✒️तरच मिळते हृदयात हक्काची
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 16/7/2026 :
आज पहाटे डायरी उघडली आणि जुन्या आठवणींची पाने जिवंत झाली. आयुष्याच्या या प्रवासात मी एक गोष्ट खूप जवळून अनुभवली आहे, माणसाच्या आयुष्यात मिळवलेली पदे, पैसा किंवा भौतिक यश हे काळाच्या ओघात धूसर होत जाते; पण तुम्ही एखाद्याच्या हृदयात निर्माण केलेली 'हक्काची जागा' कधीच पुसली जात नाही.
माझ्या दैनंदिन धावपळीच्या आणि व्यावसायिक आयुष्यात अनेक प्रकारची माणसे भेटतात. काही जण फक्त कामापुरते जोडले जातात, तर काही जण आपल्या नकळत आपल्या मनाचा कोपरा व्यापून टाकतात. काहींचे बोलणे आणि वागणे इतके निखळ असते की, त्यांचा एक लहानसा सहवासही मनाला उभारी देऊन जातो. मी नेहमी विचार करतो, की कुणी कुणाकडून फार मोठी अपेक्षा ठेवत नाही. पण जेव्हा आपण एखाद्या नैराश्यात असलेल्या व्यक्तीला एक आश्वासक स्माईल देतो, किंवा त्याच्या सुख-दुःखात चार शब्द प्रेमाचे आणि हक्काचे बोलतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आपल्या हयातीतच काय, तर आपण नसतानाही आपल्या आठवणीत जिवंत ठेवते.
माझ्या अनुभवातून मला एक सत्य उमजले आहे, स्वार्थ आणि अहंकार माणसाला क्षणिक मोठेपण देतील, पण शाश्वत आदर आणि प्रेम कधीच मिळवून देऊ शकत नाहीत. वाईट आणि कठीण वेळ ही सांगून येत नाही; आज आपण ज्या परिस्थितीवर गर्व करत आहोत, ती उद्या बदलेलही. पण कठीण प्रसंगात आपण कोणाच्या पाठीशी उभे राहिलो, कोणाला जगण्याचे बळ दिले आणि कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणले, हेच आपले खरे बँक बॅलन्स असते. आपण आज आहोत, उद्या नसू; पण आपले कार्य, आपली माणुसकी आणि दुसऱ्याच्या आनंदात आपण झालेले भागीदार हेच आपले अस्तित्व मागे जिवंत ठेवतात.
आयुष्य खरोखर खूप सुंदर आहे. ते स्वतःही आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. कटुता मनात ठेवून जगण्यापेक्षा प्रेमाचा सुवास दरवळत ठेवणे कधीही चांगले.
शेवटी, श्वासांची ही दोरी कधीतरी तुटणारच आहे. म्हणूनच स्वतःला एक प्रश्न रोज रात्री नक्की विचारून पहा; आपण दिवसागणिक बँकेतील शिल्लक तर वाढवत आहोत, पण कुणाच्या तरी 'हृदयात हक्काची जागा' निर्माण करून स्वतःचे 'माणुसकीचे खाते' समृद्ध करत आहोत ना?
©️🎼ShradDhanesh's_Dairies
संकलन : प्रविण सरवदे,
====================

0 टिप्पण्या