"माणसाचे जीवन धर्माच्या आधारावर घडले पाहिजे": आचार्य 108 कुंथुसागरजी महाराज


"माणसाचे जीवन धर्माच्या आधारावर घडले पाहिजे": आचार्य 108 कुंथुसागरजी महाराज

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 06/12/2025 : रत्नत्रय शैक्षणिक संकुल मांडवे (ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे आचार्य 108 कुंथुसागर महाराज यांचे प्रवचन विद्यार्थ्यांना तसेच सकल जैन समाज सदाशिवनगर, मांडवे, पुरंदावडे,  येळीव व मेडद यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते. 

माणसाचे जीवन धर्माच्या आधारावर घडले पाहिजे, असा विचार कुंथुसागरजी महाराजांनी या  कार्यक्रमात व्यक्त केला. अहिंसा हा जैन धर्माचा मूलभूत पाया असून प्रत्येक व्यक्तीने अहिंसेचे तत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. “तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या” हा सिद्धांत भगवान वर्धमान महावीर यांनी दिला असून, त्याचा अर्थ संपूर्ण समाज सुखी व शांततामय व्हावा असा आहे. कर्मावरच माणसाचे जीवन घडते. चांगल्या कर्माने माणूस ‘नराचा नारायण’ बनू शकतो, म्हणूनच प्रत्येकाने सद्कर्म करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. सत्य बोलणे, हिंसा न करणे, संयम बाळगणे हीच खरी धर्मतत्त्वे असल्याचेही सांगण्यात आले.

आजचे शिक्षण आणि प्राचीन काळातील शिक्षण यामध्ये मोठा फरक असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी विद्यार्थी ऋषींच्या आश्रमात एकत्र येऊन अध्ययन करत असत. त्या काळात न्याय, नीती, मानवता, आहार-विहार या मूल्यांना उच्च स्थान होते. आज मात्र शिक्षण केवळ पोटासाठी आणि उपजीविकेसाठी मर्यादित झाले असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

“आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांना मानवतावादी शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांची यामध्ये मुख्य भूमिका आहे. शिक्षकांनी स्वतः ऋषींप्रमाणे आदर्श जीवन जगायला हवे, कारण विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करत असतात,” असेही सांगण्यात आले. शिक्षकांच्या जीवनात संयम, चारित्र्य, समता आणि मानवतावाद असलाच पाहिजे, यावर विशेष भर देण्यात आला.

गुरूंची तुलना आकाशातून पडणाऱ्या पावसाशी करताना कुंथुसागरजी महाराज म्हणाले, “पाऊस जसा कोणताही भेदभाव न करता सर्वत्र समानतेने वर्षाव करतो, तसेच गुरूंनीही सर्व विद्यार्थ्यांवर समानतेने ज्ञानाचा वर्षाव केला पाहिजे.” अर्जुनासारखा शिष्य नाही, म्हणून विद्यार्थ्यांनी अर्जुनाला आदर्श मानून कष्ट, एकाग्रता आणि चिकाटीने जीवन घडवावे, असेही सांगण्यात आले.

रामायणातील मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचे उदाहरण देताना कुंथुसागरजी महाराज यांनी सांगितले की, रामाने माणूस म्हणून जन्म घेऊनही मर्यादांचे पालन करत आदर्श जीवन जगून दाखवले. वडिलांच्या आज्ञेसाठी त्यांनी राजगादीचा त्याग करून वनवास स्वीकारला. सर्व सुख-सुविधा सोडून कर्तव्यपालन करणारे राम हे आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरावेत, असा संदेश देण्यात आला.

शेवटी “मनुष्याने धर्मानुसार जगावे, सत्य बोलावे, हिंसा करू नये आणि देशाची सेवा करणारे विद्यार्थी घडवावे,” असे आवाहन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या