शेवटी अंतर तेवढंच राहतं! ✍️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/7/2026 :
मानवी मन आणि काळाचा महिमा अजब आहे. लहानपणी ज्या गोष्टी आपल्याला गरिबीच्या वाटायच्या, मोठेपणी समजलं की जग फिरून पुन्हा तिथेच येतंय.
लहान असताना हॉटेलमध्ये खाणाऱ्या लोकांकडे बघून वाटायचं, 'किती श्रीमंत आहेत हे, आपण कधी असं खाणार?' आज खिशात पैसा आला आणि हॉटेलमध्ये जाणं रोजचं झालं, तेव्हा श्रीमंत लोक आरोग्यासाठी हॉटेलचं अन्न टाळून घरचा सुका डबा खाताना दिसतात, बालपणी गरिबीमुळे नशिबी फक्त कॉटनचे कपडे असायचे आणि श्रीमंत लोक चकचकीत टेरिकॉट वापरायचे. आज टेरिकॉट स्वस्त झालंय आणि सुती कपडे ब्रँडेड व महाग झालेत. लहानपणी खेळताना पँट फाटली की ती लपवताना जीव तुटायचा; आज तेच लोक बाजारातून दामदुपटीने फाटलेली जीन्स विकत घेऊन तोऱ्यात फिरतात. शेवटी अंतर तेवढंच राहिलं,
सुखाच्या व्याख्याही कशा बदलतात बघा! घरात दूध नसायचं म्हणून गुळाचा काळा चहा वाट्याला यायचा. आज घरात साखरेचा चहा आला, तर लोक डाएटच्या नावाखाली 'गुळाचा ब्लॅक टी' पितात.
रोज ज्वारी-बाजरीची भाकरी खाऊन कंटाळा यायचा, वाटायचं कधी चपाती मिळेल? आज तीच चपाती खाणारे लोक चुलीवरची भाकरी खाण्यासाठी हॉटेल्समध्ये रांगा लावून पैसे मोजत आहेत. लहानपणी वाटायचं आपल्याकडेही गाडी असावी, आज करोडोंच्या गाड्या गॅरेजमध्ये ठेवून लोक आरोग्यासाठी सायकली चालवत आहेत. मातीच्या झोपडीतून बंगल्याचं स्वप्न पाहणारा माणूस आज मनःशांतीसाठी लाखो रुपये खर्च करून रिसॉर्टच्या झोपडीत राहतोय.
या अनुभवातून एकच सत्य गवसलं, की हे जग एका गोल चक्रासारखं आहे. आपण ज्या गोष्टीला गरिबी समजून मागे सोडून आलो, जग आज त्यालाच स्टेटस मानून पैशाने विकत घेतंय. आपण ज्यांच्यासारखं बनण्यासाठी आयुष्यभर धावलो, ते शेवटी आपल्या जुन्या जगण्यासारखं जगण्यासाठी आसुसलेले दिसले. म्हणूनच, कुणाचं पाहून बदलण्यात काहीच अर्थ नाही. स्वतःजवळ जे आहे, त्यात समाधानी राहणं हीच खरी श्रीमंती; कारण धाव कितीही मोठी असली, तरी 'शेवटी अंतर तेवढंच राहतं!'
©️ShradDhanesh's Diaries
संकलन : प्रविण सरवदे, कराड
=====================

0 टिप्पण्या