✒️आयुष्य : एक अवघड गणित
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 9/8/2026 :
माणूस जन्माला येतो तेव्हापासूनच एका न दिसणाऱ्या पाटीवर आयुष्याचे आकडे मोडायला सुरुवात करतो. शाळेतल्या पानावर चुकलेला हिसाब रबरने पुसून नव्याने मांडता यायचा; पण आयुष्याच्या पानावर एकदा शाई सांडली की तो हिशोब पुसता येत नाही. कधीकधी शांत बसून विचार करताना मनाला चुटपूट लागते, आपल्याला या जीवनाचे गणित खरंच कधी समजलेच नाही की काय?
आपण आयुष्यभर नाती जपण्याचा अतोनात प्रयत्न करतो. नात्यांची भक्कम बेरीज व्हावी म्हणून प्रत्येक वळणावर स्नेहाचा हातचा धरून ठेवतो, पण तरीही कुठेतरी गफलत होतेच. ज्या आवडीच्या माणसांशी मनाचे सूर जुळावेत, तिथेच ताळमेळ बसत नाही. प्रेमाचा गुणाकार करून सुख द्विगुणीत करण्याची इच्छा असते, पण समोरून योग्य ‘गुणकाची’ साथ मिळाली नाही, तर मनासारखे उत्तर येतच नाही.
दुःख हलके व्हावे म्हणून त्याचा भागाकार करण्याचा प्रयत्न करतो. वाटते की दुःख भागल्याने त्याची बाकी शून्य उरेल; पण वेदनेचा काही ना काही अंश शिल्लक राहतोच. या समीकरणात वजाबाकी मात्र सतत साथ देते. आयुष्याच्या प्रवासात काळाच्या ओघात कितीतरी हसरे चेहरे वजा होत गेले, याचा पत्ताच लागला नाही.
आता कुठे गणित सुटले असे वाटत असतानाच नियती नवीन कूटप्रश्न समोर आणून उभी करते. पण शेवटी एक सत्य स्वीकारायला हवे, आयुष्य हे सोडवण्यासाठी दिलेला गणिताचा पेपर नाही, तर तो अनुभवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. आयुष्याच्या पाटीवर किती माणसे वजा झाली.
यापेक्षा, त्यांनी दिलेला स्नेह आणि आठवणी मनात किती ‘जमा’ राहिल्या, यावरच आयुष्याची खरी श्रीमंती ठरते. गणिताचे उत्तर शून्य आले नाही तरी चालेल, कारण काही समीकरणे अधुरी राहण्यातच जगण्याचा खरा अर्थ आणि सौंदर्य दडलेले असते.
ShradDhanesh's_Dairies✒️ संकलन : प्रवीण सरवदे, कराड
====================

0 टिप्पण्या