४०,००० कोटींची राजेशाही संपत्ती, ३५ वर्षांचा वाद आणि एका 'गेम ऑफ थ्रोन्स'चा शेवट!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/8/2026 :
जरा डोळे मिटून अशा एका महालाची कल्पना करा, जिथल्या डायनिंग टेबलवर चक्क चांदीची ट्रेन पाहुण्यांना जेवण वाढते. ज्या महालाच्या छतावर इटलीहून आणलेले सात टनांचे झुंबर लावायचे होते, तेव्हा ते छत वजन पेलू शकेल की नाही हे पाहण्यासाठी थेट हत्तींना छतावर चढवून चाचणी घेतली गेली. तब्बल ४०० खोल्यांचा तो अवाढव्य 'जयविलास पॅलेस', ६२३ किलो सोनं, ३३२ किलो चांदी, नवव्या शतकातील मौल्यवान पेंटिंग्स आणि तब्बल ४० हजार कोटी रुपयांची अफाट दौलत. भारताच्या इतिहासात ग्वाल्हेरच्या सिंधिया राजघराण्याएवढा रुबाब आणि संपत्ती क्वचितच कोणाकडे असेल. पण राजकारण आणि पैशाची नशा ही रक्ताच्या नात्यांची सर्वात मोठी वैरी असते, हेच त्रिकालबाधित सत्य आहे.
ग्वाल्हेरचा हाच जयविलास पॅलेस या जळजळीत वास्तवाचा मूक साक्षीदार ठरला. शेकडो कोटींपेक्षा अधिक मूल्याची ही रोकड आणि संपत्ती एकाच कुटुंबाच्या गळ्यातील फास कशी बनली, याची कहाणी एखाद्या हॉलिवूड थ्रिलरलाही लाजवणारी आहे. विचार करा, ज्या घरात आई जनसंघाची संस्थापक सदस्य बनते आणि मुलगा काँग्रेसचा हात धरतो, तिथे द्वेषाची भिंत किती भक्कम असेल. राजकारणातील ही दुश्मनी उंबरठा ओलांडून थेट बेडरूम आणि तिजोऱ्यांपर्यंत पोहोचली. जयविलास पॅलेसच्या खोल्या आणि विंग्सवर कुलूपं ठोकली गेली, नोकरांनाही निवडावे लागले की ते राजमातांचे निष्ठावान आहेत की माधवराव सिंधियांचे. पण ही कटुता फक्त राजकारणापुरती मर्यादित राहिली नाही.
या भयानक संघर्षातून राजमाता विजयराजे सिंधिया यांनी संतापाच्या भरात असे एक मृत्युपत्र लिहून ठेवले, जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. त्यांनी आपला एकुलता एक मुलगा माधवराव सिंधिया यांना संपूर्ण संपत्तीतून बेदखल तर केलेच, पण मरणोत्तर स्वतःच्या मुलाने आपल्या चितेला अग्नीही देऊ नये, असे उघडपणे नमूद केले. आई मुलाचा हा संघर्ष इतका विकोपाला गेला की महादजी सिंधिया पगडीत घालायचे त्या पिढीजात शिवलिंगासाठी थेट आमरण उपोषणाची वेळ आली. पण या पारिवारिक आणि राजकीय युद्धात खरा ट्विस्ट तेव्हा आला, जेव्हा एका १९ वर्षांच्या तरुणाची एन्ट्री झाली. अमेरिकेत इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने भारतात परतल्यावर संपत्तीसाठी स्वतःची सख्खी आजी आणि वडील, या दोघांच्याही विरोधात न्यायालयात खटला दाखल केला.
हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून आजचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया होते. आजीचे नवे मृत्युपत्र खोटे असून आपणच या अफाट संपत्तीचे खरे वारसदार आहोत, असा दावा त्यांनी न्यायालयात ठोकला. आज २०२६ साल उजाडले आहे, तब्बल ३५ वर्षे कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्यानंतर आणि अनेक पिढ्यांच्या संघर्षानंतर अखेर हे कुटुंब जुलै २०२६ मध्ये एका टेबलावर बसून तडजोडीला तयार झाले आहे आणि या ऐतिहासिक वादाचा शेवट दृष्टिक्षेपात आला आहे.
या संघर्षाची पाळेमुळे आजच्या काळात नाही, तर थेट शतकांमागे दडलेली आहेत. महाराष्ट्रातील साताऱ्याजवळील कण्हेरखेड नावाच्या छोट्याशा गावात कुणबी समाजातील एक शिंदे कुटुंब राहायचे, जे त्या गावचे पाटील होते. याच कुटुंबातील राणोजी शिंदे नावाचा एक तरुण मराठा साम्राज्यात पेशवे बाजीराव प्रथम यांच्या फौजेत एक सामान्य शिपाई म्हणून रुजू झाला. एका रात्रीने भारताचा इतिहास बदलला. पेशवे बाजीराव आणि छत्रपती शाहू महाराज यांची प्रदीर्घ बैठक संपल्यानंतर बाजीराव बाहेर आले, तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांचा वैयक्तिक सेवक राणोजी जमिनीवर गाढ झोपला होता, पण त्याने पेशव्यांच्या जुत्या (चपला) आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवल्या होत्या. त्या काळात शत्रूला मारण्यासाठी अनेकदा चपलांना विष लावले जायचे, कोणी पेशव्यांच्या चपलांशी छेडछाड करू नये म्हणून राणोजीने दाखवलेल्या या अफाट निष्ठेने पेशव्यांचे मन जिंकले. राणोजींना तात्काळ खास पागा तुकडीत सामील केले गेले आणि येथूनच शिंदे सत्तेचा पाया रचला गेला.
