ईसीजी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9/8/2026 :
सरळ रेषेत असणारा ईसीजी खेळ आटोपल्याच सांगतो, खाली वर होणाऱ्या रेषा जिवंतपणा सांगतात.
व्यक्ती ,कुटुंब, समाज, संस्था, संघटना, पक्ष , देश यांच्यामध्ये पण थोड्याफार फरकाने नेमक असच असत.
भागवतकाकांपासून सगळे खडबडून जागे होऊन जेनझी च्या नाकदुऱ्या का काढून राहिलेत माहितेय का ?
सत्ता जाण्याची भीती ? ती गेली तरी सत्तेत राहता येत हे मागले शंभर वर्ष संघाने अनुभवलेलं आहे.
राजकीय सत्ता भरपूर काही करण्याला संधी देते यात शंकाच नाही.
संघाची चिंता वेगळीच आहे.
या आधीच्या पिढ्या मध्ये संघाचे समर्थक थेट शाखेत जात नसले तरी किमान समर्थक होते.
भाजपच्या नेत्यांच्या पोरांनी आईबाप कोलून प्रधानांचा राजीनामा मागणे किंवा आंदोलनांना पाठींबा देणे हे वरवर पाहिलं तर किरकोळ उदाहरण वाटेल. दोन चार भाजप नेत्यांचा अपवाद म्हणून सोडा अस काहीजण म्हणतील.
पण ही धोक्याची घंटा आहे.
आंदोलनात सहभागी असणाऱ्या पोरांमध्ये फक्त भाजप विरोधक आईबापांची पोर होती अस नाहीये ना , मग जर आपल्या आईबापांची राजकीय मत आणि आयुष्यभराची राजकीय निष्ठा पोर कोलणार असतील तर संघाला कोलायला किती वेळ लागेल ?
या आंदोलनाने समोर आणलेली सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदू मुस्लिम धार्मिक वाद, पाकिस्तानचा बागुलबुवा, चीनची भीती वगैरे सगळ्या गोष्टींचा सरप्राईज एलेमेंट संपलेला आहे.
मुळात हि नवी पिढी या सगळ्याच्या पलीकडे जाऊन व्यवहारिक पातळीवर माझ शिक्षण आणि माझा रोजगार याच दोन गोष्टीवर तूर्त लक्ष केंद्रित करून आहे.
हीच पिढी अशीच व्यवहारिक राहिली आणि धर्म-जात-भारत-पाकिस्तान-चीन वगैरे शेणाचे पो दुर्लक्ष करून संविधानाशी , कायद्याशी प्रामाणिक राहू लागली तर टरमाळ वाजलं म्हणून समजा.
आज हापच्या फुल झालेल्या चड्ड्या घालून शाखेत जाणारी पिढी तशीच मसणात पोहोचली तर शाखेत जाणार कोण ?
वर ईसीजीच उदाहरण दिलेलं ते याच साठी.
प्रत्येक पक्षाच्या, संघटनेच्या आयुष्यात एक सर्वोच्च काळ येतो.
जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही शून्य असता.
तिथून पुढे जी काही प्रगती करता, मिळवता ती सगळी बेरीज असते.
बेरीज करता करता एक क्षण असा येतो कि तो सर्वोच्च असतो.
तिथ टिकून राहायला जमल पाहिजे.
इथ थर्ड जनरेशन थिअरी येते.
पहिली पिढी कष्टातून सुरुवात करते, दुसरी पिढी पहिल्या पिढीला पाहत त्यावर कळस चढवते, पण तिसऱ्या पिढीला संघर्ष माहिती नसतो, तिसरी पिढी फक्त सुबत्ता पाहते , उत्कर्ष पाहते. मग त्याचा अहंकार झाला कि साम्राज्य टिकवण अवघड जात.
मग उतरणीचा काळ सुरु होतो.
संघाचा सर्वोच्च काळ २०१९ च्या लोकसभेत पुलवामा नंतर भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लीम कार्ड खेळून पाशवी बहुमत मिळवणे हाच होता.
२०२४ ला बळच सावरून धरलेलं होत.
हि उतरण आता समोर आलेली आहे.
आणि हे अपरिहार्य आहे.
गुलाबजाम कितीही आवडत असले तरी बारा महिने दोन्ही वेळेला फक्त गुलाबजाम खाऊन कुणी जगू शकणार नाही.
हिंदू मुस्लीम, भारत पाकिस्तान, औरंगजेब वगैरे सगळ्याच अजीर्ण झालेलं आहे हे यांना समजलच नाही.
या द्वेषाची शिसारी असणारी हि मुल आहेत जी उघडपणे तुम्हाला कोलून लावत आहेत.
सगळ्यांची धावपळ सुरु झालेली आहे ती हि पडझड थांबवण्यासाठी.
आणि कॉंग्रेसच्या बाबतीत तरी वेगळ काय झालेलं आहे ?
कॉंग्रेसने १८८५ मध्ये सुरुवात केली , स्वातंत्र्य मिळवल हा यशाचा पहिला टप्पा होता, इंदिरा गांधीच्या सरकारचा काळ , बांगलादेश युद्ध जिंकणे हा सर्वोच्च टप्पा होता.
तिथून पडझड सुरु झाली , ती २०१९ ला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याची मारामार झाली इथवर आली.
हे चक्र असच चालणार.
पुन्हा यशाचा काळ येणार. मेहनत घेणारे पुन्हा चांगले दिवस दाखवणार. ज्यांनी कष्ट बघितले नाहीत ते माज करणार आणि पुन्हा मिळवलेली इज्जत , इभ्रत मातीत घालणार.
हे कुणालाही चुकलेल नाही.
जगातल्या कितीही मोठ्या साम्राज्याचा इतिहास तपासून पहा.
थर्ड जनरेशन थिअरी थोड्याफार फरकाने सगळीकडे डोकावते.
मागल्या काही वर्षात विक्रमी संख्येने भरल्या जाणाऱ्या शाखा तेवढ्याच विक्रमी संख्येने बंद पडण्याच्या भीतीने सगळ्यांची धावपळ सुरु झालेली आहे.
आनंद शितोळे
#रविवारची_पोस्ट
#उनपाऊस

0 टिप्पण्या