ग्रामगीतेतील आदर्श विवाह संस्कार

 

ग्रामगीतेतील आदर्श विवाह संस्कार

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 12/12/2025 :

जगाची निर्मिती ज्या प्रकाराने जीवंत आहे, तिला एक विवाहासारखे पवित्र संस्कारक्षम बंधन आहे. अशा नात्याला जगात कुठेही आडकाठी नाही. तुमचा जन्म होण्यासाठी स्री-पुरुषाला विवाह करुन एकत्र यावेच लागेल. आपले पालनपोषण तेच करणार ना. लग्न केल्यामुळे दोन वेगवेगळे कुटुंब एकत्र येतात. लग्न म्हणजे काय आहे हे तुम्हाला कळणं गरजेचे आहे. जर तुम्ही लग्नाला निव्वळ शारीरिक सुख पूर्ण करण्यासाठी केलेली औपचारिकता समजत असाल तर तुम्ही कोणत्याही चुकीच्या मार्गावर जात आहात. लग्न मानवाला शारीरिक दृष्टयाच नाही तर मानसिक दृष्टया देखील परिपूर्ण बनवते. लग्न करण्याने फक्त सुख मिळते असे समजणे चुकीचे आहे. तुमच्या उतार वयात लग्नाची खरी गरज तुम्हाला जाणवते.

स्त्री -पुरुष ही दोन चाके | जरी परस्पर सहायके |

तरीच संसार रथ चाले कौतुके | ग्राम होई आदर्श ||

            राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात, जगाची राहाटी चालू राहावी आणि पुरुष व स्त्री यांच्या अंगी निसर्गत: असणाऱ्या गुणांचे संगोपन व्हावे म्हणूनच त्यांच्या विवाहाची योजना धर्मज्ञांनी आखली. सृष्टी चक्राची ही दोन चाके (स्त्री - पुरुष) जर एकमेकास सहाय्यक राहिली तरच संसाररुपी रथ समाधानाने चालून गाव आदर्श होईल. या उद्दिष्टाकडे दुर्लक्ष होऊन विवाह ही एक रुढी बनली व त्यापासून समाजाच्या दुःखाचा उदय झाला. पुरुषार्थ प्राप्ती व समाज स्थैर्य ह्याकरिता विवाह हे एक साधन होते परंतु अज्ञान व लोभ वाढल्यामुळे समाजाचे अध:पतन झाले. कित्येक मुली दिसायला सुंदर असूनही हुंड्याच्या रुढीमुळे त्यांची लग्न होत नाहीत तसेच कित्येक समाजातील मुलेही याच कारणाने अविवाहित राहतात. हुंड्याच्या वाईट रुढीमुळे समाजात व्यभिचार वाढला. काही मुलामुलींचे वडील घराणे, पैसा व प्रतिष्ठा पाहून लग्ने ठरवितात. याकरिता वडील मुलामुलींचा विचार काय आहे ते घेत नाहीत. त्यांचे लग्न झाल्यावर त्या दोघांचा संसार कसा काय सुरळीत चालू शकेल? विवाहा अगोदर मुलामुलींनी परस्परांना पाहिले पाहिजे. एकमेकांना पसंत असल्याचा विचार करायला पाहिजे. संसार सुखी होण्याकरिता दोघांचेही एकमत असायला हवे. दोघांचे विचार जुळले तर त्यांच्या संसाराची भरभराट होईल.

