युवकांनाे राजकारणात या — कारण राष्ट्रनिर्मितीला तुमची गरज आहे.

 युवकांनाे राजकारणात या — कारण राष्ट्रनिर्मितीला तुमची गरज आहे. 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 14/12/2025 :

 “युवकांनो.. तुमच्या हातात देशाचे भविष्य – मग राजकारणात पावलं रोखा, सत्ता नाही तर परिवर्तनाचा ध्यास घ्या!”

आज देशातील परिस्थितीकडे पाहिलं तर एक वेदनादायी, कटू आणि चीड आणणारे वास्तव आपल्या समोर उभे ठाकलेले आहे. शिक्षणात सुवर्ण भविष्य शोधणाऱ्या लाखो तरुणांच्या हातात पदवी आहे, पण पोटासाठी नोकरी नाही… स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांच्या हातात यशाची पात्रता आहे, पण नियुक्ती पत्र नाही… आणि ज्यांनी आयुष्यभर शिक्षणात झगडत स्वतःचे आणि पालकांचे कष्टाचे पैसे घालवले, त्यांना समाजात सन्मान, वैभव किंवा स्वप्नातील आयुष्य काहीही नाही.

मग प्रश्न सरळ आणि रोखठोक – “जे शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत ते राजकारणात येणाऱ्यांना एवढा यशाचा महामार्ग का खुला आहे?”

याचं उत्तर जितकं कठोर तितकंच स्पष्ट आहे –

कारण आज राजकारण हे रोजगार नसून सगळ्यात मोठा व्यवसाय बनलाय. आणि तोही असा व्यवसाय ज्यात गुंतवणूक नाही पण नफा शंभर टक्के निश्चित!

राजकारण म्हणजे आता ‘सेवा’ नाही, ‘व्यवस्थापन’ आहे

आता परिस्थिती अशी आहे की,

तुमच्या नजीकच्या परिसरातील एखादा नेता, जो कधीकाळी तुमच्याच परिस्थितीत जगत होता, आज करोडोची संपत्ती बाळगून आहे.

त्यांच्या भूतकाळाची माहिती घ्या –

ना मोठं शिक्षण, ना उच्च पदवी, ना अर्थशास्त्र किंवा कायद्याचं ज्ञान…

पण सत्ता हातात आल्यावर त्यांचं आयुष्य बदललं.

हे कसं शक्य झालं?

कारण राजकारण आता पात्रतेवर नाही, तर “नाते, जवळीक, गट, जमाव आणि मतसंख्या” यावर अवलंबून आहे.

शाळा कॉलेजमध्ये तुम्ही ७०-८०% गुण मिळवल्याशिवाय प्रवेश मिळत नाही, पण राजकारणात ०% शिक्षण असूनही १००% सत्ता मिळू शकते.

ही वस्तुस्थिती कटू आहे पण खरी आहे.

युवक हो! तुमच्यात जोश आहे, विचार आहे, ताकद आहे – ते व्यर्थ घालवू नका.

आज बेरोजगारीमुळे युवक नैराश्य, ताण, नैतिक गळती याकडे ढकलले जात आहेत.

पण याच तरुणांनी जर राजकीय व्यवस्थेत प्रवेश केला,

तर दोन गोष्टी घडू शकतात –

1️⃣ देश बदलू शकतो

2️⃣ किंवा कमीत कमी बदलण्यासाठी प्रयत्न करणारा वर्ग तरी तयार होईल

फक्त टोळ्या, पोस्टर, हाय-हॅलो, सभा-मेळावे यासाठी नव्हे तर

नीती निर्धारणात, निर्णय प्रक्रियेत, शहर नियोजनात, रोजगार धोरणात, शिक्षण व्यवस्थेत तरुण सहभागी झाले पाहिजेत.

राजकारणात येण्यासाठी आता समाजकार्य हा प्रवेशद्वार राहिला नाही – ही खरी शोकांतिका.

पूर्वी लोक म्हणायचे –

“समाजासाठी काम करा, जनता साथ देईल आणि तुम्ही नेतृत्त्वावर पोहोचाल.”

पण आता?

आता लोक सरळ राजकारणात उतरतात, लोकांना बाद करून पुढे जातात आणि नंतर दाखल समाजकार्याचा तमाशा करतात.

