🍾 दारूच्या बाटलीचे मनोगत....🍾

    

✍🏻 लक्षवेधी.... ✍🏻

🍾  दारूच्या बाटलीचे मनोगत....🍾

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक  : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9/8/2026 :

आजपर्यंत तुम्ही माझ्याबद्दल खूप काही ऐकले असेल. कुणी मला आनंदाचे साधन म्हटले, कुणी दुःख विसरण्याचा मार्ग म्हटला, तर कुणी प्रतिष्ठेचे प्रतीक समजले. पण आज मी स्वतः बोलणार आहे. कारण माझ्या शांत काचेच्या देहात हजारो कुटुंबांच्या वेदना कैद आहेत. लाखो अश्रूंचे प्रतिबिंब माझ्यात साठलेले आहे. आणि असंख्य उद्ध्वस्त आयुष्यांची राख माझ्या स्मरणात अजूनही धगधगत आहे.

मी एका कारखान्यात जन्माला येते. माझ्या अंगावर आकर्षक लेबल लावले जाते. मला सुंदर बनवले जाते, कारण मला विकले जायचे असते. दुकानाच्या रॅकमध्ये मी अभिमानाने उभी असते. पण मला तेव्हा माहीत नसते की, माझ्या पुढच्या प्रवासात किती संसारांचे भविष्य काळोखात जाणार आहे.

मी स्वतःहून कुणाकडे जात नाही. मला कुणाच्या घरात शिरण्याची इच्छाही नसते. पण माणूस मला स्वतः घरी घेऊन जातो. सुरुवातीला तो मला पाहून हसतो. मित्रांसोबत माझे स्वागत करतो. "थोडीशीच आहे", "फक्त आजच आहे", "टेंशन कमी करण्यासाठी आहे" अशा अनेक कारणांनी माझी ओळख होते. पण मला माहीत असते, माझी ओळख जिथे होते, तिथे हळूहळू माणसाची स्वतःशी असलेली ओळख हरवत जाते.

*मी अनेक घरांचे दरवाजे ओलांडले आहेत.*

एका घरात मी गेली तेव्हा तिथे आनंद होता. मुलांचे हसणे होते. आईच्या ओव्या होत्या. वडिलांच्या कष्टाचे समाधान होते. पण काही वर्षांनी मी पुन्हा त्याच घरात पाहिले, तर तिथे शांतता नव्हती; तिथे भीती होती. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते; असुरक्षितता होती. पत्नीच्या डोळ्यांत स्वप्ने नव्हती; तर अश्रू होते. आणि घरातील कर्ता पुरुष माझ्या नशेचा पूर्णपणे गुलाम झाला होता.

मी एका आठ वर्षांच्या मुलाला पाहिले आहे. रात्री उशिरा त्याचा बाप दारू पिऊन घरी आला. घरात भांडण झाले. शिवीगाळ झाली. आईवर हात उगारला गेला. तो मुलगा कोपऱ्यात बसून थरथरत होता. त्याच्या डोळ्यांत प्रश्न होता,  "माझे बाबा असे का झाले?" त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते, पण त्या रात्री त्याच्या बालपणाचा एक भाग कायमचा संपला.

मी एका वृद्ध आईलाही पाहिले आहे. तिने आपल्या मुलासाठी उपाशीपोटी दिवस काढले होते. त्याला शिकवले, वाढवले, मोठे केले. पण आज तोच मुलगा तिच्या औषधांसाठी पैसे देत नाही; कारण त्याचे पैसे माझ्यावर खर्च होतात. ती आई हात जोडून रडत होती. तिच्या ओठांवर एकच प्रार्थना होती, माझ्या मुलाला या व्यसनातून सोडव."

त्या आईच्या अश्रूंमध्ये मला माझेच प्रतिबिंब दिसत होते.

लोक म्हणतात, दारू माणसाला धैर्य देते. पण मी पाहिले आहे की, माझ्या नशेत माणूस धैर्यवान होत नाही; तो विवेकशून्य होतो. त्याला योग्य-अयोग्य यातील फरक कळेनासा होतो. तो आपल्या प्रिय व्यक्तींनाच दुखवू लागतो. ज्यांच्यासाठी जगायचे असते, त्यांनाच रडवू लागतो.