पुढे १७२८ मध्ये माळवा प्रांताची सुभेदारी मिळवत आणि नंतर १७३८-३९ मध्ये हैदराबादचा निजाम व पोर्तुगीजांचा धुव्वा उडवत राणोजींनी माळवा कायमचा स्वतःच्या ताब्यात घेतला. एक सामान्य शिपाई आता मोठा जहागीरदार बनला होता. १७४५ मध्ये राणोजींच्या मृत्यूनंतर कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळला. १७६१ च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धात या कुटुंबातील तब्बल २० जणांचे शिरकाण झाले. पण या भयंकर संहारातून वाचलेल्या महादजी शिंदेंनी हार मानली नाही. त्यांनी दख्खन गाठले, फ्रेंच कमांडर बेनवा द बोईन याच्या मदतीने तब्बल १ लाख घोडेस्वार, ५०० तोफा आणि १६ पायी बटालियनची आधुनिक फौज उभारली आणि मुघल बादशाह शाह आलम द्वितीय यालाही हरवून दिल्लीला गुलाम कादिरपासून सुरक्षित केले.
आता प्रश्न पडतो की साताऱ्याचे 'शिंदे' उत्तर भारतात जाऊन सिंधिया कसे झाले? तर यामागे ब्रिटिशांची इंग्रजी जीभ होती. इंग्रजांना शिंदे उच्चारता न आल्याने त्यांनी सरकारी कागदपत्रांवर स्पेलिंग 'Scindia' असे केले आणि तेच कायमचे रूढ झाले.
महादजींनंतर दौलतराव आणि जयाजीराव यांच्या काळात शिंदे सत्तेला उतरती कळा लागली. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात राणी लक्ष्मीबाईंना साथ न दिल्याचा गद्दारीचा कलंकही याच कुटुंबावर लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या 'इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स १८५७' या पुस्तकात जयाजीरावांना ब्रिटिशांचे गुलाम आणि भ्याड म्हटले आहे. पण दुसरीकडे, राजमाता विजयराजे आणि खुद्द ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या दाव्यानुसार, जयाजीराव त्या वेळी मजबूर होते. त्यांची स्वतःची फौज बंडखोर झाली होती, तरीही त्यांनी राणी लक्ष्मीबाईंच्या कुटुंबाला आणि सोबतच्या महिलांना आग्र्याच्या किल्ल्यात सुरक्षित पोहोचवले होते व राणीविरुद्ध सैन्य वापरण्यास नकार दिल्याने इंग्रजांनी त्यांना नजरकैदेत ठेवले होते. इतिहास काहीही असो, पण त्यानंतर हे घराणे पूर्णपणे ब्रिटिशांच्या अधीन झाले.
पुढे १८८६ मध्ये माधवरावांनी (पहिले) ग्वाल्हेरचे आधुनिकीकरण केले आणि जीवाजीरावांनी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर हे साम्राज्य भारतात विलीन केले. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात गांधीजींच्या हत्येत वापरलेले पिस्तूल ग्वाल्हेरवरून आल्याचा आरोप आणि त्या भागात हिंदू महासभेची वाढती ताकद यामुळे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ग्वाल्हेर घराण्याला जबाबदार धरू लागले. यातून मार्ग काढण्यासाठी जीवाजीरावांच्या पत्नी राजमाता विजयराजे आजारी पतीला सोडून नेहरूंच्या भेटीला दिल्लीला गेल्या आणि १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण ही राजकीय जवळीक फार काळ टिकली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री द्वारकाप्रसाद मिश्रा यांनी राजघराण्यांना लोकशाहीसाठी धोका ठरवणे आणि बस्तरचे महाराज प्रवीरचंद्र भंजदेव यांची काँग्रेसच्या काळात पोलिसांकडून झालेली हत्या यामुळे राजमाता आतून हादरल्या. त्यांनी १९६७ मध्ये काँग्रेस सोडताना ३६ आमदार सोबत नेले आणि मध्य प्रदेशात जनसंघाचे सरकार आणले.
यानंतर आई आणि मुलगा यांच्यात वैचारिक दरी निर्माण झाली. ऑक्सफर्डमधून शिकून आलेल्या माधवराव सिंधियांना आईचे हे राजकारण पसंत नव्हते. आणीबाणीत राजमातांना आधी पचमढी आणि मग तिहार तुरुंगात टाकले गेले, तर अटकेपासून वाचण्यासाठी माधवराव नेपाळला निघून गेले. याच वैचारिक मतभेदातून पुढे १९८० मध्ये माधवरावांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राजमाता भाजपच्या संस्थापक उपाध्यक्षा बनल्या.
