्या