“केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, युवक आणि ग्रामीण भारताच्या अपेक्षांना पूर्णतः न्याय दिला गेलेला नाही" - खा. धैर्यशील मोहिते पाटील.
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/02/2026 :
“केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये शेतकरी, युवक आणि ग्रामीण भारताच्या अपेक्षांना पूर्णतः न्याय दिला गेलेला नाही. महागाई, बेरोजगारी आणि शेतीतील वाढता खर्च या ज्वलंत प्रश्नांवर ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात दिसून येत नाहीत. असे मत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) ला कायदेशीर हमी देण्याबाबत पुन्हा एकदा टाळाटाळ करण्यात आली आहे.
सिंचनासाठी राज्यनिहाय, विशेषतः महाराष्ट्रासाठी, स्वतंत्र व ठोस निधीची घोषणा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खत, बियाणे, वीज व इंधनाच्या वाढत्या खर्चाच्या तुलनेत थेट आर्थिक मदत अपुरी आहे. युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणाऱ्या ठोस योजना अर्थसंकल्पात दिसत नाहीत. कौशल्य विकासाच्या नावाखाली प्रशिक्षण दिले जात आहे, मात्र त्या प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी नाही. शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या तरुणांच्या हाताला काम देण्याचे ठोस धोरण सरकारकडे नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
हा अर्थसंकल्प मोठ्या उद्योगपतींसाठी बनवलेला आहे.शेतकरी, कष्टकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर अर्थसंकल्प अपुरा ठरलेला आहे असेही खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेवटी म्हटले.

0 टिप्पण्या