बाबासाहेब क्षीरसागर यांची मांजरी हायस्कूलला सदिच्छा भेट; प्रेरणादायी मार्गदर्शनासह भव्य सत्कार

 


बाबासाहेब क्षीरसागर यांची मांजरी हायस्कूलला सदिच्छा भेट; प्रेरणादायी मार्गदर्शनासह भव्य सत्कार

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 18/7/2026 : 

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या योगदानाची दखल घेत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी बाबासाहेब क्षीरसागर  यांची रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड केली. या अभिमानास्पद निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी हायस्कूल, मांजरी (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यालयास सदिच्छा भेट देऊन शाखेतील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती, उपलब्ध सुविधा तसेच विद्यालयासमोरील अडीअडचणी यांची सविस्तर माहिती जाणून घेतली. विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांशी संवाद साधून आवश्यक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास माजी रयत सेवक प्रा. एस. डी. वाघमारे  प्रगतशील बागायतदार गायकवाड  प्रगतशील बागायतदार माळी, विद्यालयाचे मुख्याध्यापक  रायभान, स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य जगताप, राज्य अभ्यासक्रम मंडळाचे सदस्य व सहाय्यक शिक्षक प्रशांत कोळसे, श्री. बनसोडे, श्री. काळे, इतर शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेब क्षीरसागर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव केला. मुख्याध्यापक रायभान यांनी आपल्या मनोगतात रयत शिक्षण संस्थेच्या ग्रामीण शिक्षण परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी बाबासाहेब क्षीरसागर यांच्यासारख्या अभ्यासू व समर्पित कार्यकर्त्यांची जनरल बॉडी सदस्यपदी झालेली निवड ही संपूर्ण संस्थेसाठी गौरवास्पद असल्याचे नमूद केले.

सत्काराला उत्तर देताना  बाबासाहेब क्षीरसागर यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. "आजचा विद्यार्थी हा उद्याचा सक्षम नागरिक आहे. त्यामुळे शिक्षणात गुणवत्ता, शिस्त, संस्कार आणि स्वावलंबन या चार मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे," असे ते म्हणाले. विद्यालयाचा निकाल अधिक गुणवत्तापूर्ण व्हावा, अधिकाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवावेत यासाठी प्रत्येक शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील सुप्त क्षमता ओळखून योग्य मार्गदर्शन केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पालकांनाही त्यांनी महत्त्वपूर्ण संदेश देताना मुलांना केवळ शाळेत पाठविणे पुरेसे नसून दररोज त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, मोबाईलचा अनावश्यक वापर टाळणे आणि घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद, विश्वास व समन्वय यामुळेच उत्कृष्ट शैक्षणिक यश प्राप्त होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक शिक्षणावर अवलंबून न राहता कौशल्य विकास, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि रोजगाराभिमुख शिक्षणाकडे वळण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "शिक्षणामुळे विद्यार्थी रोजगार शोधणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा बनला पाहिजे," असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. तसेच भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये, राष्ट्रप्रेम, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जबाबदारी आणि ज्येष्ठांचा आदर या मूल्यांची जोपासना शालेय जीवनापासूनच व्हावी यासाठी शिक्षकांनी मूल्याधिष्ठित शिक्षणावर विशेष भर द्यावा, असे आवाहन केले.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत विद्यालयाने मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यालयाचा गुणवत्तेचा आलेख आणखी उंचावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी  बाबासाहेब क्षीरसागर यांना पुढील शैक्षणिक, सामाजिक व संस्थात्मक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या