तुकोबांची गाथा म्हणजे मानवी संस्कृतीला लाभलेला अलौकिक, अजरामर पारमार्थिक परिस
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 12/8/2026 :
श्री तुकाराममहाराज गाथा (पारायण प्रत) नुकतीच वाचनात आली. अखंड मानव समाजाला कर्मकांड, बुवाबाजी यापासून परावृत्त करणारे श्रीसंत तुकाराम महाराज हे एकमेवाद्वितीय होय. संतश्रेष्ठी तुकाराम महाराज गाथा हा केवळ वारकरी संप्रदायाचाच नव्हे, तर संपूर्ण मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा अमूल्य मुकुटमणी आहे. सतराव्या शतकात रचला गेलेला हा ग्रंथ आज २१ व्या शतकातही मानवी जीवनाला योग्य मार्ग दाखवणारा एक भक्कम दीपस्तंभ ठरला आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या भूमीला लाभलेले एक दैदिप्यमान रत्न म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज होय.त्यांची 'अभंग गाथा' हा मराठी वाङ्मयातील आणि जागतिक साहित्यातील एक अद्वितीय आणि अलौकिक ठेवा आहे. त्यांच्या वाणीतून अवतरलेली ही गाथा मानवी मनाचे, समाजाचे आणि तत्कालीन परिस्थितीचे हुबेहूब चित्रण करणारी आहे. हा ग्रंथ म्हणजे केवळ धार्मिक कवितांचा संग्रह नसून तो मानवी जीवनाचे मानसशास्त्र अत्यंत सोप्या भाषेत सांगणारा जीवनसार आहे. मराठी भाषेची समृद्धी, ताकद आणि तिचे खरे सौंदर्य काय आहे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा होय. सामान्य माणसाला ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग या ग्रंथाने दाखवला आहे. याचे उदाहरण म्हणून त्यांनी पुढील ओवीतून सप्रमाण सांगितले आहे *मन करा रे प्रसन्न | सर्व सिद्धीचे कारण |*
'श्री संत तुकाराम महाराज अभंग गाथा' या महान ग्रंथात साधारणपणे साडेचार हजारहून अधिक अभंगांचा समावेश असून या अभंगांची भाषा अत्यंत साधी, सरळ, प्रासादिक आणि तळागाळातील ग्रामीण जनतेला सहज समजेल अशी आहे. दैनंदिन जीवनातील घरगुती दाखले देऊन कठीण आध्यात्मिक तत्त्वज्ञान सोपे करणे हे या ग्रंथाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. गाथेत मानवी भावनांचे, अंतर्मनातील सुख-दुःखांचे आणि व्यावहारिक संघर्षाचे अत्यंत प्रामाणिक प्रकटीकरण आढळते. यात भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीतिशास्त्र आणि समाजसुधारणा यांचा एक अपूर्व आणि सुरेख संगम झाला आहे. यासाठी एका अभंगात म्हणतात की –
*आनंदाचे डोही आनंद तरंग ।आनंदचि अंग आनंदाचे ॥*
तुकोबांचे अभंग हे मुख्यत्वे 'अक्षरछंद' आणि 'ओवी' या अतिशय सुलभ छंद प्रकारात बद्ध आहेत. हा संपूर्ण ग्रंथ वाचताना त्यातील लयबद्धता, गेयता आणि नादमयता वाचकाला पूर्णपणे मंत्रमुग्ध करते. भक्तीचे स्वरूप आणि विठ्ठल प्रेम यातून दिसून येते. गाथेचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे पंढरीचा विठ्ठल आणि तुकोबांचे त्याच्यावरील अनन्यसाधारण प्रेम होय.. तुकाराम महाराजांची भक्ती ही आंधळी किंवा अंधश्रद्धेवर आधारित नव्हती, तर ती अत्यंत जागृत आणि संवादात्मक होती. त्यांनी विठ्ठलाला कधी आपली माउली मानले, कधी सखा मानले, तर कधी त्याच्याशी हक्काने भांडणही केले. "तुज सगुणाची मज वाटे आस" असे म्हणत त्यांनी सामान्य माणसासाठी सगुण भक्तीचा सोपा मार्ग खुला केला. विठ्ठल नामाचा सतत गजर हाच त्यांच्या संपूर्ण जीवनाचा एकमेव आधार होता, हे गाथेतून स्पष्ट जाणवते.
ईश्वराशी एकरूप होणे म्हणजे नेमके काय, याचा अत्यंत सहज आणि सुलभ अनुभव हा ग्रंथ आपल्याला करून देतो. बाह्य अवडंबरापेक्षा अंतःकरणाची शुद्धता हीच खरी भक्ती, हा अमूल्य संदेश गाथा पावलोपावली देते. सामाजिक बंडखोरी आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपल्या लेखनीतून बंड केले. तुकाराम महाराजांची गाथा ही केवळ अध्यात्माची पोथी नसून ते एक क्रांतिकारी सामाजिक बंड आहे. तत्कालीन समाजातील कर्मकांड, जातीभेद, ढोंगीपणा आणि अंधश्रद्धा यांवर तुकोबांनी अत्यंत तीव्र प्रहार केले. *"मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू आम्ही ||"* यातून त्यांच्या क्रांतिकारी स्वभावाची वज्रकठिणता दिसते. ढोंगी साधू आणि बुवाबाजीवर प्रहार करताना ते म्हणतात, *"अंगा लावूनिया राख | डोळे मिटूनि करिती पाप"* त्यांनी जन्मावर आधारित जातीभेदाचा तीव्र निषेध केला आणि सर्व मानवांना जन्माने समान मानले. *"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेद भ्रम अमंगळ ||"* हा गाथेचा सर्वात मोठा आणि उदात्त संदेश आहे.
