🔹 इंदिराजी व वाजपेयी

 🔹 इंदिराजी व वाजपेयी

माहिती सेवा ग्रुप /वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : अनिल पाटील /आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/03/2026 :

इंदिराजी व वाजपेयी हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला इतिहासात डोकावून बघावे लागेल.

नोव्हेंबर 1971!

भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा चालू होती. पार्श्वभूमी होती संयुक्त पाकिस्तानात निर्माण झालेल्या तणावाची. चर्चेत निक्सन बाईंना म्हणाले,

" भारताने पाकिस्तान प्रश्नात नाक खुपसले तर, अमेरिका भारताला धडा शिकवेल."

निक्सनच्या डोळ्यात डोळे घालून बाई उत्तरल्या,

" तुम्ही आमचे मित्र आहात. बाॅस नाही. आम्ही आमचे भविष्य लिहायला सक्षम आहोत. परिस्थिती कशी हाताळायची हे आम्हास ठाऊक आहे."

हा संवाद होताच इंदिराजी तडक व्हाईट हाऊसच्या बाहेर पडल्या व आपण भारत- अमेरिका यांची संयुक्त पत्रकार परिषद तातडीने रद्द करत आहोत असे जाहिर करुन आपल्या कारच्या दिशेने निघाल्या. हेन्री किसिंजर धावत धावत त्यांच्यामागे कारपर्यंत पोहोचले व म्हणाले,

" मॅडम प्राइम मिनिस्टर! तुम्ही राष्ट्राध्यक्षांसोबत थोडे सबुरीने घ्यायला हवे होते असे मला वाटते."

बाई उत्तरल्या,

" थँक्यू मि. सेक्रेटरी! तुमच्या या सुचनेबद्दल. आम्ही विकसनशील राष्ट्र असलो तरी आमच्या पाठीचा कणा ताठ आहे. आलेल्या कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यास तयार आहोत. आम्ही हे सिद्ध करु की, हजारो मैल दूर असलेली सत्ता आमच्यावर सक्ती नाही करु शकत."

अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट हेन्री किसिंजर यांनी " White House Years" हे आत्मचरित्र लिहीलेय व त्यात हा प्रसंग वर्णन केलेला आहे. अगदी " डोळ्यात डोळे" हा शब्दप्रयोग देखील त्यांचाच आहे.

इंदिराजी तडक भारतात आल्या. एअर इंडियाचे बोईंग पालम विमानतळावर पोहोचताच त्यांनी आपले राजकीय विरोधक असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांना आपल्या निवासस्थानी पाचारण केले व एक तास बंद दाराआड चर्चा केली. ते बाहेर पडताच बीबीसीचे वार्ताहर डोनाल्ड पाॅल यांनी त्यांना खोचक प्रश्न विचारला,

" इंदिरेचे तुम्ही सर्वात मोठे टीकाकार आहात. तरीही..."

पाॅज घेत वाजपेयी उत्तरले,

" गुलाब बगिच्याची शोभा वाढवतो. लिलीचे फूलदेखील बगिच्याची शोभा वाढवते. दोघेही आपापल्या जागी सुंदर असतात. पण बगिचा ज्यावेळी संकटात येतो, त्यावेळी बगिच्याला आपले सौंदर्य टिकवण्यासाठी दोघांनाही एकत्र जपावे लागते. हे भारतीय लोकशाहीचे सौंदर्य आहे."

3 डिसेंबरला भारत- पाक युद्धाला तोंड फुटले. 10 डिसेंबरला अमेरिकेने भारताला इशारा व धमकी दिली आणि आपल्या सातव्या आरमारास हिंदी महासागरातून कूच करण्याचे आदेश दिले व ते बंगालच्या उपसागराकडे रवाना झाले. 14 डिसेंबरला अमेरिकन आरमाराने बंगालच्या सागरात प्रवेश केला.

भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर स्टेटमेंट दिले,

" मी अमेरिकेच्या सातव्या आरमाराला भीक घालत नाही."

... व युद्ध चालूच ठेवले. 16 डिसेंबरला पाकिस्तानने भारतापुढे शरणागती पत्करली!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या