आठवणींचा पाऊस...

 


आठवणींचा पाऊस...

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/06/2026 :

आठवणींचा पाऊस खरंच किती छान असतो!

आजही मनाला आनंद देऊन जातो. म्हणून मी नेहमीच भिजत राहते आठवणींच्या पावसात.

कधी खूप खूप आनंद होतो, तर कधी मनात दुःखाचे काळे ढग दाटून येतात. मग डोळ्यांतून सरी वाट काढत धो-धो कोसळतात, तर कधी मनातल्याच मनात संततधार धरून राहतात.

काही आठवणी अशा असतात की त्या आयुष्यभर विसरता येत नाहीत. त्यांचा कधी कधी पश्चात्तापही होतो. आयुष्यात काही निर्णय आपण स्वतःच्या मनाविरुद्ध, इतरांच्या आनंदासाठी घेतो. मग त्या निर्णयांसोबत जगणं, आयुष्य निभावणं हेच वास्तव बनून जातं.

कधी त्या आठवणी जाग्या झाल्या की ओठांवर हसू ठेवूनही मनातल्या मनात कुढत राहावं लागतं. आपल्या निर्णयांवर आपणच रडत बसतो आणि पुन्हा एकदा आठवणींच्या पावसात भिजत राहतो... आयुष्यभरासाठी.

पण सगळ्याच आठवणी दुःख देणाऱ्या नसतात,त्या शिकवण ही देतात. काही आठवणी आजही मनाला उभारी देतात, जगण्याची उमेद देतात. त्या तितक्याच ताज्या, टवटवीत आणि हृदयाजवळच्या असतात. म्हणूनच जीवनाचा प्रवास थोडा सोपा वाटतो.

असं प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. काहीजण आपल्या भावना व्यक्त करतात, तर काहीजण शांत राहतात. पण प्रत्येक जण कधीतरी, कुठेतरी, मनाच्या एका कोपऱ्यात... आठवणींच्या पावसात भिजतच असतो.

 ©️ सौ. धनश्री उरणे/म्हेत्रस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या