⭕शालार्थ आयडी घोटाळा : जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन समर्थक भाजप नेता संजय गरुड नातेपुते येथून ताब्यात


 ⭕शालार्थ आयडी घोटाळा : जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन समर्थक भाजप नेता संजय गरुड नातेपुते येथून ताब्यात!

माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 28/7/2026 :

 राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी मोठी कारवाई करत जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन समर्थक शिक्षणसंस्था चालक संजय गरुड यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते (तालुका माळशिरस) येथून ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून गरुड हे तपास यंत्रणेला हवे होते. अखेर दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर नाशिकच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

संजय गरुड यांना मंगळवारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

*एका दिवसात १७७ शालार्थ आयडी तयार*

तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय गरुड यांच्याशी संबंधित शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेतील १७७ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. शालार्थ प्रणालीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने आयडी एका दिवसात तयार होणे संशयास्पद मानले जात असून, याच मुद्द्यावरून तपास यंत्रणेने सखोल चौकशी सुरू केली आहे. या आयडींच्या आधारे शासनाकडून वेतन अथवा इतर आर्थिक लाभ उचलण्यात आले का, निधी कोणाच्या खात्यात गेला, संबंधित कागदपत्रे आणि मंजुरीची प्रक्रिया कशी पार पडली, याचा तपास एसआयटी करत आहे. या व्यवहारांद्वारे नेमका किती आर्थिक गैरव्यवहार झाला, याबाबत अद्याप अधिकृत आकडा समोर आलेला नसला तरी तपास यंत्रणा आर्थिक व्यवहारांची तपशीलवार छाननी करत आहे.

*अनेक शाळा व महाविद्यालयांचा समावेश*

संजय गरुड यांच्या शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेअंतर्गत जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चोपडा या चार तालुक्यांमध्ये एकूण १५ माध्यमिक शाळा सध्या कार्यरत आहेत. याशिवाय शेंदुर्णी येथे दोन कनिष्ठ महाविद्यालये, वाकोद येथे एक कनिष्ठ महाविद्यालय आणि शेंदुर्णी येथे एक वरिष्ठ महाविद्यालय आहे. या संस्थांशी संबंधित शालार्थ नोंदी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. तपास पथकाचे सहायक आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना संजय गरुड सोलापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाने दोन दिवस सोलापूर परिसरात शोधमोहीम राबवली. संशयित वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्यांचा माग काढणे आव्हानात्मक ठरत होते. मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित गरुड हे नातेपुते येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने एका फ्लॅटवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.

*शालार्थ घोटाळा तपासाला नवे वळण*

या प्रकरणात यापूर्वी जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता संजय गरुड यांना ताब्यात घेण्यात आल्याने तपासाचा फोकस संस्थांमधील शालार्थ प्रक्रियेवर, आर्थिक व्यवहारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर केंद्रित झाला आहे. संजय गरुड यांच्याकडून शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया, संबंधित कागदपत्रे, मंजुरी देणारे अधिकारी, आर्थिक व्यवहार आणि अन्य संबंधित व्यक्तींबाबत माहिती मिळवण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यांच्या चौकशीतून घोटाळ्याच्या व्याप्तीबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते, असा तपास अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

*गरुड यांची राजकीय पार्श्वभूमी*

संजय गरुड यांनी यापूर्वी तीनवेळा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात विरोधात विधानसभा निवडणुका लढवल्या असून, जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते आणि काही काळ जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही गरुड यांनाच कोणतेच राजकीय संरक्षण मिळू शकलेले नाही.

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या