भोगासाठी लग्न केले | आंधळेपणी संसार चाले | 

वर्ष लोटताची गोंधळले | दोन्ही प्राणी ||

           राष्ट्रसंत म्हणतात, "भोगासाठी लग्न नसूनिया, आदर्श मानव्यता" लग्न हे एक आदर्श मानव्यता आहे. याचा अर्थ लग्न हे प्रेम, वचनबद्धता, विश्वास आणि एकमेकांना आधार देणारे एक पवित्र बंधन आहे. दोन व्यक्तीला एकत्र आणून कुटुंब निर्माण करते, भावनिक सुरक्षा देते आणि त्यांच्या सुखी व परिपूर्ण जीवनाचा पाया रचते. ज्यामुळे मानवी नाते सबंधांना एक उच्च दर्जा प्राप्त होतो. जे भोगासाठी (कामवासनेने) लग्न करतात त्यांचा संसार आंधळेपणाचा (अव्यवस्थित) होतो. एका वर्षातच दोघेही गोंधळून जातात. मग ते एकमेकांशी बोलत नाहीत. एकमेकांविषयी त्यांचे मनात संशय वाढतात. यामुळे या पतीपत्नींना संसार म्हणजे यमयातना वाटायला लागतात. विषय भोगण्याकरिता त्यांनी लग्न केले असेल तर समजावे की, लग्नापूर्वी दोघांनीही एकमेकांना नीट समजून घेतलेच नाही. अशामुळे त्यांचे आयुष्य फुकट जाते. केवळ भोगासाठीच लग्न करणे हे तर विचित्रच समजावे. दोन पशू एकत्र आल्याने जीवनात कसला आनंद येणार?

श्वानाचिया पशुत्व संयोगे | जन्मती जीव कर्म भोगे |

टाकिली जाती सर्व मार्गे | श्वान पिली ||

तैसे नोहे मानवांचे | त्यांचे राहणे जबाबदारीचे |

एक संतान ही थोर कामाचे | दिगंतरी ||

           कुत्र्यासारख्या जनावरांच्या संभोगातून होणारी संतती ही पूर्व जन्मीचे पाप भोगण्यासाठीच जन्मलेली असते. जिकडे पाहाल तिकडे पिलांची गर्दी असते. मानवी जीवन तसे नसून त्यांच्या जीवनात जबाबदारीची जाणीव असते. त्यांचे एक मुलही सारे विश्व गाजविणारे होते. सुपुत्ररुपी धन हे सर्व धनात श्रेष्ठ धन आहे. ते राष्ट्राचा सन्मान वाढविते म्हणूनच विवाह करतांना वधूवरांनी विचार करुनच लग्न केले पाहिजे. कमजोर पुत्र नको. जसे सुपीक जमीन व शुद्ध बी यांचा सबंध जुळला तर आकाशाला फोडून जाणारा वृक्ष तयार होतो. आपणास मुलेही अशीच बलभिमा सारखी व्हावीत.

दोघे प्राणी उपवर असती | भिन्न जाती लग्न करु म्हणती |

विचार करिता त्यासी संमती | अवश्य द्यावी ||

             भिन्न जातीचा मुलगा व मुलगी लग्नाच्या वयाची झाली आहेत व ती परस्पराशी लग्न करु इच्छित असतील तर आईबापांनी त्याला अवश्य परवानगी द्यावी. सारख्या गुणांची मुले मुली एकमेकांकडे आकृष्ट होणे स्वाभाविक आहे. शास्त्र पुराण सांगते की, मिश्र विवाहाचे परिणाम वाईट होतात. हे म्हणणे माझे मते साफ चुकीचे आहे. फक्त वधुवरांची इच्छा नसतांना त्यांचे बळजबरीने मिश्र विवाह करु नये. त्यांना मोकळ्या मनाने विचार करावयास वेळ द्यावा. मुलगा मुलगी एकमेकांशी विवाहबद्ध होऊ असा आग्रह करत असतील तर त्यांना मुळीच अडथळा का करता? पूर्वीच्या काळी एकमेकांच्या गुणांकडे ओढले जाऊन बरेच विवाह झाले. श्रीकृष्णाचा रुक्मिणीशी व अर्जूनाचा सुभद्रेशी असाच विवाह झाला. राष्ट्रसंतानी आदर्श विवाह पद्धती ग्रामगीतेत सांगितली आहे.

