महर्षि प्रशालेत कायदेविषयक शिबिरातून विद्यार्थ्यांना कायदा, करिअर व सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/9/2026 :
यशवंतनगर (ता. माळशिरस) येथील महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेत इयत्ता 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच सायबर लॉ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. अल्ताफ बादशहा आतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी भविष्यात MPSC, UPSC, IT, इंजिनिअरिंग, मेडिकल यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन करण्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन कसे करावे, याबाबत ॲड. आतार यांनी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना “25% वेळ नवीन शिकण्यासाठी, 25% वेळ लेखनासाठी आणि 50% वेळ पुनरावृत्तीसाठी” देण्याचा अभ्यासाचा प्रभावी फॉर्म्युला सांगितला.
आपल्या ओघवत्या वक्तृत्वातून त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रेरणादायी उदाहरणांच्या माध्यमातून ध्येय निश्चिती, सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले. ‘छत्रीवाला पोरगा’, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जिद्द, स्वामी विवेकानंदांचा “उठा, जागे व्हा...” हा संदेश, 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये विल्मा रुडॉल्फने मिळविलेली तीन सुवर्णपदके, गरुडाची झेप तसेच लाकूडतोड्या आणि त्याची कुऱ्हाड या प्रेरणादायी उदाहरणांतून त्यांनी विद्यार्थ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण सत्रात सायबर कायदा व सायबर गुन्हे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 मधील संबंधित तरतुदींचा संदर्भ देत सायबर फसवणूक, डिजिटल गैरवापर, वैयक्तिक माहितीची चोरी आणि ऑनलाइन गुन्हे यापासून सावध राहण्याच्या उपाययोजना त्यांनी समजावून सांगितल्या. सायबर फसवणुकीची घटना घडल्यास तातडीने 1930 हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच कायदेविषयक मूलभूत माहिती, सायबर सुरक्षेची जाणीव आणि भविष्यातील करिअरविषयक दिशा मिळाली.
कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर, उपमुख्याध्यापक झारेकरी, चंदनकर, सोनवणे, पराडे तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी झारेकरी यांनी आभार मानले.


0 टिप्पण्या