इंदिरा सिक्युरिटी कडुन सुरक्षा रक्षकांची पिळवणूक

 


इंदिरा सिक्युरिटी कडुन सुरक्षा रक्षकांची पिळवणूक

वृत्त एकसत्ता न्यूज

कोल्हापूर/ प्रतिनिधी दि.14/7/2026 :  येथील मार्केट यार्ड परिसरात ऑफिस असणाऱ्या व गोकुळ शिरगाव आणि शिरोली येथे अनेक  औद्योगिक कंपनीत ठेकेदार असलेल्या इंदिरा सिक्युरिटी एजन्सी मार्फत सुमारे चारशे सुरक्षा रक्षक काम करत आहेत.यापैकी अनेकजण वयस्कर व गरीब परिस्थिती असणारे आहेत.त्यांना एजन्सी कडुन पगारात काटछाट करत डोळ्यादेखत लुटले जात आहे. 

कंपनीमार्फत ठेकेदार असणाऱ्या इंदिरा एजन्सीला कामगार कायदयाप्रमाणे पगार दिला जातो परंतु हा पगार सुरक्षा रक्षकाना इंदिरा सिक्युरिटी एजन्सी कडुन देताना त्यामध्ये काटछाट करत आहे. अनेक कामगारांना 12 तास काम करूनही केवळ 8 तासांचेच वेतन दिले जाते. त्यामुळे सुरक्षा रक्षकांची एका अर्थाने आर्थिक पिळवणूक केली जात आहे. नोकरी जाण्याच्या भीतीने सुरक्षा रक्षक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. पर्यायाने, त्यांना जादा काम करूनही कमी पगारावरच संतुष्ट राहावे लागत आहे.इंदिरा सिक्युरिटी एजन्सी आपल्या सुरक्षा रक्षकाना एकही साप्ताहिक सुट्टी देत नाही. कि जादा काम केल्यास दीडपट पगार देत नाही.महिन्याचे ३० दिवस राबवून घेतले जाते.शिवाय एखादा सुरक्षा रक्षक त्या दिवशी कामावर येऊ शकत नसल्यास  त्याच्या बदली जादा काम करावे लागते त्याला अंघोळीसाठी सुध्दा सोडले जात नाही. त्याचबरोबर त्या दिवशी एजन्सी कडुन जेवणाचा डबा देखिल दिला जात नाही.जेवणाची व्यवस्था जादा काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने करायची असा अजब कारभार आहे. 

सुरक्षा रक्षकांवर होणारा हा अन्याय दूर करण्यासाठी अप्पर कामगार आयुक्त कार्यालयानेच आता स्वतः पुढाकार घेऊन उद्योग, व्यावसायिक आस्थापना यांची तपासणी मोहीम राबवायला हवी.

कोणत्याही उद्योगाच्या उभारणीत सुरक्षा रक्षकांचा वाटा हा खूप मोठा असतो. सुरक्षा रक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच उद्योगांची सुरक्षा होते. त्यामुळे सुरक्षा रक्षकाना किमान आणि समान वेतन मिळायला हवे, अशी कामगार नेत्यांची भूमिका राहिली आहे. गोकुळ शिरगाव व शिरोलीमध्ये हजारो छोटे-मोठे उद्योग कार्यरत आहेत.

मोठ्या उद्योगांमध्ये कायमस्वरुपी तत्त्वावर काम करणार्‍या सुरक्षा रक्षकाना किमान वेतन कायद्यानुसार वेतनाचा लाभ मिळतो. मात्र, जे कामगार कंत्राटी तत्त्वावर काम करतात किंवा ज्या कामगारांना कंत्राटदाराकडून वेतन दिले जाते, त्या कामगारांना ठरलेले वेतन आणि प्रत्यक्षात हातात मिळणारे वेतन यामध्ये तफावत पाहण्यास मिळते. ठरलेल्या वेतनापेक्षा कामगारांच्या हातात कमी वेतन टेकविले जाते.

इंदिरा सिक्युरिटी एजन्सी कडुन नवीन कामगार घेताना त्या कामगाराला 12 तास काम करावे लागेल, असे सांगूनच कामावर घेतले जाते. त्याचप्रमाणे, त्यासाठी दरमहा वेतनही निश्चित केले जाते. हे वेतन बर्‍याचदा किमान वेतन कायद्याने ठरविलेल्या निकषापेक्षादेखील कमी असतो. प्रत्यक्षात आठ तासांपेक्षा कामगाराने जादा काम केले असल्यास त्याला त्या जादा तासांसाठी किमान वेतनाच्या दुप्पट दराने पगार देणे अपेक्षित आहे.

कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी सुरक्षा रक्षकाना किमान वेतन, समान वेतन या संकल्पनांना बाजूला ठेवावे लागते. बारा-बारा तास काम करूनही त्यांना केवळ 11 ते 15 हजार इतक्या दरमहा वेतनावरच समाधान मानावे लागते.

वास्तविक शासनाकडून सुरक्षा रक्षकाना वेतन निश्चिती करण्यात आलेली आहे. प्रत्येक उद्योगानिहाय किमान वेतन हे वेगवेगळे आहे. याबाबतची माहिती कामगार आयुक्त कार्यालयाकडून दर सहा महिन्याला प्रसिद्ध केली जाते. पण इंदिरा एजन्सी कडुन त्याप्रमाणे पगार दिला जात नाही. म्हणुन कामगार आयुक्तांकडुन इंदिरा सिक्युरिटी एजन्सीचे लेखापरीक्षण करावे. 

सुरक्षा रक्षकाला जर किमान वेतनापेक्षा कमी वेतन मिळत असेल, जादा कामाचे वेतन दिले जात नसेल किंवा कामाशी संबंधित अन्य तक्रारींसाठी म्हणजे अन्यायकारक पद्धतीने नोकरीवरून काढणे, काम करून घेतले मात्र पगार दिला नाही, प्रॉव्हिडंट फंड, ईएसआय व अन्य सवलतींपासून वंचित ठेवले, आदींसाठी पुण्यातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातंर्गत सहायक कामगार आयुक्तांकडे कामगार किंवा कामगार संघटना दावा दाखल करणार असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या