वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 03/12/2025 :
कुणासाठी मन गहिवरणे...वा आपल्यासाठी कुणाचे डोळे पानावणे याला कुठलेही मोल आजपर्यंततरी आले नाही....आणि आजच्या यंत्रयुगात तरी ती शक्यताच दुरापास्त आहे..प्रत्येक जीव स्वत:च्या सेवा करण्यात इतका गुंग झाला आहे कि त्याला त्याच्या आयुष्यात कुणी भागीदार..वाटेकरी नको असतो..कुणी आपुलकीनं कुणाच्या आयुष्यात डोकावून अगदी साधं रामराम जरी म्हटलं ..तरी ते त्या माणसाला त्याच्या आयुष्यात त्या माणसाची फाजील लुडबुड वाटू लागते..पूर्वीचा भावनांचा गहिवर, आपलेपणा आता इतिहासजमा होत आहे ..दाटून येणे हे आताशा शब्दकोशाला लागलेला कुठला तरी विषाणू वाटू लागतो..कुणाला तरी माझी तुला शपथ आहे असं म्हणून त्याच्याशी असणारं आपलं नातं किती दृढ आहे हे आजमावून पाहण्याचे आणि त्यापोटी कृतार्थ होण्याचे दिवस संपत चालले आहेत.काळजाला चटका लावून जाणारे प्रसंग आता आयुष्यात सापडत नाहीत..कारण एकतर माणसाचे काळीज संवेदना हरवून गेलेले आहे..आणि दुसरे म्हणजे गुंतणे हा भावनेचा अविष्कार आताच्या चंगळवादी युगात लुप्त होत आहे.भावनांचा, माणुसकीचा विसर पडत जाणे समाजव्यवस्थेला लागलेली कीड आहे आणि त्यावर वेळीच उपाय होणं काळाची गरज आहे....!

0 टिप्पण्या