🩺हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |🩺
हातापायाला सतत सुज येते? 'या' गोष्टींचा संबंध असू शकतो असा तुम्ही कधी विचारही केला नसेल, पाहा काय होतं
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/9/2026 :
हात-पायांना वारंवार सूज येत असेल तर ती केवळ थकवा किंवा जास्त वेळ उभे राहिल्यामुळेच येते असे समजू नका. कधी कधी शरीरात जास्त द्रव साचणे, रक्ताभिसरणातील अडथळे किंवा एखाद्या आरोग्य समस्येमुळेही हात-पाय सुजू शकतात. सूज किती दिवसांपासून आहे, दोन्ही हात-पायांना आहे की एका बाजूला, तसेच त्यासोबत वेदना, लालसरपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होतो का, यावर कारणाचा अंदाज घेता येतो. खूप वेळ एकाच जागी बसणे किंवा उभे राहणे हे हात-पायांना सूज येण्याचे सामान्य कारण आहे. बराच वेळ बसून काम केल्याने पायांमधील रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो आणि पायांच्या भागात द्रव साचू शकतो. प्रवासादरम्यान किंवा दिवसभर उभे राहिल्यानंतरही काही जणांना पाय आणि घोट्याजवळ सूज दिसू शकते. आहारातील मीठाचे प्रमाण जास्त असणे हे ही एक कारण असू शकते. सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास शरीर पाणी धरुन ठेवते. त्यामुळे विशेषतः पाय, घोटे आणि कधी कधी हातांमध्येही सूज जाणवू शकते. सतत पॅकेज्ड आणि अतिमिठाचे पदार्थ खाण्याची सवय असल्यास त्याचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे.
शरीरात प्रथिनांचे प्रमाण कमी असतानाही काही वेळा सूज येऊ शकते. रक्तातील अल्ब्युमिनसारख्या प्रथिनांची पातळी कमी झाल्यास शरीरातील द्रव रक्तवाहिन्यांमध्ये टिकवून ठेवण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हात-पाय किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये सूज दिसू शकते. अशा वेळी केवळ घरगुती उपाय करण्यापेक्षा कारण शोधणे आवश्यक असते. किडनीच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यास शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम बाहेर टाकण्याची क्षमता कमी होऊ शकते. परिणामी पाय, घोटे, हात किंवा चेहर्यावर सूज येऊ शकते. लघवीमध्ये बदल, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा सकाळी चेहर्यावर सूज जाणवणे अशी लक्षणेही दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
हृदयाशी संबंधित काही आजारांमध्येही शरीरात द्रव साचू शकतो आणि पायांना सूज येऊ शकते. विशेषतः सूजेसोबत धाप लागणे, चालताना दमणे, छातीत अस्वस्थता किंवा झोपताना श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे असतील तर वैद्यकीय तपासणी लवकर करून घ्यावी. यकृताच्या काही आजारांमध्येही शरीरातील द्रव संतुलन बिघडू शकते. त्याचप्रमाणे थायरॉईडच्या काही विकारांमध्ये हात-पायांसह शरीराच्या इतर भागांमध्ये सूज किंवा फुगलेपणा जाणवू शकतो. त्यामुळे वारंवार येणाऱ्या सूजेकडे दुर्लक्ष न करता आवश्यक त्या रक्त तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करुन घेणे महत्त्वाचे आहे. काही औषधांमुळेही हाता-पायांना सूज येण्याची शक्यता असते. रक्तदाबाची काही औषधे, हार्मोनल औषधे आणि इतर काही औषधांमुळे हा दुष्परिणाम दिसू शकतो. औषध सुरू केल्यानंतर सूज वाढल्याचे जाणवत असेल तर औषध स्वतःहून बंद न करता डॉक्टरांशी बोलावे.
महिलांमध्ये मासिक पाळीच्या आधी हार्मोन्समधील बदलांमुळे शरीरात पाणी साचणे आणि हात-पाय किंचित सुजणे काही वेळा दिसू शकते. ही सूज साधारणपणे तात्पुरती असते. मात्र सतत किंवा वाढत जाणारी सूज ही केवळ हार्मोन्समुळे आहे असे गृहीत धरू नये. सूज वारंवार येत असेल, दिवसेंदिवस वाढत असेल किंवा त्यासोबत वेदना, लालसरपणा, त्वचा गरम होणे, अचानक एका पायाला सूज येणे, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसत असतील तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. कारण हाता-पायांना येणारी सूज ही साध्या कारणापासून किडनी, हृदय, यकृत किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्येपर्यंत अनेक कारणांमुळे होऊ शकते.
♻️ ♻️
0 टिप्पण्या