हे का घडतंय ?


हे का घडतंय ?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 20/12/2025 :

एखाद्या नेत्याचं निधन झालं की त्याच्या बायकोला, मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला, पुतण्याला संधी देण्याचं भिकार धोरण सगळ्याचं राजकीय पक्षांनी बंद करायला हवं. असल्या भिकार धोरणाने विचारहीन, कर्तृत्वहीन आणि तत्वहीन लोक सत्तेच्या परिघात जमा होऊन चळवळीत, पक्ष संघटनेत आणि स्थानिक पातळीवर काम केलेले अनेक तयार झालेले कार्यकर्ते दूर राहतात एव्हाना ठेवले जातात. त्यामुळे नेता गेला की ही दर्जाहीन आणि कर्तृत्वहीन पिलावळ जमा करण्याचं धोरण कायमच बंद व्हायला हवं.

एखादा नेता दीर्घकाळ एखाद्या विचारांसाठी, पक्षासाठी काम करतो तेव्हा त्याला मानणारा एक वर्ग तयार होतो. त्यामध्ये त्याच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघासह त्या त्या प्रदेशातील अनेकजण असतात. त्यांचं एक भावनिक नातं तयार होत. याच नात्याने ते त्या नेत्याच्या माध्यमातून विचारांसोबत आणि पक्षासोबत काम करतात. मात्र, तो नेता कधीतरी वृद्धापकाळाने, अकाली तर कधी अपघाताने जातो. इतक्या काळ काम केल्यानंतर त्या नेत्याच्या जाण्याने पक्षासह त्याच्या कार्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण होते. सर्वकाही भावनिक वातावरण असत. अशा काळात लगेच त्या नेत्याच्या कुटुंबातील मुलगा मुलगी बायको पुतण्या किंवा भाऊ यांना पुढं केलं जात. त्याला नखाइतकाही कामाचा अनुभव नसला तरी एका मिनिटात तो गेली अनेक काळ घरच्या भाकरी खाऊन पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्यांच्या मानगुटीवर बसवला जातो हे सगळ्यात भिकार आणि दर्जाहीन राजकारण आहे. आणि ते गेली अनेक काळ होत आलंय हे अत्यंत वाईट आहे.

यामध्ये फक्त राजकीय पक्ष आणि नेतेच जबाबदार आहेत असं मुळीच नाही. याला कार्यकर्त्यांमधील आणि काही मतदारांमधील गुलाम मानसिकता कारणीभूत आहे. कारण कार्यकर्ते आणि जनता म्हणून ज्या एकोप्याने या घटनांना विरोध व्हायला हवा तो होत नाही. अनेकांनी स्वाभिमान गहाण ठेवल्याने  कार्यकर्ते आणि अनेक मतदार पूर्णतः गुलाम मानसिकतेत वागतात आणि जगतात. आणि त्यांच्या या मानसिकतेवरच अनेक राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढ्या कुठलाच रस्त्यावरचा संघर्ष न करता आणि शेतकरी कष्टकरी कामगार यांचे प्रश्नावर न बोलता आमदार, खासदार आणि मंत्री होतात. या गुलाम कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी या निष्क्रिय पिढ्या मोठ्या केल्या. कार्यकर्त्याच्या बायकोची मळकटलेली साडी, पोराला दोन हप्त्यापासून शाळेत जायला दप्तर नाही. पोरगी नवा ड्रेस मगतीये तो नाही, दावणीला दोन खाट्या गाया. बापाचं धोतर फाटलंय हे सगळं चित्र डोळ्याआड करून हा गुलाम कार्यकर्ता या नेत्याच्या हाकेला जी जी करतोय आणि तेच वागणं तुम्हाला अनेक संधीपासून दूर ठेवतय. आता  हे कुठंतरी राजकीय पक्षांनी लक्षात घ्यायला हवं किंवा कार्यकर्त्यांनी आपला स्वाभिमान जागून ते पक्ष नेतृत्वाला करायला भाग पाडाव.

उदाहरण द्यायचं झालं तर संघर्ष करून भाजप वाढवला अनेक वाड्या वस्त्यांवर नेला त्या गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन झालं. त्यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आणि आपुलकी होती हे नाकारता येणार नाही. पण त्यांची मुलगी प्रीतम मुंडे यांनी कुठला रस्त्यावरचा संघर्ष केला ? त्यांचं भाजप पक्षवाढीत काय योगदान ? त्यांना कोणत्या राजकीय कामाचा अनुभव होता ? फक्त गोपीनाथ मुंडेंची मुलगी म्हणून असंख्य गोपीनाथ मुंडेंनी उभा केलेले कार्यकर्ते आणि मतदार यांचा कसलाच विचार न करता एका क्षणात प्रीतम मुंडेंना उमेदवारी दिली. इतक्या मोठ्या नेत्याचा आणि पक्षाचा एकही कार्यकर्ता पक्ष नेतृत्वाला सापडला नाही का ??

हीच गोष्ट चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याबाबत. बाळू धानोरकर काँग्रेसचे ताकतीचे कार्यकर्ते होते. पण ते गेले की प्रतिभा धानोरकर यांना पक्षाने तिकीट दिल. का तिथं दुसरा व्यक्ती पक्षाला सापडला नाही ? गेली अनेक काळापासून पक्षासाठी काम करणारा एकतरी निष्ठावान मिळालाच असता. पण ते झालं नाही.

हीच गोष्ट शिवसेना ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर यांच्याबाबत. त्यांची हत्या झाली. त्यानंतर त्यांचे वडील राजकारणात सक्रिय असताना पक्षाने त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना संधी दिली. काय पाहिलं त्यांना संधी देताना ? त्यांचं शिवसेना वाढीसाठी काय योगदान ? फक्त अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत म्हणून लगेच संधी ? त्यांच्यापेक्ष निष्ठावान कितीतरी दिवसांपासून पक्षवाढीसाठी काम करतात त्यांचं कुठं नाव तरी आहे का ?

आज प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेही विधानपरीक्षेचा राजीनामा देऊन. पक्षाने काय म्हणून त्यांना संधी दिली होती ? त्यांनी काँग्रेस पक्ष किती वाढवला ? किती जागा निवडून आणल्या ? शेतकरी, विध्यार्थी कामगार यांच्यासाठी किती आंदोलन मोर्चे काढले ? फक्त राजीव सातव यांच्या पत्नी म्हणून लगेच संधी.

पक्षासाठी आंदोलन, मोर्चे काढणारे, लाठ्याकाठ्या खाणाऱ्या कार्यकर्तांना का नाही मिळत इतक्या लवकर विधान परिषदेवर संधी ? हे सगळं एकदा पक्ष नेतृत्वाने लक्षात घ्यावं किंवा हाडाच्या लढाऊ कार्यकर्त्यांनी आणून द्यावं. अन्यथा, पक्ष अशाच लोकांना तुमच्या मानगुटीवर बसवणार आणि ज्यांना बसवलय ते तुम्हाला गुलाम आणि गृहीत धरून केव्हाही कुणीकडंही जाणार.

*टीप - यातील चार कुटुंब फक्त उदाहरणासाठी वापरलेत. असे महाराष्ट्रात आणि देशभरात असंख्य आहेत.

📵 9326365396 📵

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या