जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत विराज साठेचा प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

 


जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत  विराज साठेचा प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

वृत्त एकसत्ता न्यूज

मोहोळ तालुका प्रतिनिधी : सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि. २ ऑगस्ट) नेहरूनगर अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ज्युनिअर मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेत वाळूज (ता.मोहोळ) येथिल व नेताजी प्रशाला मोहोळचा विद्यार्थी विराज रमेश साठे याने १६ वर्षांखालील मुलांच्या गोळाफेक स्पर्धेत ११.२०० मीटर अंतरावर गोळा फेकत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची दि. २८ व २९ ऑगस्ट रोजी श्री विठ्ठलरावजी चॅरिटेबल ट्रस्ट, डेरवण (जि. रत्नागिरी) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत १४, १६ व २० वर्षांखालील मुला-मुलींसाठी विविध मैदानी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोळाफेक स्पर्धेत विराजने उत्कृष्ट तंत्र आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर प्रथम क्रमांक मिळवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली.

विराजच्या या यशामागे नेताजी प्रशालेचे क्रीडा शिक्षक आयवळे  यांचे  मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक काशीद  यांनी विराजचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व त्याच्याकडून आणखी उज्ज्वल यशाची अपेक्षा व्यक्त केली.

विराजच्या यशामागे त्याचे वडील रमेश साठे व आई यांचे प्रोत्साहन, परिश्रम आणि सातत्यपूर्ण पाठबळ यांचाही मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल विराज, त्याचे पालक, क्रीडा शिक्षक तसेच नेताजी प्रशालेचे अभिनंदन होत असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही तो सोलापूर जिल्हा, नेताजी प्रशाला व वाळूज गावचे नाव उंचावेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी व मित्र परिवाराने व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या