💢सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड यांची धडाकेबाज कामगिरी ;
⭕मध्यरात्री सापळा रचून आंतरराज्यीय बेकायदेशीर शस्त्र तस्करीचा पर्दाफाश
वृत्त एकसत्ता न्यूज
सोलापूर दिनांक 22/8/2026 :
*कर्तव्यदक्षता, गुप्त बातमीदारांचे मजबूत जाळे आणि तत्पर नियोजन यांच्या बळावर सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड व त्यांच्या टीमने शहरात होणारी मोठी शस्त्र तस्करी उधळून लावली.
विजयपूरहून सोलापूरच्या दिशेने एका दुचाकीवरून इसम गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह येत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, स.पो.नि. गायकवाड व त्यांच्या टीमने विलंब न करता वरिष्ठांना माहिती देऊन कारवाईची चक्रे फिरवली. पहाटे २:२६ च्या सुमारास नवीन विजापूर नाका येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ दबा धरून बसलेल्या पथकाने संशयित मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी याला अत्यंत शिताफीने घेरले. त्याच्या ताब्यातून देशी बनावटीचे एक लोखंडी पिस्तूल,५ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल आणि स्प्लेंडर मोटारसायकल असा १ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या मुसक्या आवळल्या.
स.पो.नि. गायकवाड व त्यांच्या टीमचे या धाडसी आणि अचूक कारवाईमुळे संभाव्य घातपात वेळीच टळला. केवळ आरोपीला पकडून न थांबता गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याची स.पो.नि. शितलकुमार गायकवाड व त्यांचे टिमचे तपासशैली विशेष कौतुकास्पद ठरली. सखोल चौकशी दरम्यान त्यांनी व त्यांच्या टीमने केलेल्या कसून आणि कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने सदर पिस्तूल व काडतुसे इंडी (कर्नाटक) येथील घनश्याम दल्लीचंद जाट याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.
माहिती मिळताच गायकवाड यांनी तपासाची दिशा कर्नाटकाकडे वळवली आणि पथकासह थेट इंडी गाठून मूळ राजस्थानच्या घनश्याम जाट याला २० ऑगस्ट २०२६ रोजी बेड्या ठोकल्या.
स.पो.नि. गायकवाड व त्यांच्या टीमने दाखवलेली तपास कुशलता, गुन्ह्यांची पाळेमुळे खणून काढण्याची जिद्द आणि आंतरराज्यीय कारवाईतील वेग यामुळे संपूर्ण शस्त्र पुरवठा साखळीचा पर्दाफाश झाला.
पोलीस आयुक्त एम.राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर,सहायक पोलीस आयुक्त विभाग दोन चे
श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण व पो.नि. सुशांत वराळे
यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शितलकुमार गायकवाड यांनी आपल्या पथकातील अंमलदारांना सोबत घेऊन ही यशस्वी मोहीम फत्ते केली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र दक्ष राहून गुन्हेगारांवर वचक निर्माण करणारे कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून स.पो.नि. शितलकुमार गायकवाड आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या