समाजातील शोषितांना, उपेक्षितांना आणि पिडितांना स्वाभिमानाने जगण्याची खरी ताकद या ग्रंथाने दिली. जीवनमूल्ये आणि व्यावहारिक शहाणपण यातून दिले गेले आहे. गाथेत मानवी जीवनाला आदर्श आणि समृद्ध करणारी उत्तम व्यावहारिक जीवनमूल्ये शिकवली आहेत. *"जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले || तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||"* ही साधूची खरी व्याख्या त्यांनी मांडली. परोपकार, सत्य, प्रामाणिकपणा, नम्रता आणि क्षमाशीलता या मानवी गुणांचा मोठा आग्रह गाथेत धरला आहे. संपत्ती कशी कमवावी याबद्दल ते म्हणतात, *"जोडोनिया धन उत्तम वेव्हारे | उदास विचारे वेच करी ||"* मानवाने निसर्गाशी कसे नाते जोडावे, याचे सुंदर वर्णन "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या अभंगात आढळते. अहंकार पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय माणसाला आत्मिक सुख मिळत नाही, हा विचार गाथा प्रकर्षाने मांडते. संकटाच्या आणि नैराश्याच्या काळात खचून न जाता धैर्याने कसे उभे राहावे, याचे आत्मबळ हा ग्रंथ देतो.
संत तुकाराम महाराजांची भाषा ही थेट जनमानसाच्या काळजाला भिडणारी आणि हृदयात उतरणारी भाषा आहे.३६. त्यांच्या काव्यात रूपके, उपमा, उत्प्रेक्षा आणि दृष्टांत अलंकारांचा अत्यंत अचूक आणि सुंदर वापर केला आहे. गाथेतील अनेक ओळी आज मराठी भाषेत सुभाषिते, म्हणी आणि सुवचने म्हणून सर्रास वापरल्या जातात. *"असावा सुदेश सुविद्य सुजाण", "भले तरी देऊ गांठीची लंगोटी"* यांसारखे विचार मराठी संस्कृतीचे अंग बनले आहेत. यातून गाथेतील काव्यसौन्दर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये अधोरेखित होतात. त्यांच्या शब्दांमध्ये एक अद्भूत आत्मिक ताकद, पारदर्शकता आणि अस्सलपणा आहे जो वाचकाला खिळवून ठेवतो. संत वाङ्मयातील 'प्रसादाचा' आणि 'माधुर्याचा' गुण तुकोबांच्या गाथेत सर्वोच्च पातळीवर दिसून येतो.
तुकोबांची गाथा तत्कालीन सनातनी सत्तेने आणि लोकांनी द्वेषापोटी इंद्रायणी नदीत बुडवली होती, असा इतिहास आहे. परंतु, लोकांच्या मनात आणि मुखात असलेल्या या गाथेने नदीतून पुन्हा जिवंत बाहेर येण्याचा चमत्कार घडवला. हा केवळ पाण्याचा चमत्कार नव्हता, तर तो तुकोबांच्या विचारांचा आणि जनसामान्यांच्या अतूट प्रेमाचा विजय होता. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत या ग्रंथाचा वाटा सिंहाचा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या काळात या गाथेने जनतेला मोठे नैतिक आणि मानसिक अधिष्ठान दिले. आजही दरवर्षी आषाढी-कार्तिकी वारीमध्ये लाखो वारकरी या गाथेतील अभंग गात विठ्ठलाची वाट चालतात. यावरून गाथेचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात येते.
वरील विवेचनावरून निष्कर्ष आणि थोडक्यात मूल्यमापन असे करता येईल की, संत तुकाराम महाराजांची गाथा हा मानवी जीवनाचा एक परिपूर्ण आणि जागतिक दर्जाचा मार्गदर्शक ग्रंथ आहे. हा ग्रंथ कोणत्याही एका विशिष्ट जातीचा, धर्माचा किंवा पंथाचा नसून तो संपूर्ण जगातील मानवजातीचा आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे आणि प्रेमाने कसे वागावे, हे शिकवणारे हे एक महान वैचारिक व्यासपीठ आहे. आजच्या आधुनिक, गतिमान आणि तणावपूर्ण युगात मनाला खरी शांतता मिळवण्यासाठी गाथेचे वाचन अत्यंत गरजेचे आहे. चारशेहून अधिक वर्षे उलटून गेल्यानंतरही या ग्रंथाचे प्रासंगिकत्व तसूभरही कमी झालेले नाही, उलट ते वाढतच आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या घरात, ग्रंथालयात आणि मनात या गाथेला एक अढळ व मानाचे स्थान असायलाच हवे. तुकोबांची ही गाथा म्हणजे मानवी संस्कृतीला लाभलेला एक अलौकिक, अजरामर आणि अमूर्ता असा पारमार्थिक परिस आहे.
ज्ञानेश्वर जनार्दन पायमोडे
येवला
मो.9404571864


0 टिप्पण्या