📖✒️"थँक यू" माणसं जोडणारी दोन जादूई अक्षरे.!✍️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/9/2026 :
माणसाला जन्माला आल्यावर ओळख आणि संपत्ती सहज मिळवता येते. पण आयुष्याच्या शेवटी आपल्यासोबत नक्की काय उरतं? आपण कमावलेली मालमत्ता की आपण जोडलेली माणसं? रोजच्या धावपळीत आपण बरेचदा विसरतो की, माणसाच्या आयुष्याची खरी कमाई ही त्याने लोकांच्या चेहऱ्यावर फुलवलेल्या हास्यात असते.
माझ्या आजवरच्या अनुभवातून मला एक गोष्ट प्रकर्षाने शिकायला मिळाली, जगामध्ये त्रास देणारे किंवा चुका काढणारे खूप सहज भेटतात; पण कोणाचे दुःख शांतपणे समजून घेणारे फार कमी असतात.
मदत करणे म्हणजे फक्त आर्थिक देवघेव नव्हे. अनेकदा पैशांपेक्षा भावनिक आणि मानसिक आधार जास्त मोलाचा ठरतो. एखाद्या निराश झालेल्या माणसाला "मी आहे तुझ्यासोबत" हे दोन शब्द किंवा शांतपणे ऐकून घेणारे कान मिळाले, तरी त्याचा अर्धा भार हलका होतो. आपल्या छोट्याशा सहानभूतीने जर कोणाच्या चेहऱ्यावर हसू फुलत असेल, तर त्यातून मिळणारा आनंद कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो.
रोजचा दिवस आपल्यासोबत अनेक माणसांची साथ घेऊन येतो. घरातून निघाल्यापासून ते संध्याकाळी परत येईपर्यंत, रस्ता दाखवणारा, गाडी चालवणारा, चहा देणारा, कामाच्या ठिकाणी मदत करणारा सहकारी, अगदी आपली सेवा करणारा प्रत्येक लहान-मोठा माणूस. हे सर्व आपल्या आयुष्याचा भाग असतात. या सर्वांना जर आपण मनमोकळेपणाने थँक यू म्हणायची सवय लावली, तर एक सुंदर चमत्कार घडतो,
जेव्हा तुम्ही मनापासून कोणाचे आभार मानता, तेव्हा एकाच वेळी दोन चेहरे आनंदाने खुलतात, एक समोरच्याचा, ज्याला कामाची पोचपावती मिळाली; आणि दुसरा तुमचा स्वतःचा, ज्याच्या मनात कृतज्ञतेचा आनंद निर्माण झाला. या साध्या गोष्टीसाठी एक रुपयाही खर्च करावा लागत नाही; लागतात ते फक्त ओठांवरचे गोड शब्द आणि थोडेसे सौजन्य.
आयुष्य हे एका आरशासारखे असते; आपण ज्या भावनेने पाहतो, तीच भावना ते आपल्याला परत देते. आपण लोकांना जितका आदर, आधार आणि आभार देऊ, तितकेच ते द्विगुणीत होऊन आपल्याकडे परत येते. आपण स्वतः इतरांचे आभार मानले, तर नक्कीच आपले आभार मानणाऱ्यांची संख्या वाढेल. आयुष्य सुंदर आहेच, फक्त ते कसे जगायचे हे आपल्या हातात आहे. म्हणून चला, आजपासूनच मनापासून "थँक यू" बोलायला सुरुवात करूया.
©️श्रद्धा धनेश डायरी
संदर्भ : बोभाटा,

0 टिप्पण्या