आता_पुढं_काय? — पराभवाचं खापर कोणावर?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 22/12/2025 :
लोकशाहीत निवडणूक हा केवळ सत्तांतराचा खेळ नसतो, तो राजकीय पक्षांच्या आत्मपरीक्षणाचा आरसा असतो. मात्र दुर्दैवाने, आजच्या निकालानंतरही विरोधकांच्या चेहऱ्यावर आत्मपरीक्षणाऐवजी नेहमीचीच कारणांची यादी झळकतेय — पैसा, सत्ता, यंत्रणा, निवडणूक आयोग!
हे सगळं खरं असू शकतं, पण ते अर्धसत्य आहे. कारण सत्ताधाऱ्यांच्या विजयाचा एक चौथा शिल्पकार आहे, आणि तो म्हणजे — विरोधक स्वतः.
गेल्या काही वर्षांत एक गोष्ट वारंवार सिद्ध झाली आहे :
पैसा, सत्ता आणि यंत्रणा जिंकवतातच, पण विरोधकांमधील
अहंकार, बेबनाव, अविश्वास आणि परस्पर कुरघोडी
ही सत्ता टिकवण्याची खात्रीशीर हमी ठरते.
यावेळेसही तेच घडलं.
आजचा निकाल हा भाजपचा पराक्रम नाही, तर विरोधकांचा सामूहिक अपयशाचा दाखला आहे.
आणि तरीही जर आजही आत्मपरीक्षण झालं नाही, तर
“पुढची पन्नास वर्षे देशावर भाजपचीच सत्ता राहील”
ही सत्ताधाऱ्यांची दर्पोक्ती भविष्यात खरी ठरली, तर आश्चर्य वाटायला नको.
शत्रू बलाढ्य आहे, पण विरोधक विखुरलेले
समोरचा शत्रू सर्वशक्तीमान आहे.
तो नियम बदलतो, संस्था वाकवतो, पैशांचा पाऊस पाडतो, सत्तेचा वापर नव्हे तर गैरवापर करतो.
हे गृहीत धरूनच राजकारण करावं लागेल.
पण विरोधक काय करतात?
ते अजूनही “हे होऊ नये”, “ते बरोबर नाही”, “लोकशाही धोक्यात आहे”
याच वाक्यांवर अडकून बसले आहेत.
बाबांनो,
हे होणारच आहे, हे मान्य करूनच पुढची चाल आखावी लागेल.
फक्त बोंबा मारून सत्ता हादरत नाही.
आऊटगोईंगचा वेग वाढतोय
आज विरोधी पक्षांतून सुरू असलेलं आऊटगोईंग ही धोक्याची घंटा आहे.
नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी एकामागोमाग सत्ताधारी गटात जात आहेत.
हे थांबणार नाही — उलट वाढणारच आहे.
कारण सत्ता नसली की पक्ष विकलांग होतो.
आणि विकलांग पक्ष शेवटी शरपंजरी जातो.
आज महाराष्ट्रात तेच चित्र दिसतंय.
निमशहरी महाराष्ट्रात पानिपत
शरद पवार आणि उद्धव ठाकरे —
दोघेही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले.
दोघांचीही राजकीय उंची प्रचंड.
मग निकाल काय?
२८८ पैकी ७-८ जागा?
निमशहरी महाराष्ट्रात पूर्ण पानिपत!
याचं समर्थन कसं करायचं?
आणि तरीही “आपला दोष नाही” असं जर मानलं जात असेल, तर ही आत्मफसवणूक नाही तर काय?
देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे
महाराष्ट्र पिंजून काढतात.
गावोगाव, तालुक्यातालुक्यात जातात.
आणि विरोधक?
मर्यादित दौरे, बंद दरवाजातील बैठकं आणि सोशल मीडियावरून प्रचार!
‘कार्यकर्त्यांवर सोडतो’ हे समर्थन चालणार नाही
“पूर्वी आम्ही निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडायचो”
हे संजय राऊत यांचं विधान आजच्या काळात हास्यास्पद वाटतं.