मग प्रश्न –

जर अशिक्षित, गुन्हेगार प्रवृत्तीचे, पैसा पांढरा करणारे लोक राजकारणात येऊ शकतात तर शिक्षित तरुण का नाही?

का फक्त स्टेटसवर पोस्ट टाकण्यासाठी सोशल मीडिया अक्टिव्ह?

का फक्त निषेधासाठी मेसेज फॉरवर्ड?

का फक्त चहा टपरीवर चर्चा आणि टीका?

जर आवाज नाही, तर बदल नाही.

जर सहभाग नाही, तर प्रतिनिधित्व नाही.

आणि प्रतिनिधित्व नाही, तर भवितव्यही नाही

राजकारण म्हणजे गोंधळ नव्हे – हे देशचलन आहे.

आज देशातील कायदे बनवणाऱ्यांनी कायदा शिकलेला नाही,

आर्थिक धोरणे ठरवणाऱ्यांना अर्थशास्त्र कळत नाही,

शिक्षण धोरण आखणाऱ्यांची शैक्षणिक पात्रता हास्यास्पद आहे.

मग असा देश कोण चालवतोय?

अशा हातात देश असेल तर बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार वाढणार नाही तर काय कमी होणार?

युवक आकाशाला स्पर्श करणाऱ्या स्वप्नांसह जन्मतो आणि वास्तवात जमिनीत पुरला जातो.

हा अन्याय आहे आणि अन्यायाविरुद्ध बंड करणं हेच राजकारणाचं खरं रूप आहे.

सत्ता मिळवा म्हणून नाही – सत्तेला योग्य दिशा द्यायला राजकारणात या

तुम्ही जर व्यवसाय करायचा ठरवलात तर स्वतःचा व्यवसाय करा.

पण जर देशाचं, समाजाचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्यासाठी

विचार + दृष्टी + प्रामाणिकता + आक्रमकता + नेतृत्व ही पाच शस्त्रे आवश्यक आहेत.

युवक म्हणतात –

“राजकारण भ्रष्ट आहे.”

होय! बरोबर आहे.

पण प्रश्न —

भ्रष्ट कोणी केलं? आपणच शांत राहून.

आपण सहभागी न व्हायचं ठरवलं आणि रिकाम्या जागा गुन्हेगारांनी भरल्या.

म्हणून सांगतो —

फक्त फेसबुकवर देश बदलत नाही,

फक्त इंस्टाग्रामवर क्रांती होत नाही,

सिस्टम बदलायची असेल तर सिस्टममध्ये प्रवेश करावा लागतो.

शेवटचा संदेश – तरुणांनो, विचार करा, निर्णय घ्या आणि पुढे या

जर तुम्हाला स्थिर नोकरी नसेल, व्यवसायाचा आधार नसेल,

पण मेहनत, धडाडी, संघटन कौशल्य, आणि नेतृत्व क्षमता असेल —

तर राजकारण हा पर्याय नाही — हे क्षेत्र आहे, प्लॅटफॉर्म आहे,

आणि देशाला दिशा देण्याची संधी आहे.

शिक्षित तरुणांनी राजकारणात येणं अत्यावश्यक आहे कारण. 

गुन्हेगार नको असतील तर चांगले पुढे आले पाहिजेत

भ्रष्टाचार रोखायचा असेल तर स्वच्छ हातांनी कमान धरली पाहिजे

बेरोजगारी संपवायची असेल तर रोजगार निर्माण करणारा नेता हवा.

आणि भारत प्रगत करायचा असेल तर प्रगत विचारांचा नेतृत्व वर्ग हवा.

युवकांनो!

सत्तेला शस्त्र बनवू नका,

तिला साधन बनवा.

राजकारणावर ताबा मिळवा,

भारतातील भविष्य तुमच्या हातात आहे.

ही वेळ बोलण्याची नाही,

ही वेळ उठण्याची आहे…

आणि ज्यांनी स्वप्न पाहिलंय –

तेच उद्या देश चालवतील!

युवकांनाे राजकारणात या — कारण राष्ट्रनिर्मितीला तुमची गरज आहे.

✍️...निलेश ठाकरे

             8668935154 

              राष्ट्रीय संघटक

पुराेगामी पत्रकार संघ (भारत)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या