“ज्योतिषाचा डाव – कुंडलीच्या जाळ्यात अडकलेला शिक्षित समाज.”
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 13/12/2025 :
समाजातील अनेक गर्भगळीत प्रथांमध्ये ‘कुंडली’ ही सर्वात खोलवर घुसलेली, सर्वात विनाशकारी आणि सर्वात कपटपूर्ण परंपरा मानली जाते. वरकरणी ती ‘ज्योतिषशास्त्र’, ‘गुण-मेलन’, ‘शुभाशुभ’ अशा नावांनी सजवली जाते; परंतु तिचा गाभा केवळ एकच भीती आणि अंधश्रद्धेच्या जोरावर लोकांना कायम गुलाम बनवून ठेवते.
कुंडली ही आजही हजारो कुटुंबांच्या सुखाचा गळा दाबणारी एक संस्कृतिक बेडी ठरते आहे. तथाकथित ‘ज्योतिषाचार्यांच्या’ दुकानांना मात्र दिवसा-रात्री ग्राहकांची रांग वाढतच आहे. हा व्यापार धर्माच्या पडद्यामागे इतक्या चतुराईने लपला आहे की सामान्य माणूस त्याला ‘परंपरा’ मानतो आणि त्याच परंपरेत स्वतःचे आयुष्य बरबाद करतो.
ज्योतिषाने स्वतः काढलेली पत्रिका काही वर्षांनी त्याच्याकडे परत घेऊन गेलो तरी त्या व्यक्ती जीवंत आहे की मयत आहे हे सुद्धा तो ओळखू शकत नाही. मयत तरुण आणि मयत तरुणी यांची पत्रिका लग्न जुळवण्यासाठी त्याच्याकडे नेली, तरीही तो शुभ मुहूर्त काढूनच देतो. एवढं मोठं थोतांड म्हणजे ही कुंडली.
श्रीमत व गरीब घरात एकाच वेळी जन्म घेतलेल्या मुलाचे भविष्य वेगवेगळे असते. गरीब घरातील मुलगा जगण्यासाठी संघर्ष करत असतो. तर श्रीमत मुलगा आरामदायी जीवन जगत असत.
आजच्या वैज्ञानिक युगातील सर्वात मोठा पराभव म्हणजे शिक्षित समाजही कुंडलीच्या नावाखाली जन्मवेळ, तास, मिनिट, नक्षत्र या हास्यास्पद गोष्टींवर आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयांचा ताळमेळ बसवतो.
जन्माच्या वेळी आकाशातील ग्रह तुमचे भविष्य ठरवणार, तुमचे नातेसंबंध मोडणार, तुमचे आरोग्य घालवणार हे सर्व विधानं आजही प्रश्न न विचारताच खरे धरली जातात.
समाजशास्त्र आणि मानसशास्त्र सांगते की मनुष्याचे वर्तन, गुण, आवडी, नैतिकता आणि नातेसंबंध ग्रह नव्हे; तर कुटुंब, संस्कार, शिक्षण, समाज, वातावरण आणि स्वतःचे निर्णय ठरवतात.मात्र ज्योतिषशास्त्राचा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी हा सत्य आवाज नेहमीच दाबला जातो आहे.
कुंडलीचा वापर शतकानुशतके विवाह, संपत्ती, नातेसंबंध यांचे मार्ग रोखण्यासाठी केला गेला. काही ‘ग्रहदोष’, ‘मंगळ दोष’, ‘नाडीदोष’ या काल्पनिक भयांनी अनेकांना सामाजिक पातळीवर कमी लेखले गेले.ही प्रथा केवळ अवैज्ञानिक नाही तर निरक्षरता आणि भीतीवर उभा राहिलेला व्यवस्थात्मक अत्याचार आहे.
कुंडलीचे भय जितके खोलवर पेरले जाते, तितका ज्योतिषांचा धंदा तेजीत चालतो.जन्मपत्रिका बनवणे, दोष शांती, ग्रहबळी पूजाअर्चा, रत्न, जप-तप, यज्ञ या सर्वांचा मिळून एक विराट उद्योग उभा आहे.हा उद्योग लोकांच्या भविष्याची नाही, तर अंधश्रद्धेची कमाई सुरक्षित ठेवतो.
विज्ञान प्रगत होत असताना, समाज कुठेतरी उलट दिशेने धावत आहे. कुंडलीचा आधार घेऊन होणारी विवाहनिर्णय, करिअर-निवडी, सामाजिक बहिष्कार हे सर्व आजच्या शिक्षित समाजाच्या माथ्यावरचा काळा डाग आहे.ही केवळ एक जुनी प्रथा नाही; तर समाजाच्या तर्कशक्तीवर केलेला दाबलेला हल्ला आहे.
आज काळाची मागणी एकच समाजाने कुंडलीचा मुखवटा फाडून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे.मैत्री, प्रेम, विवाह, भविष्य या सर्वांची किल्ली ग्रहांच्या नव्हे, तर आपण घेतलेल्या निर्णयांच्या हातात आहे.
(फुले,शाहू,आंबेडकर)
⚛️ 93263 65396 ⚛️

0 टिप्पण्या