भादली बु. येथे केंद्रस्तरीय 'स्पेलिंग बी' स्पर्धा उत्साहात 🫄 चिमुरड्यांनी दाखवली इंग्रजी स्पेलिंगची किमया!

 

भादली बु. येथे केंद्रस्तरीय 'स्पेलिंग बी' स्पर्धा उत्साहात

🫄 चिमुरड्यांनी दाखवली इंग्रजी स्पेलिंगची किमया!

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9/9/2026 : जिल्हा परिषद जळगाव आणि विनोबा टीम यांच्या संयुक्त विद्यमाने भादली केंद्रात केंद्रस्तरीय 'स्पेलिंग बी' स्पर्धेचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत केंद्रातील सहा स्तरावरील बाल स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय अचूक स्पेलिंग सांगत चमकदार कामगिरी केल्याने स्पर्धेत मोठी चुरस पाहायला मिळाली.

विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार या स्पर्धेचे दोन गट करण्यात आले होते. यात पहिल्या गटात (इयत्ता पहिली व दुसरी) रितिका शरद कोळी (जि. प. प्राथमिक शाळा कानसवाडे) व नयन खुशाल सोनवणे (जि. प. प्राथमिक शाळा देऊळवाडे) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.

तसेच दुसऱ्या गटात (इयत्ता तिसरी व चौथी) निलेश पुरुषोत्तम कोळी व यश ईश्वर कोळी या दोघांनी (जि. प. प्राथमिक शाळा कानसवाडे) आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत संयुक्तपणे प्रथम क्रमांक संपादन केला.

सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्रीमती सविता पाटील व श्रीमती प्रज्ञा नारखेडे यांनी अत्यंत पारदर्शक आणि चोख पद्धतीचे परीक्षण करत दोन्ही गटातील विजेते घोषित केले.

ही स्पर्धा केंद्र समन्वयक वैशाली बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मोलाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार शिक्षक कुणाल पवार यांनी मानले. या यशस्वी आयोजनाबद्दल आणि घवघवीत यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या