चौदा विद्या आणि चौसष्ट कला
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/9/2026 :
प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार मानवी जीवन समृद्ध व सुसंस्कृत बनवण्यासाठी चौसष्ट कला आणि चौदा विद्या सांगितल्या आहेत. श्रीगणेश आणि भगवान श्रीकृष्ण हे या सर्व विद्या व कलांचे स्वामी मानले जातात. ह्या कलेमध्ये पारंगत झालेल्या व्यक्तींचा अभ्यास केला तर लक्षात येतं काही व्यक्ती ह्या जन्मापासूनच कलेचा वारसा घेऊनच, आणि कलेसाठी सगळ पोषक वातावरण असलेल्या घरातच जन्माला येतात नंतर मग प्रयत्न करून आपली कला अजून वाढवतात. काही कलाकारांना बघितल्यावर जाणवत की हे कलाकार खूप जास्त कडक मेहनतीने घरील अनुकूल वातावरण नसताना सुद्धा कलेत पारंगत होतात.
एकेक कलेचा विचार करताना विचारांची गाडी साहित्य, लिखाण ह्या विषयापर्यंत आपोआप येऊन पोहोचली. साहित्य वाचायची, समजून घ्यायची एकदा सवय झाली की मग आपोआप लिहायची पण सवय होते. लिहायच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि म्हणूनच मग आपल्याला प्रत्येक लिखाणात वेगवेगळी गोडी, खुमारी जाणवायला लागते.
आपले विचार, मत हे विस्तृत स्वरूपात मांडायच ठरवलं की ते भरपूर उदाहरण, दाखले देऊन वर्णन पर लिहिले की ते गद्य प्रकारात मोडतं आणि हेच आपले विचार, भावना अतिशय कमी शब्दात व्यक्त करता आल्यात तर ते पद्य ह्या प्रकारात मोडतं.
गद्य म्हणजे दैनंदिन बोलण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील, व्याकरणाचे नियम पाळून साध्या व सरळ भाषेत केलेले लेखन . यात कथा, कादंबरी, निबंध, नाटक, चरित्र, आणि पत्रे यांसारख्या साहित्य प्रकारांचा समावेश असतो. तर पद्य म्हणजे छंद, लय, यमक आणि विशिष्ट अक्षररचना किंवा मात्रेच्या नियमात बांधलेली कविता, अभंग, ओवी किंवा श्लोक-रूपी रचना होय हे गद्याच्या विरुद्ध असते, कारण यात भावनांना नाद आणि यमकाद्वारे काव्यात्मक रूप दिले जाते.
गद्य प्रकारात लिहिण्यापेक्षा पद्य प्रकारात मांडणं हे जास्त कठीण कारण किमान शब्दांत कमाल भावना वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. आज ही अशीच पद्य ह्या थोड्या जमायला कठीण विषयात पारंगत झालेल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा स्मृतिदिन. आज वा. रा. कांत ह्यांचा स्मृतिदिन.
वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे 6 ऑक्टोबर 1913 रोजी झाला. वा.रा. कांत हे रसाळ वामन, अभिजित, आणि कांत ह्या नावाने सुद्धा लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण 1931 साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई - पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी 1930 मध्ये झाला.त्यांच्या 'बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात', 'त्या तरुतळी विसरले गीत' आणि 'रुद्रवीणा' यांसारख्या प्रसिद्ध कविता व काव्यसंग्रहांनी मराठी साहित्यविश्वात मोठे नाव कमावले. त्यांनी प्रणय आणि राष्ट्रभक्तीपर सुंदर गीते लिहिली.
त्यांनी निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून साधारण बारा वर्षे नोकरी केली . नंतर त्यांनी निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले . त्यानंतर भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आणि 1970 मध्ये ते आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त झाले .
त्यांची गाजलेली लोकप्रीय गीते पुढीलप्रमाणे, "आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको", "त्या तरुतळी विसरले गीत", "बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात"," राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे,"," भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्न माझे ?"," सखी शेजारिणी, तू हसत रहा; हास्यांत पळे गुंफीत रहा". तसेच त्यांचे पुढील काव्यसंग्रह प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत,"'दोनुली'"
"’पहाटतारा’","’बगळ्यांची माळ","मरणगंध", " मावळते शब्द"," रुद्रवीणा"," 'वाजली विजेची टाळी'
'"वेलांटी'"," शततारका’" ," सहज लिहिता लिहिता",.
कृ.मु. उजळंबकर ह्यांनी वा.रा. कांत ह्यांचे एक छोटेखानी चरित्र -’कविवर्य वा.रा.कांत लिहिले आहे. कांत ह्यांचा लिखाणास पुरस्कार प्राप्त झाले ते पुढीलप्रमाणे," वेलांटी" ,"मरणगंध" ह्या काव्यसंग्रहाना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार," दोनुली आणि' ह्या " 'मावळते शब्द "'या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत' पुरस्कार'.
कांत ह्यांना 1988 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी , 1989 मध्ये
महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्या तर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी, तसेच 1989 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले होते.
मला आणि बहुतेक सगळ्यांनाच त्यांचे आवडणारे गीत म्हणजे. " बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात".
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात".
भेट आपुली स्मरशी काय तू मनात
छेडीती पानांत बीन थेंब पावसाचे
ओल्या रानात खुले ऊन अभ्रकाचे
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात
त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली
रिमझिमते अमृत ते विकल अंतरात
हातांसह सोन्याची सांज गुंफताना
बगळ्यांचे शुभ्र कळे मिळुनी मोजताना
कमळापरी मिटती दिवस उमलुनी तळ्यात
तू गेलीस तोडूनी ती माळ, सर्व धागे
फडफडणे पंखाचे शुभ्र उरे मागे
सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात…
बगळ्यांची माळ फुले' हे प्रसिद्ध मराठी भावनाप्रधानं गीत असून ह्यात प्रियकर आपल्या दूर गेलेल्या किंवा पाठीमागे राहिलेल्या प्रेयसीच्या आठवणीत रमून गेल्याचे वर्णन आहे. रमला आहे. आकाशात एकामागून एक रांगेत उडणारे पांढरेशुभ्र बगळे असे दिसतात जणू काही आकाशात फुलांची एखादी पांढरी माळच फुलली आहे. निसर्गातील हे सौंदर्य पाहताना प्रियकराला प्रेयसीची आठवण येते. तो तिला विचारतो की, जशी ही बगळ्यांची माळ अजूनही आकाशात दिसते आहे, तशी तू सुद्धा आपल्या भेटीचे क्षण आणि जुन्या आठवणी आपल्या मनात अजूनही साठवून ठेवल्या आहेत का? पावसाचे थेंब पानांवर पडणे, ओल्या रानात ऊन पडणे, दूर डोंगरातून मेघ दिसणे यांसारख्या निसर्गातील गोष्टींमधून प्रियकराचे एकाकी मन आणि प्रेयसीसोबतचे जुने प्रसंग ह्या गीतात परत आठवणीत आणतो. परन्तु गीताच्या शेवटी मानसिक हुरहूर कवी ला आणि रसिक वाचकाना देखील अस्वस्थ करते. हे गीत म्हणजे एक अतीव प्रेमाची आणि त्याचबरोबर विरहाची साक्ष देणारी एक अजरामर कलाकृती आहे.
वी. रा. कांत ह्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन.
====================
0 टिप्पण्या