गझल मुशायऱ्यातून विद्रोहाचा आवाज बुलंद !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 26/12/2025 :
"जात धर्म स्वार्थ नाही प्रेम आहे
तर मनाचे युद्ध हे का टळत नाही"
सप्तरंगी साहित्य मंडळ,महाराष्ट्र शाखा नांदेड तर्फे २१/१२/२०२५ रोजी हॉटेल विसावा पॅलेस,नांदेड येथे महाराष्ट्रातील नामवंत गझलकारांचा गझल मुशायरा रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
विसरताना जसा नकळत कुणी कोणास आठवतो
तसा आभाळ आल्यावर तुझा सहवास आठवतो!
बेभरवशाचे जरी आयुष्य हे
त्याचसाठी रोजची मरमर किती?
मीच माझ्या आत राईएवढी
त्यातही आहे तुझा वावर किती!
अशा अलवार शेरांनी गझलकारा स्वाती भद्रे-आकुसकर यांनी मुशायऱ्याची दमदार सुरुवात केली.
मला उचलून घेण्याला पुढे सरसावली आहे
भिमाच्या संविधानाची मिळाली सावली आहे!
कुणी ए आय चा डंका घरोघर वाजवत आहे
कुणाची अंधभक्ती भारताला नासवत आहे!
मिळत नाही इथे क्षुल्लक मदतही कास्तकाराला
तिथे मस्तीत बाईला पुढारी नाचवत आहे!
व्यवस्थेवर आसूड ओढणाऱ्या गझलकार विजय वाठोरे यांच्या शेरांनी रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.
"फाटकी दुःखे मनाला शिवत नाही
समजुनी घे भेद धागा जुळत नाही
धर्म बदलावा सुखाने की मरावे
तर मना पर्याय पहिला पटत नाही
जात धर्म स्वार्थ नाही प्रेम आहे
तर मनाचे युद्ध हे का टळत नाही"
आणि जिथे असतो नफा तोटा तिथे नसते खरी मैत्री
कसे सांगू हिशोबाला कुठे पुरते खरी मैत्री?
अशा सुंदर व आशयघन शेरांनी गझलकारा अंजली कानिंदे-मुनेश्वर यांनी रसिकांची उस्फुर्त दाद मिळवून खिळवून ठेवले.
वादळांशी झुंजणारे शब्द शस्त्रांचे पुजारी
तारणारी भारताला ती निळी शाईच होती!
झुकलो जगाप्रमाणे तेंव्हा महान झालो
मानेस ताठ करता मी बेइमान झालो
कोसायचो स्वतःला समजायचो भिकारी
बस लेक जन्मल्यावर मी भाग्यवान झालो!
गझलकार विजय धोबे यांच्या अशा अप्रतिम शेरांना रसिकांची भरभरुन दाद मिळाली.
सावळी साधी जरी आहेस तू
पोरगी आहेस..सांभाळून जा!
किती राहिले बोलायाचे..आज अवांतर बोलू
नकोच तिसरा..विषय कुणाचा परस्परांवर बोलू!
ऐकायाला आतुर होते अवतीभवती सगळे
मला कळेना काय नेमके आज स्वतःवर बोलू?
गझलकारा दीपाली कुलकर्णी यांच्या अशा तरल व सहजसुंदर शेरांनी रसिकांची मने जिंकली.
छायेत फार थोडी कायम उन्हात गेली
ही जिंदगी व्यथांच्या सोबत सुखात गेली
माणूस फक्त आपण म्हणतात सर्वजण पण
डोक्यातुनी कुणाच्या नाहीच जात गेली
केंव्हा मनाप्रमाणे शमलीच भूक नाही
शोधात भाकरीच्या माझी हयात गेली
अशा दमदार शेरांनी गझलकार कपिल सावळेश्वरकर यांनी रसिकांची दाद मिळवली.
विसरून दुःख सारे आनंद वाटणारा
साधासुधा कवी मी गावात राहणारा
सुखाचे आणि दुःखाचे उशाशी बोचके आहे
जवळ सामान हे माझ्या तसेही मोजके आहे
खड्डा मनात मोठा खोदून पाहतो
दुःखात त्यात आता लोटून पाहतो
मरतात का खरोखर विरहात माणसे?
नाते तुझे नि माझे तोडून पाहतो
अशा दमदार शेरांनी गझलकार सय्यद चाँद तरोडकर यांनी मुशायऱ्यात रंगत आणली व भरभरुन दाद मिळवली.
शाखेत कोणत्या मी निर्माण होत नाही
माझी कुठेच नाही रिप्लेसमेंट भाऊ!
फुले शाहू आंबेडकर बुद्ध नानक
तुला काय समजायचे ते समज...
कधी मी सुधारक कधी मूकनायक
तुला काय समजायचे ते समज!
सांग ना कोणते वेगळे चेहरे?
त्याच त्या मैफिली तेच ते चेहरे! अशा सुंदर शेरांनी सूत्रसंचालक,गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांनी रसिकांची दाद मिळवली.
युद्धास टाळणाऱ्या देशात बुद्ध आहे
शांतीत नांदणाऱ्या विश्वात बुद्ध आहे!
जातीत रोज तंटे पंथात वाद न्यारे
माणूस जोडणाऱ्या धम्मात बुद्ध आहे!
गझलकार शंकर माने यांच्या अशा सुंदर,वैचारिक शेरांना रसिकांची दाद मिळाली.सुनिता डरंगे यांनीही गझल सादरीकरण करून सहभाग नोंदवला.
सहजासहजी माणूस हल्ली भेटत नाही
गल्लोगल्ली सहज भेटतो आहे चमचा!
ताठ कण्याचे आपण सगळे मागे पडलो
किती गतीने पुढे सरकतो आहे चमचा!
एखादे अक्षर गिरवावे तशी गिरवली जाते
जन्मापासून आपापली जात शिकवली जाते!
अटीतटी अन भानगडीत वाया गेली
अपुली चळवळ चढाओढीत वाया गेली!
अशा एकाहून एक सरस सिग्नेचर शेर व गझलांच्या बहारदार गझल मुशायराचे अध्यक्ष पालम येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांनी रसिकांना भारावून टाकले आणि मुशायऱ्याचा शानदार समारोप केला.सप्तरंगी साहित्य मंडळ सातत्यपूर्ण गझल मुशायरे गझल प्रचार प्रसारासाठी मोलाची कामगिरी बजावत आहे.
1 टिप्पण्या
मनःपूर्वक धन्यवाद सर..आपण दखल घेतली 🙏💐
उत्तर द्याहटवा