अंगावर जाड गोधडी घेऊन घाम आल्याने खरंच ताप निघून जातो? तापामध्ये जबरदस्ती घाम आणणं जीवघेणं ठरतं? ताप क्षणात जाण्यासाठी करा ‘हे’ उपाय


अंगावर जाड गोधडी घेऊन घाम आल्याने खरंच ताप निघून जातो? तापामध्ये जबरदस्ती घाम आणणं जीवघेणं ठरतं? ताप क्षणात जाण्यासाठी करा ‘हे’ उपाय

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

ताप आला की अंगावर जाड पांघरूण घेऊन घाम काढल्याने ताप लवकर उतरतो, असा समज अनेक वर्षांपासून आहे. मात्र घाम आल्यामुळे संसर्ग बरा होत नाही. उलट जाड कपडे किंवा ब्लँकेटमध्ये शरीर गुंडाळल्याने उष्णता अडकून अस्वस्थता आणि डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. तापात हलके कपडे, पुरेसे द्रवपदार्थ, विश्रांती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार महत्त्वाचे असतात. तापासोबत श्वास घेण्यास त्रास, गोंधळ, तीव्र अशक्तपणा किंवा डिहायड्रेशनची लक्षणे असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

संकलन : यशवंत वाघ

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

कोणालाही ताप आला की, एक सल्ला दिला जातो तो म्हणजे "अंगावर जाड पांघरून घ्या आणि घाम काढून ताप घालवा." या पद्धतीत आजारी व्यक्तीला जाड घोंगड्या किंवा ब्लँकेट्समध्ये गुंडाळून ठेवले जाते, पंखा किंवा एसी बंद करून खोलीचे तापमान वाढवले जाते आणि शरीराला जबरदस्तीने घाम आणण्याचा प्रयत्न केला जातो. वरवर पाहता हे ऐकायला योग्य वाटते, परंतु वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने मानवी शरीरातील ताप आणि ताप नियंत्रण यंत्रणा अशा प्रकारे काम करत नाही. ताप म्हणजे केवळ शरीर गरम होणे नव्हे, तर संसर्ग किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे शरीराच्या अंतर्गत तापमान नियंत्रण केंद्राची पातळी तात्पुरती वाढणे होय. जेव्हा शरीर हे वाढलेले तापमान गाठण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा रुग्णाला हुडहुडी भरणे किंवा थंडी वाजणे अशा गोष्टी घडतात. पुढे जेव्हा शरीराची ही तापमान पातळी पूर्ववत खाली येऊ लागते, तेव्हा शरीर त्वचेवाटे अतिरिक्त उष्णता बाहेर टाकण्यासाठी घाम निर्माण करते. या दोन्ही घटकांमधील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घाम येणे हा ताप कमी होत असल्याचा परिणाम आहे; घाम आल्यामुळे संसर्ग बरा होतोच किंवा ताप निघून जातो असे अजिबात नाही. त्यामुळे जाड पांघरूण घेऊन जबरदस्तीने घाम आणण्याचा प्रयत्न केल्यास शरीरात उष्णता अडकून राहते, अस्वस्थता वाढते आणि डिहायड्रेशनचा गंभीर धोका निर्माण होतो. ताप हे एका अंतर्गत आजाराचे केवळ लक्षण आहे. त्यामुळे जबरदस्तीने अंगातून घाम काढण्यापेक्षा रुग्णाला आरामदायी ठेवणें, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आणि मूळ आजारावर योग्य उपचार करणे जास्त गरजेचे असते. 

*जबरदस्तीने घाम आणण्याचे धोके आणि डिहायड्रेशन*

तापात अंगावर जाड ब्लॅंकेट्स गुंडाळून जबरदस्तीने घाम आणल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडण्याऐवजी आतच अडकून राहते, ज्यामुळे रुग्णाची अस्वस्थता प्रचंड वाढते. अतिप्रमाणात घाम आल्यामुळे शरीरातील पाण्याचे आणि द्रवपदार्थाचे प्रमाण वेगाने कमी होते. ताप, अन्नाची अनिशा, उलट्या किंवा जुलाब यामुळे रुग्ण आधीच डिहायड्रेट झालेला असतो. त्यात अतिरिक्त घाम आल्यास अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी तोंड कोरडे पडणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे असे त्रास होतात.‌ गंभीर प्रकरणात रक्तातील पेशी, रक्तदाब आणि इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. 

*पांघरुणाचा योग्य वापर आणि 'घाम येणे' या मागचे सत्य*

तापात पांघरुण अजिबात वापरु नये असा याचा अर्थ नाही, जर रुग्णाला थंडी वाजून येत असेल किंवा हुडहुडी भरत असेल, तर आराम मिळण्यासाठी हलके पांघरूण नक्कीच दिले पाहिजे. पाघरुणाचा उद्देश रुग्णाला आराम देणे हा असावा, शरीराचे तापमान जबरदस्तीने वाढवणे हा नाही. अंगातून घाम आला म्हणजे आजार पूर्ण शरीराबाहेर गेला, हा एक मोठा गैरसमज आहे. घाम आल्याने तात्पुरता खाली आला तरीही शरीरातील मूळ संसर्ग तसाच कायम असू शकतो ज्यावर उपचारांची गरज असते. 

*तापात घ्यावयाची योग्य काळजी आणि घरगुती उपाय*

ताप आल्यावर शरीरावर कोणताही अतिरिक्त ताण न देता साध्या आणि सोप्या पध्दतींचा अवलंब केला पाहिजे. शरीरात पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ जात राहतील याची काळजी घ्या. रुग्णाला पूर्ण विश्रांती घेऊ द्या. अंगावर घट्ट आणि हवेशीर कपडे घालावेत. आजारपणात जेवण पचायला हलके असावे. जर आजार काही दिवस लांबत असेल, तर रुग्णाचे पोषण टिकवून ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 

*औषधांचा योग्य वापर*

ताप कमी करण्यासाठी औषधे वापरणे योग्य असू शकते, परंतु ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजेत. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच तापाचे औषध द्यावे. केवळ ताप आला आहे म्हणून स्वतःच्या मनाने किंवा मेडिकलवरुन आणून ॲंटीबायोटिक्स खाऊ नयेत. ॲंटीबायोटिक्सचा उपयोग केवळ योग्य जिवाणू संसर्गावरच होतो, प्रत्येक तापावर नाही. 

*डॉक्टरांकडे कधी जावे?*

ताप ही एक सामान्य शारीरिक प्रतिक्रिया असली तरी काही गंभीर लक्षणे दिसल्यास घरी उपचार न करता त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेतली पाहिजे. जर ताप सतत खूप जास्त राहत असेल, रुग्णाला भ्रम/ गोंधळ होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, तीव्र का अशक्तपणा किंवा डिहायड्रेशन दिसत असेल तर डॉक्टरांना दाखवावे. 

थोडक्यात सांगायचे तर, तापात अंगातून जबरदस्तीने घाम काढून आजार घालवण्याची मुळीच गरज नसते. मानवी शरीराकडे तापमान नियंत्रित करण्याचीही अत्यंत प्रगत आणि स्वयंचलित यंत्रणा आधीपासूनच उपलब्ध असते. आपले मुख्य काम शरीराच्या या नैसर्गिक यंत्रणेला पुरेसे पाणी, योग्य द्रवपदार्थ, विश्रांती आणि योग्य वैद्यकीय उपचारांची साथ देणे हे आहे. 

प्रतीक्षा सुनील मोरे

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या