बुडाला बुडाला रुपया बुडाला!

 संपादकीय..........✍️

बुडाला बुडाला रुपया बुडाला!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 05/12/2025 :

> माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर

कोणी कितीही सामर्थ्यशाली असो; बाजारपेठ सर्वांस 'सरळ' करते. रुपयाबाबत ते झाले; तेही आर्थिक वाढीचा वेग ८.२ इतका जाहीर झाल्यावर आठवडाभरात…

एकेकाळी रुपयाचा संबंध राष्ट्रतेजाशी जोडला गेला, घसरता रुपया आणि राष्ट्रप्रमुखाचे शरीरस्वास्थ्य यांचे नाते लावण्याचा अगोचरपणा झाला; बाबा रामदेवादी अर्थयोगाचार्यांनी ढासळत्या रुपयाचे देशाच्या आरोग्याशी असलेले नाते उलगडून दाखवले; बॉलीवूडमधील शूर, राष्ट्रप्रेमी तारे-तारकांनी रुपयाच्या घसरण्याच्या गुणाचा दाखला देत आपले चलन हे अंतर्वस्त्र नाही याबद्दल आभार मानले इत्यादी अनेक मूर्खपणांचे स्मरण आता करणे अजिबात योग्य नाही.

कारण आताची रुपयाची घसरण ही अत्यंत गंभीर असून ती देशाच्या आर्थिक आरोग्याशी निगडित आहे. रुपया गेले काही महिने सातत्याने घसरतो आहे. सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने ही घसरण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश येत नाही असे दिसल्यावर रिझर्व्ह बँकेनेही हात टेकले आणि रुपयास मुक्तपणाने गडगडू दिले. अखेर रुपयाने नव्वदीचा टप्पा एकदाचा पार केला. खरे तर डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांची रेषा ओलांडल्यानंतर दररोज रुपयाबाबत 'नवा नीचांक' अशा बातम्या येत होत्याच. पण भारतीय राजकारणाप्रमाणे या काळात रुपयाच्या अब्रूची धूप थांबवणे कोणाला काही शक्य झाले नाही. त्यामुळे अखेर रुपयाचे मूल्य आणि देशाची इभ्रत यांचा संबंध जोडणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून रुपयाने आपली पातळी दाखवून दिलीच. इतिहासाचे अचूक भाकीत वर्तवणाऱ्या काही अर्थतज्ज्ञांच्या मते रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ९१-९२ च्या पातळीवर स्थिर होईल तर काहींच्या मते लवकरच त्याची शंभरी भरेल. तूर्त आशिया खंडातील सर्वात अवमूल्यित चलन या उपाधीस रुपया पात्र ठरल्याने या परिस्थितीवर भाष्य गरजेचे ठरते.

खरे तर आपल्या अर्थविकासाचा वेग सरत्या तिमाहीत ८.२ टक्के इतका वधारल्याचे वृत्त नुकतेच सर्वत्र साजरे केले गेले. त्याच्या आधी एक दिवस आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारत सरकारतर्फे प्रसृत केल्या जाणाऱ्या सांख्यिकी तपशिलाच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याकडे दुर्लक्ष करून अर्थविकासाच्या विक्रमी वेगाबाबत आनंद व्यक्त केला गेला. खरे तर या विक्रमी वेगाच्या वृत्ताने बाजारास भरते येणे अपेक्षित होते आणि सेन्सेक्सने गगनभरारी घेणे नैसर्गिक होते. तसे काही झाले नाही. इतक्या सकस अर्थवृत्तानंतरही बाजार मलूल होता. तेव्हाच खरे तर अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. रुपयाने गटांगळी घेऊन ती शंका खरी ठरवली. यात आश्चर्य अजिबात नाही. मूल्यवान निर्यात वाढवण्यात सातत्याने येत असलेले अपयश, त्याच वेळी सोन्यापासून अनेक घटकांच्या आयातीत झालेली कमालीची वाढ, ''आता झाला'', ''आता झाला'' असे सारखे सांगितले जात असले तरी अमेरिकेशी अद्यापही होऊ न शकलेला व्यापार करार आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारा भारत-त्याग ही चार प्रमुख कारणे रुपयाच्या लाजिरवाण्या अवमूल्यनामागे आहेत. ती आधीही होती. आणि आता तर अधिक आहेत. फरक इतकाच की या कारणांचे अस्तित्व घसरत्या रुपयाने सर्वांस मान्य करावयास लावले. मधल्या काळात रिझर्व्ह बँकेने यंदाच्या वर्षात रुपयाचे घसरणे थांबवण्यासाठी आपल्या तिजोरीतील तब्बल ३८०० कोटी डॉलर्स पणाला लावले. काही काळ ही घसरण थांबलीही. त्यामुळे सर्व आलबेल असल्याचे चित्र निर्माण झाले. ते क्षणजीवी ठरले. याचे कारण कोणी कितीही सामर्थ्यशाली असो. बाजारपेठेस प्रदीर्घ काळ 'मॅनेज' करणे कोणालाही शक्य होत नाही. भले ती व्यक्ती मग अमेरिकेची अध्यक्ष का असेना! बाजारपेठ सर्वांस 'सरळ' करते. रुपयाबाबत ते झाले असे म्हणता येईल.

