“अकलूज ही खेळाडूंची खाण; राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी” — दत्तात्रय वरकड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/8/2026 :
“अकलूज ही खेळाडूंची खाण असून या भूमीने अनेक नामवंत खेळाडू घडविले आहेत. राष्ट्रीय पातळीवरही येथील खेळाडू अकलूजचे नाव अभिमानाने उज्ज्वल करीत आहेत. ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे.” सदाशिवराव माने विद्यालयाचे क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे असून विद्यालयाने सातत्याने गुणवंत खेळाडू घडविण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड यांनी काढले. येथील सदाशिवराव माने विद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड, मैदानी खेळांची गोडी तसेच आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने
खेळामध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींची माहिती देताना वरकड यांनी स्पर्धा परीक्षा तसेच प्रशासनातील खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी केवळ मैदानावर सराव करण्याबरोबरच आपल्या आहाराकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सकस व संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैली यामुळे खेळाडूंची शारीरिक व मानसिक क्षमता वाढते, असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या काळात मोबाईलचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालींवर परिणाम करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून काही काळ दूर राहून अधिकाधिक मैदानी खेळ खेळावेत, खेळाच्या माध्यमातून शरीर सुदृढ ठेवावे आणि संघभावना, शिस्त, चिकाटी व नेतृत्वगुण विकसित करावेत, असे आवाहनही जिल्हा क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अमोल फुले होते. प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत, कल्पना मोरे, क्रीडा शिक्षक उमेश भिंगे, भीमाशंकर पाटील, भीमराव दुधाळ यांच्यासह विद्यालयातील विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी सुज्योत पंडित याने क्रीडा दिनविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ हवाले याने तर आभार संजय राऊत यांनी मानले.

0 टिप्पण्या