आकाशातील पाहती ग्रह | इकडे स्वभावी वेगळे दुराग्रह |

जीवनात वाढे जयांनी द्रोह | ऐसे त्यांना न दिसती ||

म्हणती वधू-वर सुलक्षण | जुळले त्यांचे छत्तीस गुण |

इकडे छत्तीसी अथवा खडाष्टक पूर्ण | करी जीवन बरबाद ||

           लग्न जुळविण्याकरिता आकाशातील ग्रहांना महत्व देतात. हा मानवी स्वभावाचा ढोंगीपणा आहे. ज्योतिषी पत्रिका पाहून त्यांचे छत्तीस गुण जमवतात. मुलामुलींच्या स्वभावातील छत्तीसचा आकडा म्हणजे पूर्ण विरोध भरला आहे. या आंधळेपणाच्या वृत्तीमुळे जीवनाचे वैराण होते. वधुवरांचे अंगचे उत्तम गुण हेच त्यांचे गौरवचिन्ह असायला हवे. लग्न करतांना अमाप पैसा उधळतात. लग्नासाठी कर्ज काढून त्याचे व्याज जन्मभर देत राहावे व शेवटी लग्नापायी कफल्लक व्हावे हे कोणत्या देवाने सांगितले आहे. लग्नाकरिता पंचांग न पाहता हवा, पाणी, ऋतू हे सुखावह असतील तर तेच दिवस लग्नास चांगले समजावे. बाकीचे झंझट फालतू आहे असे राष्ट्रसंताचे मत आहे.

मोठ्या मंडपावर पैसा खर्च न करता निसर्गरम्य ठिकाणी देवळामध्ये लग्न विधी करावा. वधुवरांचा सूचकाने परिचय करुन द्यावा. त्यांच्याकडुन सत्कार्याचा निश्चय (संकल्प) करुन घ्यावा. नंतर मंगलाष्टके म्हणून विधी पार पाडावा. वधुवरांना भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्यांना संसार उभा करण्यास लागणारे वस्तू, साहित्य द्याव्या. अशाप्रकारे पार पडलेला मंगलकार्य हे देशाला भूषणावह आहे. याने समाज संघटीत राहून गावाची कीर्ती वाढेल. विवाह सोहळा पार पाडतांना ग्रामगीतेतील वैवाहिक संस्कार या अध्यायातील ओव्या लग्न समारंभात म्हणाव्यात. सर्व संस्कारात लग्न संस्कार हा सर्वांत महत्वाचा संस्कार आहे. समाजरुपी मंदिराचा हा पाया आहे. म्हणून हा संस्कार विधी विचारपूर्वक करावा. आदर्श ग्रामजीवनासाठी लग्नात अनावश्यक खर्च टाळून सामूहिक विवाहाचे समर्थन महाराजांनी केले आहे.

राष्ट्रसंताचे प्रतिमेचे पूजन करुन विवाह संस्कारास सुरुवात करावी. लग्नात वर-वधूच्या मध्ये अंतरपाट न धरता दोघेही सर्वांना दिसतील असे उभे करावे. धान्याच्या अक्षता वाटणे टाळावे. केवळ फुलांचा वर्षाव करण्यात यावा. राष्ट्रसंतानी लिहलेली मंगलाष्टके अतिशय मधूर आवाजात गायनाच्या स्वरुपात म्हणावी. नंतर वर आणि वधूंचा शपथ विधी करावा. अग्नी संस्कार आणि शांतीपाठ झाल्यावर शेवटी सामुहिक राष्ट्रवंदना घेऊन हा विवाह सोहळा यथासांग पूर्ण करावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आधुनिक विचार ऐकून थक्क व्हायला होते. त्यांनी आंतरजातीय, प्रेमविवाहाला दिलेली मान्यता पाहून त्यांचे विचार किती प्रगल्भ, केवढी मोठी उंची गाठली हे दिसून येते.

पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन- 9921791677

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या