या सगळ्याच्या मुळाशी आहे आपली अशक्त निर्यात. एखाद्या उत्पादनाचे मूल्यवर्धन करून जगात विकले जाईल असे एकही उत्पादन आपण तयार करत नाही. 'ॲपल' फोन मोठ्या प्रमाणावर येथून निर्यात होतात, हे खरे. पण येथे केवळ त्याची जुळणी होते. म्हणजे ते काही भारतीय उत्पादन नाही. 

आपले हे निर्यात-वास्तव दिवसेंदिवस खपाटीस जात असताना आयात घटकांच्या आपल्या मागणीचा बहर मात्र दिवसागणिक वाढता आहे. खनिज तेल, सोने हे तर आपले बारमाही आयात घटक होतेच. पण त्याच्या जोडीने उच्च अभियांत्रिकी उत्पादने, खनिजे, खते, रसायने आदी घटकांची आपली आयात यादी सतत वाढतीच आहे. दिवाळीच्या काळात आपण आयात केलेल्या सोन्याचा तपशील पाहिला तरी भोवळ यावी. हे वाचून काही शहाणे लगेच नागरिकांस बोल लावतील. पण त्यांचा दोष नाही. जेव्हा भोवतालच्या अर्थवास्तवावरून नागरिकांचा विश्वास उडतो; त्यावेळी गुंतवणुकीसाठी सोने हाच आधार वाटू लागतो. हे वास्तव आपल्याकडे पुन्हा अनुभवास आले. तेव्हा परकीय चलनावरील ताण वाढणार हे उघड आहे. तितकाच गंभीर मुद्दा आहे तो अमेरिकेशी अद्यापही न झालेल्या व्यापार कराराचा. त्याचे भिजत घोंगडे आता वाळेल, मग वाळेल अशा नुसत्या वदंताच कानावर येतात. मध्यंतरी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्तक्षेपानंतर तर हा करार जणू झालाच, असे वातावरण निर्माण केले गेले. पण पुढे काहीही झाले नाही. हा करार सुरुवातीस जितक्या अंतरावर होता तितक्याच अंतरावर अद्यापही तो आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा संयम सुटू लागला असून रुपयाच्या तरंगत्या अवस्थेपेक्षा भरवशाच्या डॉलरची संगत अधिक फलदायी असे त्यांस वाटू लागले आहे. परिणामी भारतीय भांडवली बाजारपेठेतून अनेक परदेशी वित्तसंस्थांनी आपापली गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावला असून त्यामुळे निर्देशांकही अस्थिरता अनुभवत आहे. वास्तविक जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती असेल तर ती आपलीच असे आपणास कानीकपाळी ओरडून सांगितले जात असले तरी बाजारपेठ काही त्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाही, असे दिसते. परिणामी आर्थिक शहाणपण, साक्षरता असलेले गुंतवणूकदार भारतापासून दूर जात असताना सरकारी दाव्यांवर विश्वास ठेवून भारतीय गुंतवणूकदार मात्र अधिकाधिक पैसा बाजारात लावत असल्याचे चित्र दिसते. या संदर्भात उदय कोटक यांची टिप्पणी सूचक. ''भारतीय आणि परदेशी गुंतवणूकदारांपैकी अधिक कोण शहाणा? यातील पहिली फेरी परदेशी गुंतवणूकदारांकडे गेल्याचे दिसते'', त्यांनी नीचांकी नव्वदीनंतर दिलेली अशा अर्थाची प्रतिक्रिया चांगलीच चर्चेचा विषय झालेली आहे. कोटक हे काही सरकारचे टीकाकार नव्हेत. तरीही त्यांना हे धाडस करावे असे वाटले यातच वास्तव काय ते दिसून येते. याचबरोबर कारखानदारीतही परदेशी गुंतवणूक यायला हवी तितकी आलेली नाही. त्याचाही परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर कितीही नाही म्हटले तरी झालाच हे मान्य करण्याखेरीज पर्याय नाही.

'आत्मनिर्भरता' वगैरे ठीक. पण ती एका दिवसात होणारी नाही. त्यासाठी उद्याोगस्नेही धोरणे, प्रामाणिक-पारदर्शी कररचना आणि संवेदनशील प्रशासन यांची गरज असते. ती असली तर कोणत्याही प्रलोभनाविना उद्याोग आकृष्ट होतात. नियंत्रित वास्तवास कंटाळून अनेक उद्याोगांनी चीनमधून स्थलांतराचा निर्णय घेतला तेव्हा त्यांस व्हिएतनाम, मलेशिया आदी देशांनी मोठ्या प्रमाणावर आकृष्ट केले ते यामुळे. तेव्हा खोटा अभिनिवेश, स्वानंदात रमणे आणि आपले कसे उत्तम(च) सुरू आहे असे मानण्याची प्रतारणा सोडून अधिकाधिक निर्याताभिमुख उद्याोगांस खरे प्रोत्साहन द्यायला हवे. नपेक्षा रुपयाचे मूल्य दोन अंकावरून तीन अंकात जायला वेळ लागणार नाही. बालसंस्कारासाठी म्हटल्या जाणाऱ्या परवचातील संत एकनाथांच्या भावार्थ रामायणात 'उडाला उडाला कपि तो उडाला' अशी ओळ आहे. रुपया वधारला नाही तर उद्याच्या बालकांवर 'बुडाला बुडाला रुपया बुडाला' असे म्हणण्याची वेळ येऊ नये. साभार लोकसत्ता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या