विश्लेषण: प्रथिनांच्या कमी सेवनाने आयुष्य कसे वाढते?

 


विश्लेषण: प्रथिनांच्या कमी सेवनाने आयुष्य कसे वाढते? 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 9/8/2026 :

_कमी प्रथिने सेवन केल्याने आरोग्याला अधिक फायदे मिळू शकतात आणि आयुर्मान वाढू शकते, असे एका नव्या अहवालातून उघड झाले आहे. काय आहे हा अहवाल, यात नक्की काय म्हटले आहे याचा हा आढावा.._

*अहवालात काय म्हटले आहे?*

प्रथिनयुक्त आहार आरोग्यासाठी फायद्याचा असतो, असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. त्यामुळेच सध्या अशा प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवनही वाढले आहे. मात्र ‘सेल प्रेस ब्लू’ या ‘सेल प्रेस’ नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अहवालात, प्रथिनांचे कमी सेवन केल्याने आरोग्याला अधिक फायदे होऊ शकतात आणि काही बाबतीत आयुर्मानही वाढू शकते, असा दावा करण्यात आला आहे. प्रथिनांचे सेवन कमी करणे आणि वृद्धत्व यावर आधारित ३५० हून अधिक शोधनिबंधांचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे.

*वैद्यकीय चाचण्यांमध्ये काय आढळले?*

प्रथिने कमी खाणाऱ्या व्यक्ती जास्त कॅलरीयुक्त आहार घेत असल्या तरी, प्रथिनांचे सेवन कमी केल्याने त्यांचे वजन आणि चरबीचे प्रमाण कमी होऊ शकते, असे वैद्यकीय चाचण्यांमध्ये आढळून आले आहे. तसेच उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी सुधारण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. परंतु त्याच वेळी, काही अभ्यासांमध्ये व्यायामाबरोबर अधिक प्रथिने खाल्ल्याने वृद्ध व्यक्तींमधील वजन कमी होण्यास आणि वयानुसार होणारी स्नायूंची झीज कमी होण्यास मदत होऊ शकते, असे देखील आढळून आले आहे. या निष्कर्षांमुळे अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी या वर्षी आपल्या आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा केली असून, दररोजच्या प्रथिनांचे सेवन शरीराच्या वजनानुसार प्रति किलोग्राम १.२ ते १.६ गॅमपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. जी पूर्वीच्या शिफारशींच्या जवळपास दुप्पट आहे. 

*अभ्यासामागील कारण काय?*

अमेरिकी लोक पूर्वीपेक्षा जास्त प्रथिने खातात. विशेष म्हणजे जेष्ठ नागरिकांनाही अधिक प्रमाणात प्रथिनयुक्त आहार घ्यावा, यासाठी त्यांना दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर युनिव्हर्सिटी ऑफ विस्काॅन्सिन-मॅडिसनचे अभ्यासक आणि या शोधनिबंधाचे लेखक डडली लॅमिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रथिने कमी खाणे आणि वृध्दत्व यावरील दशकांच्या संशोधनाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यांनी ३५०हून अधिक शोधनिबंधांचा आधार घेऊन, या संभाव्य कार्यप्रणालींची रुपरेषा मांडली. त्यांनी याद्वारे प्रथिनांचे नियंत्रित सेवन केल्यास आपण आरोग्य कसे सुधारु शकतो, हे स्पष्ट केले. त्यांनी मांडलेल्या कार्यप्रणालींनुसार, प्रथिने कमी खाण्यामुळे चयापचय सुधारते. पेशी पोषक तत्वांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात ज्यामुळे पेशींचे नुकसान कमी होते. याचा एकंदरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होऊन वृध्दत्वाची प्रक्रिया मंदावते, असे त्यांनी आपल्या अहवालात मांडले आहे.‌

*हार्मोन वाढीत प्रथिनांची भूमिका काय?*

प्रथिनांचे कमी सेवन केल्यामुळे फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर २१ (एफजीएफ२१) नावाच्या हार्मोनमध्ये वाढ होते. हे हार्मोन शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता वाढवतात.‌ तसेच रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारु शकते आणि दाह कमी करु शकतात. उंदरांवर याबाबत अभ्यास करण्यात आला होता. ज्या प्राण्यांमध्ये फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर २१ची पातळी जास्त होती, ते सामान्य उंदरापेक्षा जास्त जगले आणि हा फायदा मादी उंदरांपेक्षा नर उंदरांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून आला. प्रथिनयुक्त पदार्थांचे कमी प्रमाणात सेवन केल्याने माणसांमध्ये फायब्रोब्लास्ट ग्रोथ फॅक्टर २१ची पातळी वाढते. यात प्रथिनांचे मूलभूत घटक असलेल्या अनेक अमायनो ॲसिड्सचाही अभ्यास करण्यात आला. ज्यात मेथिओनिन, आयसोल्युसिन आणि व्हलिन यांचा समावेश आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की या अमायनो ॲसिड्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शारीरिक वाढीस चालना देणाऱ्या जैविक प्रक्रिया सुरू होऊ शकतात, ज्यामुळे लठ्ठपणा, दाह आणि वयाशी संबंधित वयाशी संबंधित इतर आजारांंचा धोका वाढतो. 

*प्रथिनांचे अधिक सेवन कोणासाठी फायद्याचे?*

लॅमिंग यांनी त्यांच्या अहवालात स्पष्ट केले आहे की, बैठे काम करणाऱ्यांनी अधिक प्रमाणात प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास त्यांच्या आरोग्यावर त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. गर्भवती महिला, वृध्द व्यक्ती यांना प्रथिनांची जास्त गरज असते. मात्र ते बैठे काम करत असतील तर त्यांना प्रथिनयुक्त अन्नपदार्थांमधून अपेक्षित असलेले फायदे मिळतीलच असे नाही. रॅगिंग यांच्या मते खेळाडू अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रथिनयुक्त आहार सेवन करतात. मात्र ते नियमित व्यायाम करत असल्याने त्यांच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होत नाही. प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन आणि व्यायाम यामुळे त्यांचे स्नायु मजबूत होतात. सध्या लोकांना अधिक प्रथिनयुक्त आहार घेण्यासह व्यायाम करण्यासही प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे प्रथिनयुक्त आहारांचे सेवन करण्यासाठी शिफारस करताना केवळ वय पाहू नये तर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या किती सक्रिय आहे, हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे, असे मत लॅमिंग यांनी मांडले आहे.

धर्मेश शिंदे

संकलन : यशवंत वाघ

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या