मी कित्येक तरुणांना पाहिले आहे. त्यांच्या हातात पुस्तके असायला हवी होती, स्वप्ने असायला हवी होती, ध्येय असायला हवे होते. पण त्यांच्या हातात मी आले. सुरुवातीला मजा म्हणून, नंतर सवय म्हणून आणि शेवटी गरज म्हणून. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी जमवलेले पैसे माझ्यावर खर्च झाले. त्यांच्या भविष्याच्या पायावर व्यसनाचे ओझे ठेवले गेले.

मी कित्येक रुग्णालयांच्या दारात उभी राहिली आहे. यकृत निकामी झालेले रुग्ण, अपघातात जखमी झालेले युवक, मानसिक तणावाने त्रस्त झालेली माणसे, या सर्वांच्या आयुष्यात माझी सावली होती. डॉक्टर औषध देऊ शकतात, पण तुटलेली नाती जोडू शकत नाहीत. शरीरावरील जखमा भरू शकतात, पण मुलांच्या मनावर झालेल्या जखमा सहज भरत नाहीत.

माझ्या नशेत घडलेले अपघात मी पाहिले आहेत.

एक क्षणाचा बेफिकीर निर्णय, आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त. घरातून कामावर गेलेला माणूस परतच आला नाही. शाळेतून वडिलांची वाट पाहणाऱ्या मुलाला त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. एका आईची कूस उजाडली. एका पत्नीचे कुंकू पुसले गेले. आणि हे सर्व घडले एका क्षणाच्या नशेमुळे.

माझे सर्वात मोठे दुःख काय आहे, माहिती आहे?

लोक मला दोष देतात, पण माझ्यामुळे नष्ट होणाऱ्या प्रत्येक आयुष्याची वेदना मलाही जाणवते. कारण मी दररोज पाहते की, एका बाटलीसाठी माणूस स्वतःची माणुसकी गमावत आहे. पैसा गमावत आहे. आरोग्य गमावत आहे. प्रतिष्ठा गमावत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रेम करणारी माणसे गमावत आहे.

मी काचेची बनलेली आहे. माझी किंमत काहीशे रुपये असते. पण माझ्यामुळे तुटणाऱ्या नात्यांची किंमत कोण मोजणार? माझ्यामुळे रडणाऱ्या आईच्या अश्रूंची किंमत कोण ठरवणार? माझ्यामुळे हरवलेल्या बालपणाचे मोल कोण सांगणार?

आज मी समाजाला एकच विनंती करू इच्छिते.

जेव्हा तुम्ही मला हातात घ्याल, तेव्हा एकदा तुमच्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहा. त्याच्या डोळ्यांतली स्वप्ने पाहा. तुमच्या आईच्या थरथरणाऱ्या हातांकडे पाहा. तुमच्या पत्नीच्या डोळ्यांतल्या विश्वासाकडे पाहा. तुमच्या वडिलांच्या कष्टांकडे पाहा.

आणि मग स्वतःला विचारा, एका क्षणाच्या नशेसाठी मी हे सर्व गमावायला तयार आहे का? जर उत्तर "नाही" असेल, तर मला तिथेच सोडून द्या.

कारण मी आनंद देत नाही, फक्त आनंदाचा भ्रम निर्माण करते. मी दुःख दूर करत नाही, तर त्याला अधिक खोल करते. मी समस्या सोडवत नाही, तर नवीन समस्या निर्माण करते.

मी दारूची बाटली आहे.

मला रिकामे करण्यासाठी काही मिनिटे पुरतात, पण माझ्यामुळे रिकामे झालेले आयुष्य भरून काढण्यासाठी अनेक जन्म अपुरे पडतात. म्हणून आज माझे हे मनोगत वाचणाऱ्या प्रत्येकाला मी हात जोडून विनंती करते, माझ्यापासून दूर राहा. तुमच्या मुलांच्या भविष्याला जवळ करा.

माझ्या नशेपेक्षा तुमच्या कष्टांवर विश्वास ठेवा.

माझ्या खोट्या आनंदापेक्षा तुमच्या कुटुंबाच्या खऱ्या प्रेमाला जपा. कारण...

"दारूची बाटली फुटली तर फक्त काचांचे तुकडे होतात;

पण दारूच्या व्यसनाने संसार फुटला तर आयुष्यभर मनाचे तुकडे वेचावे लागतात." आणि त्या तुकड्यांना जोडणारे कोणतेही दुकान, कोणताही डॉक्टर, कोणतेही औषध या जगात आजवर निर्माण झालेले नाही.

लेखन..

रतनकूमार साळवे 

छत्रपती संभाजीनगर 

9923502320

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या