या मतभेदाचा कडेलोट १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत झाला. माधवराव यांनी आईच्या विरोधात थेट ग्वाल्हेरमधून अटल बिहारी वाजपेयी यांच्या विरुद्ध शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केला. राजमातांनी अटलजींना पूर्ण पाठिंबा दिला होता आणि जाहीर सभेत गरजून सांगितले की, 'मी अहिल्याबाई होळकरांसारखी आहे, जिने आपल्या लोकांसाठी स्वतःच्या मुलालाही चिरडले.' पण निकाल धक्कादायक होता. माधवरावांनी वाजपेयींचा तब्बल पावणेदोन लाख मतांनी पराभव केला.
या निकालानंतर जयविलास पॅलेस दोन तुकड्यांत विभागला गेला, नोकर विभागले गेले आणि राजमाता बाजूच्या राणी महालात राहायला गेल्या. हा फक्त राजकारणाचा विषय राहिला नव्हता, तर ती एक भयंकर जिद्द आणि वारशाची कायदेशीर लढाई बनली. १९६१ मध्ये जीवाजीरावांच्या मृत्यूनंतर हिंदू वारसा कायद्यानुसार संपत्तीचे तीन मुख्य भाग झाले होते. पण या राजकीय दुराव्यामुळे १९८५ मध्ये राजमातांनी नवे मृत्युपत्र बनवले आणि माधवरावांना संपत्तीतून बेदखल करत सर्व संपत्ती मुलींच्या नावे केली. यावर १९९० मध्ये ज्योतिरादित्य सिंधियांनी आजी आणि वडील या दोघांवरही खटला दाखल करून खळबळ उडवून दिली. त्यांनी दावा केला की राजघराण्यात ज्येष्ठ पुत्रालाच (ज्येष्ठाधिकार) सर्व संपत्ती मिळण्याचा नियम आहे आणि राजमाता संपत्ती विकू शकत नाहीत. न्यायालयाने तात्काळ ज्योतिरादित्यांच्या बाजूने निकाल देत संपत्ती हस्तांतरणाला स्थगिती दिली.
२००१ मध्ये या कुटुंबावर दुहेरी आघात झाला. जानेवारीत राजमाता आणि पाठोपाठ सप्टेंबरमध्ये माधवराव सिंधिया यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. पिता आणि आजीच्या मृत्यूनंतर ही लढाई ज्योतिरादित्य आणि त्यांच्या आत्या, वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे यांच्यात सुरू झाली. आत्यांनी १९९९ चे राजमातांचे दुसरे मृत्युपत्र समोर आणले ज्यात सर्व संपत्ती मुलींच्या नावे होती. पण काळ पुढे सरकला. २०२० मध्ये ज्योतिरादित्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि आत्या भाचा एकाच राजकीय छत्राखाली आल्यावर कुटुंबातील कटुताही विरघळू लागली.
तब्बल तीन दशके कोर्टाच्या वाऱ्या केल्यानंतर अखेर सप्टेंबर २०२४ मध्ये कुटुंबाने सामंजस्याने वाटणीला होकार दिला आणि आता जुलै २०२६ मध्ये ग्वाल्हेर कोर्टात या तडजोडीचा अंतिम अर्ज दाखल झाला आहे. शंभर कोटींपेक्षा जास्त किमतीचा जयविलास पॅलेस, १९८ कोटींची खुली जमीन, राणी महल, हिरणवन कोठी, महाराष्ट्र मधील जमिनी, ६२३ किलो सोने, ३३२ किलो चांदी, ९ कॅरेटचा सोन्याचा कप आणि मुंबईतील समुद्र महलसारख्या ३५.५३ कोटींच्या फ्लॅट्ससह शेकडो कोटींच्या या संपत्तीचा आता शांततेत वाटप होणार आहे.
राणोजी नावाच्या एका सामान्य सैनिकापासून सुरू झालेला हा वंश भारताच्या राजकारणात आणि इतिहासात किती खोलवर रुजला आहे, हेच यावरून दिसते. राजघराण्यांची संपत्ती जेवढी आलिशान असते, तिची वाटणी तेवढीच भयानक असू शकते, हा मोठा धडा या ३५ वर्षांच्या संघर्षाने दिला आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे या सिंधिया घराण्याचा 'गेम ऑफ थ्रोन्स' आता कायमचा संपुष्टात आला आहे.
वाचकहो, राजकारण आणि संपत्तीच्या मोहात रक्ताची नाती कशी पणाला लागतात, याचं हे जिवंत आणि अंगावर काटा आणणारं उदाहरण आहे. सिंधिया घराण्यातील या महानाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सत्तेची नशा की पैशांचा मोह... यात नक्की कोण कुणावर भारी पडलं?
क्रेडिट : 'विषय हार्ड' फेसबुक पेज

0 टिप्पण्या