Non-Veg in Summer : उन्हाळ्यात मांसाहार कितपत योग्य? नेमके काय खावे?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/05/2026 :
या होरपळून काढणाऱ्या उन्हात आहारातज्ज्ञ हलका आहार करण्याची सूचना करतात. ते पूर्णतः टाळावे की माफक प्रमाणात खावे, याविषयी काही मते पुढे येतात. मांसाहारबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा मात्र आहे.
मे महिना उंबरठ्यावर आला असतानाच एप्रिल महिन्यातच वातावरण तप्त झाले आहे. सरासरी ४२ ते ४५ अंश डिग्री तापमान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात नोंदवले जात आहे. शरीराची लाही होत असताना भूक मात्र मंदावत आहे. सतत तहान त्यामुळे जेवण पुरेसे होत नसल्याच्या तक्रारी आहेच. त्यात जर मांसप्रेमी चवीने असा आहार करीत असतील तर ते घातक ठरू शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या होरपळून काढणाऱ्या उन्हात आहारातज्ज्ञ हलका आहार करण्याची सूचना करतात. ते पूर्णतः टाळावे की माफक प्रमाणात खावे, याविषयी काही मते पुढे येतात. मांसाहारबाबत योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा मात्र आहे.
योग्य की अयोग्य?
उन्हाळ्यात मांसाहार योग्य की अयोग्य या थेट प्रश्नावर पूर्णतः बंद करण्याची गरज नाही, असे सांगण्यात आले. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित असावे. मांसाहारी पदार्थात प्रथीने ( Proteins ) मुबलक असतात. ते पचविण्यासाठी शरीरास अधिक उष्णता निर्माण करावी लागते. यास Thermic Effect म्हणतात. त्यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. परिणामी पचनक्रियेवर ताण येतो. सामान्यता रात्रीच्या जेवणात मांसाहार टाळावा. कारण रात्री पचनशक्ती मंदावते. दुपारी किंवा सायंकाळी लवकर जेवून घेणे उत्तम.
हे टाळा
मांस हे तिखट, तेलकट व गरम मसाला टाळून बनवावे. दही किंवा लिंबू वापरुन बनवलेले मांसाचे खाद्य चांगले. मांसाहार केल्यानंतर शरीरास प्रथीन पचण्या (Metabolism) साठी ज्यास्त पाण्याची गरज पडते. म्हणून अधिक पाणी प्यावे. उन्हाळ्यात मांसाहार करताना चवीपेक्षा आरोग्यास महत्त्व देणे हिताचे ठरते. ताजे मांस, कमी मसाले व योग्य प्रमाण ही त्रिसूत्री ठेवावी, असे तज्ज्ञ म्हणतात.
कोणते मांस खावे?
उन्हाळ्यात मांस निवडताना ते कमी चरबीयुक्त असणे योग्य ठरते. लाल मांस (Red Meat) ऐवजी चिकन हे पचायला हलके असते. ते कमी तेलात व मसाले टाळून बनवावे. उन्हाळ्यात सर्वोत्तम पर्याय मासे समजले जातात. यात ओमेगा ३ हे फॅटी ॲसिडस् असतात. जे हृदयासाठी चांगले व पचायला सोपे असतात. अंडी दिवसातून एक किंवा दोन खाणे या दिवसात सुरक्षित समजल्या जातात. पण उष्णतेचा त्रास असल्यास उकळलेल्या अंड्यातील पिवळा बलक काढून फक्त पांढरा भाग खावा. तो प्रथीनयुक्त असतो. मटण, डुकराचे मांस, अधिक चरबीयुक्त मांस टाळावे. कारण ते शरीरातील उष्णता वाढवू शकते.
आहारतज्ज्ञ म्हणतात...
सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेच्या आहारतज्ज्ञ रश्मी बारसागडे म्हणतात की, उन्हाळ्यात मटण टाळलेलेच बरे. त्यात खूप फॅट असतात. मासे अधिक उत्तम. अंड्याचा कमी उष्ण असलेला पांढरा भाग खावा. चिकन हे पण बिन मसाल्याचे तसेच प्रामुख्याने वाफवलेले किंवा उकळलेले खाल्लेलं बरे. अती मांसाहार उन्हाळ्यात तापदायक ठरु शकतो. पोटात दुखणे, संडास, लघवीस त्रास होणे, अपचन, अशा तक्रारी उद्भवतात. या भोजनात द्रवरुप पदार्थ वाढवावेत.
प्रशांत देशमुख
सौजन्य : लोकसत्ता
संकलन : यशवंत वाघ
**************************

0 टिप्पण्या