शत्रू जीवाचं रान करतोय,
आणि तुम्ही स्वस्थ बसून कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकत असाल,
तर पराभव ठरलेलाच आहे.
साधनसामग्री नसेल, पैसा नसेल — मान्य.
पण मतदारांपर्यंत पोहोचायला पाय लागत नाहीत का?
घरी बसून प्रचार होतो का?
कॉंग्रेसची पूर्वपुण्याई किती काळ?
कॉंग्रेसला मिळालेल्या ३४ जागा
ही आजच्या परिश्रमांची कमाई नाही,
तर परंपरागत व्होट बँकेची पूर्वपुण्याई आहे.
पण ही व्होट बँक कायम राहील असं समजणं हा भ्रम आहे.
फक्त राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर विसंबून चालणार नाही.
स्थानिक नेतृत्वाला मैदानात उतरावंच लागेल.
आपलं अस्तित्व दाखवावंच लागेल.
वास्तवाचं भान आणि काळाची गरज समजून न घेतल्यास
कॉंग्रेसही हळूहळू अप्रासंगिक होईल.
तडजोडीशिवाय सत्ता नाही
राजकारणात सत्ता महत्वाची असते.
आणि सत्ता मिळवण्यासाठी कधी कधी न पटणाऱ्या तडजोडी कराव्या लागतात.
भाजप जर कधी मुस्लीम लीगसोबत जाऊ शकत असेल,
तर “राज ठाकरेसोबत जाणार नाही” ही ताठर भूमिका
विरोधकांच्या पायावर धोंडा पाडणारी ठरू शकते.
विचार टिकले पाहिजेत — याबाबत दुमत नाही.
पण विचार केव्हा टिकतात?
सत्ता हातात असेल तेव्हा.
सत्ता नसेल तर कार्यकर्ते कमी होतात,
आणि विचारांना वाहणारी नदी हळूहळू आटते.
कम्युनिस्ट पक्षांचं उदाहरण समोर आहे.
महापालिका निवडणुकीतही चूक केली तर…
आता महापालिका निवडणुका समोर आहेत.
जर आजच धडा घेतला नाही,
तर तिथंही पराभव ठरलेलाच आहे.
हा प्रश्न केवळ पक्षांच्या अस्तित्वाचा नाही,
तर त्या पक्षांना समर्थन देणाऱ्या सामान्य नागरिकांचाही आहे.
ज्या पक्षाच्या पदरी सातत्याने अपयश पडतं,
त्याला बाहेरून समर्थन करणारेही शेवटी थकतात, निराश होतात.
लोकशाही धोक्यात — जबाबदार कोण?
लोकशाही, संविधान, माध्यम स्वातंत्र्य
यासाठी विरोधक मजबूत असणं अत्यावश्यक आहे.
पण जर चुकीच्या धोरणांमुळे आणि आपसातील लाथाळ्यांमुळे
विरोधकच कमजोर होत असतील,
तर ही स्थिती लोकशाहीसाठी अधिक घातक आहे.
देश आज हुकूमशाहीकडे झुकतोय,
याला सत्ताधारी जितके जबाबदार आहेत,
तितकेच विरोधी पक्षही आहेत.
कारण नुसती बोटं मोडून
जबाबदार विरोधी पक्ष होता येत नाही.
जागता पहारा हवा
आज खरं तर
फक्त राहुल गांधी हे सातत्याने जागता पहारा देताना दिसतात.
त्यांच्या पक्षातील आणि इतर पक्षांतील अनेक नेते मात्र निवांत आहेत.
हा निवांतपणा, ही निष्क्रियता
आजच्या पराभवाचं एक मोठं कारण आहे.
आज नाही तर उद्या,
विरोधकांना आरशात पाहून स्वतःलाच प्रश्न विचारावा लागेल —
#आता_पुढं_काय?
जर उत्तर मिळालं नाही,
तर इतिहास विरोधकांना माफ करणार नाही.
nilesh thakre
8668935154
राष्ट्रीय संघटक
पुराेगामी पत्रकार सघ (भारत)
======================
0 टिप्पण्या