आओ आओ जवान, रखो भारत की शान |




आओ आओ जवान, रखो भारत की शान |

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 8/8/2026 :

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता आणि त्यांच्या भजनातून तरुणांना, जवानांना नेहमीच जागं केल. "उठो जवानों करके बताओ, कहनेके दिन गये | बाते बताना कोई नहीं सुनता, अब तो बदल गयी जनता ||" महाराज देशासाठी, समाजासाठी काहीतरी ठोस काम करायला सांगतात. बोलून वेळ घालवू नका. शेतात, कारखान्यात, सैन्यात, समाजात कुठेही असाल तर काम, कष्ट करा. देश घडवायचा असेल तर घाम गाळावा लागेल. फक्त भाषणबाजी नको तर कृती करा. आता काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. देशाचा जवान हातात बंदूक घेऊन रक्षण करतो तसेच जो शेतात अन्न पिकवतो, जो कारखाना चालवतो, जो समाजात चांगुलपणा पसरवतो तोही जवानच आहे.  राष्ट्रसंताना भारताविषयी कळवळा आहे त्यांना वाटते की, "अनेकता मे एकता" विविधतेत एकता हाच भारताचा खरा आत्मा आहे. समाजातील व्यक्तीचे घराघरात, मनामनात प्रेम असायला हवे. "तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा" महाराज म्हणतात, आपल्या शरीरात, मनात आणि धनानं आपला भारत देश सुखी होवो. आपण आपले सर्वस्व देशाच्या सुखासाठी, प्रगतीसाठी देऊ आणि भारत नेहमी समृद्ध राहो अशी प्रार्थना करू या.

आओ आओ जवान, रखो भारत की शान |

तुम्हरी सेवासे होगा, जमाने का मान ||टेक||

          राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशातील तरुणांना तसेत सीमेवर असणाऱ्या सैनिकांना उद्देशून सांगतात, तुम्हीच देशाची ताकद आहात. तुम्ही सीमेवर राहून, कष्ट करून देशाची सेवा करता म्हणूनच भारताचे नाव जगात गाजत आहे. तुमच्या त्यागामुळे देश सुरक्षित आहे आणि आपल्याला अभिमानाने जगता येत. जवानांची सेवा हीच देशाची शान आहे.

झूठे न बोलो चुगली न छोलो |

नेकी से अपने जीवन को तोलो |

तो ऊँचा उठेगा सारा जहान ||1||

              राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तरुणांनो खोटं बोलणे सोडा. खोटं बोलण्याने तात्पुरता फायदा होईल पण मान-सन्मान जाईल. कोणाचीही निंदा, चुगली करु नये म्हणजेच आपल्या शब्दांनी कोणाच मन दुखवू नका. आपल्या प्रत्येक कृतीचा चांगुलपणा ठेवा. जर प्रत्येक माणसाने, तरुणांनी वरील नियम पाळले तर फक्त एकाचं नाही तर संपूर्ण जगाचं भलं होईल. समाजात शांती, विश्वास आणि उन्नती येईल. तरुणांचे चांगले कर्म आणि चांगले बोल हेच जगाला उंच नेण्याची गुरुकिल्ली आहेत.

सब अपने भाई, दुसरा न कोई |

ऐसा समझकर तोड़ो बुराई |

मिलके रहो धनी सारे किसान ||2||

           राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जगात आपण सगळे एकाच मातीचे आहोत. जाती, धर्म, श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव विसरून जा. सगळेच आपलेच आहेत अशी भावना ठेवली तर मनातील राग, मत्सर, वाईट विचार आपोआप संपतील. शेवटी महाराज शेतकऱ्यांना म्हणतात, शेतकरी जर एकजुटीने राहिले, एकमेकांना मदत केली तरच खऱ्या अर्थाने समृद्ध आणि धनी बनतील. फूट पाडली तर नुकसान होईल. "जय जवान जय किसान" असे म्हणणे वावगे होणार नाही. एकता हेच बळ आहे. भेदभाव तोडून प्रेमाने राहिले तरच समाज आणि देश प्रगती करेल. 

टूटी हो किसकी कुटियाँ बना दो |

बिगड़ी हो किसकी जिंदगी जमा दो |

कहता है तुकड्या माँगो वरदान ||3||

          राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाकडे पैसा, बंगला, गाडी असं वरदान मागू नका. खरं वरदान म्हणजे इतरांची सेवा करण्यातच आहे. ज्याचं घर उद्धस्त झालं आहे त्याला आधार द्या. ज्याचं आयुष्य संकटाने बिघडलं आहे त्याला पुन्हा उभं करा. दुसऱ्याचं दुःख दूर करण्यातच खरी माणुसकी आणि खरी प्रार्थना आहे. माणसाला माणसासाठी जगता आलं पाहिजे. परोपकार हेच सर्वात मोठं पुण्य आहे. महाराजांनी समाज सेवा आणि राष्ट्रसेवेचा संदेश समाजाला देतात.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर

व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त 

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन 9970404180

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या