🟣 अकलूज पोलिसांच्या नेत्रदिपक कामगिरीचा राज्यात डंका 💢 आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून अकलूज पोलिसांनी १७ पिस्तुलं,४७ जिवंत काडतुसांसह १८.४७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त;६ आरोपी अटकेत

 

🟣 अकलूज पोलिसांच्या नेत्रदिपक कामगिरीचा राज्यात डंका

💢 आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून अकलूज पोलिसांनी १७ पिस्तुलं,४७ जिवंत काडतुसांसह १८.४७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त;६ आरोपी अटकेत 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/8/2026 :

आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून अकलूज पोलिसांनी १७ पिस्तुलं,४७ जिवंत काडतुसांसह  एक टाटा नेक्सॉन कार असा तब्बल १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत ६  आरोपींना गजाआड केले.

१४ ऑगस्ट २०२६ रोजी अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस हे.कॉं. श्रीराम पोरे यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की,विकास कैलास वजाळे (रा. परीते,ता माढा) हा टाटा नेक्सॉन कारमधून (MH 45 AE 7002) बेकायदेशीर पिस्तुल विक्रीसाठी अकलूज-टेंभुर्णी रोडवरील पतंगे मटन हॉटेलजवळ येत आहे.अशी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके व पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक तयार करून धाड टाकण्यात आली.पोलिसांनी विकास वजाळे याला २ पिस्तुलं, ४ जिवंत काडतुसं आणि कारसह रंगेहात ताब्यात घेतल्याने बेकायदेशीर शस्त्र विक्रीचे आंतरराज्यीय नेटवर्क उद्ध्वस्त झाले.

विकास वजाळे याची सखोल चौकशी केली असता या रॅकेटचे जाळे सांगली, बेळगाव ते थेट मध्यप्रदेश पर्यंत पसरल्याचे उघड झाले.मुख्य पुरवठादार अनिल पंचलाल मेहता (रा. रांजणगाव, मध्यप्रदेश) याच्याकडून ही पिस्तुलं आणून पुढे सोलापूर,सांगली आणि कर्नाटक परिसरात विकली जात होती.

अकलूज पोलिसांच्या विशेष पथकाने धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे सापळा रचून मध्यप्रदेशच्या मुख्य पुरवठादार अनिल मेहता याला ४ पिस्तुलं व २५ काडतुसांसह शिताफीने अटक केली.यानंतर टेंभुर्णी परिसरातून सांगलीतील “उमदी पोलीस ठाण्यातील” खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला अट्टल आरोपी राहुल सतीश माने यालाही जेरबंद केले.राहुल माने याच्याकडून आणखी ६ पिस्तुलं व ८ काडतुसं हस्तगत करण्यात आली.

अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल 

अटक आरोपी :१) विकास कैलास वजाळे (वय ३१,रा परीते,ता माढा),२) राहुल सतीश माने (वय ३४,रा मिरज,जि. सांगली  (उमदी ठाण्यातील फरार आरोपी),३) महादेव बाळासाहेब कोरके (वय ३०,रा करकंब,ता पंढरपूर),४) विजय सदाशिव किरणगी (वय ३४,रा शिवणूर,जि बेळगाव,कर्नाटक),५) अनिल पंचलाल मेहता (वय ३२, रा.बडवानी,मध्य प्रदेश),६) सुमित नाना लवटे (वय १९,रा सांगोला), प्रदिप पांडुरंग माने व शनी भारत बनसोडे हे २ आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा तीव्र शोध घेत आहेत…जप्त मुद्देमाल (एकूण किंमत ₹१८,४७,०००/-):देशी बनावटीची पिस्तुलं (१७ नग): किंमत ₹१०,००,०००/-जिवंत काडतुसं/राऊंड (४७ नग): किंमत ₹४७,०००/-टाटा नेक्सॉन कार (MH 45 AE 7002): किंमत ₹८,००,०००/-सर्व आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

           

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,अपर पोलीस अधीक्षक (पंढरपूर) श्रीमती प्रेरणा कट्टे व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शना खाली अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे (तपास अधिकारी), अंकुश वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम,अंमलदार व पथक – श्रीराम पोरे,शिवकुमार मदभावी,राहुल रणनवरे,अमोल बकाल,समीर पठाण,दत्तात्रय खरात,रणजित जगताप,तुकाराम माने देशमुख,विजय लवटे तसेच पोलीस अधीक्षक पथकातील शरद कदम,सुरज हेंबाडे,अनिल शिंदे,स्वप्नील गायकवाड व सायबरचे प्रविण मेटकरी इत्यादी सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या